Pages

Monday, March 22, 2021

माती सजीव ठेवण्‍यासाठी सेंद्रीय खतांचा वापर आवश्‍यक ..... शिक्षण संचालक डॉ धर्मराज गोखले

वनामकृवित आयोजित सेंद्रीय खत निर्मिती तंत्रज्ञान यावरील पाच दिवसीय प्रशिक्षणाचे उदघाटन

वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठातील मृद विज्ञान व कृषि रसायनशास्‍त्र विभागाच्‍या वतीने  भारतीय कृषि अनुसंधान परिषद, नवी दिल्‍ली अनुदानीत मानव विकास अनुसूचित जाती उपयोजना प्रकल्‍पांतर्गत पाच दिवसीय सेंद्रीय खत निर्मिती तंत्रज्ञानावरील महिला प्रशिक्षणाचे आयोजन दिनांक 22 मार्च ते 26 मार्च दरम्‍यान करण्‍यात आले असुन प्रशिक्षणाचे उदघाटन दिनांक 22 मार्च रोजी करण्‍यात आले. कार्यक्रमाच्‍या अध्‍यक्षस्‍थानी शिक्षण संचालक डॉ धर्मराज गोखले हे होते तर आयोजक प्राचार्य डॉ सय्यद ईस्‍माईल, महिला आर्थिक विकास म‍हा‍मंडळच्‍या परभणी जिल्‍हा समन्‍वयक श्रीमती निता अंभोरे, डॉ प्रविण वैद्य, डॉ हेमंत देशपांडे आदींची प्रमुख उपस्थिती होती.

अध्‍यक्षीय भाषणात डॉ धर्मराज गोखले म्‍हणाले की, शेतीत सेंद्रीय खतांचा वापर न करता केवळ रासायनिक खतांचा अति वापर केल्‍यामुळे दिवसेंदिवस मातीचे आरोग्‍य खालवत आहे , त्‍यामुळे पिकांच्‍या उत्‍पादनातही घट येत आहे. माती सजीव ठेवण्‍यासाठी सेंद्रीय खतांचा वापर अत्‍यंत आवश्‍यक असुन घरच्‍या घरी खत निर्मिती केल्‍यास कमी खर्चात खत उपलब्‍ध होईल. शेतकामात महिलांचाच मोठा वाटा असुन महिलांनी सेंद्रीय खत निर्मिती कौशल्‍य अवगत करून सेंद्रीय खत निर्मिती करावी, असा सल्‍ला त्‍यांनी दिला.

श्रीमती निता अंभोरे म्‍हणाल्‍या की, महिला बचत गटाच्‍या माध्‍यमातुन महिला सक्षम होत असुन शेती पुरक व्‍यवसायाचे कौशल्‍य अवगत करण्‍यासाठी सदरिल प्रशिक्षणाचा उपयोग होईल. महिलांनी शेती पुरक व्‍यवसाय सुरू करून आर्थिक समृध्‍दी साधावी.

प्रास्‍ताविकात डॉ सय्यद ईस्‍माईल यांनी सेंद्रीय व गांडुळ खताचे महत्‍व सांगुन मातीच्‍या आरोग्‍यावरच मानवाचे आरोग्‍य अवलंबुन असल्‍याचे म्‍हणाले. कार्यक्रमात मान्‍यवरांच्‍या हस्‍ते सेंद्रीय खत निर्मिती तंत्रज्ञान पुस्तिकेचे विमोचन  करण्‍यात आले. कार्यक्रमाचे सुत्रसंचालन डॉ पपिता गौरखेडे यांनी केले तर आभार डॉ सुरेश वाईकर यांनी मानले. कार्यक्रम यशस्‍वीतेकरिता डॉ अनिल धमक, डॉ रामप्रसाद खंदारे, डॉ स्‍वाती झाडे, डॉ संतोष चिक्षे, स्‍नेहल शिलेवंत, शशीशेखर जावळे आदींनी परिश्रम घेतले. प्रशिक्षणात ग्रामीण भागातील निवडक 20 अनुसूचित जातीच्‍या महिलांनी सहभाग नोंदविला आहे.