Pages

Saturday, March 6, 2021

वनामकृविच्‍या वतीने वैजापूर (औरंगाबाद) येथे बाजरी महोत्‍सव संपन्‍न

बाजरीचे आहारातील महत्‍व लोकांच्‍या मनामध्‍ये बिंबवणे गरजेचे ...........  कुलगुरू मा डॉ अशोक ढवण


बाजरी हे पीक कमी पावसामध्ये व अवर्षण प्रवण भागात येणारे पीक असुन बाजरीमध्ये लोह व जस्त चे प्रमाण जास्त  आहे. त्‍यामुळे बालकांतील व महिलांमधील कुपोषण कमी करण्‍याकरिता आहारात बाजरीचा समावेश वाढवावा लागेल, विशेषत: आदिवासी भागात कुपोषणाची समस्‍या अधिक आहे. दिवसेदिवस बाजरी पिक लागवडी खालील क्षेत्रात घट होत आहे. बाजरीचे आहारातील महत्‍व लोकांमध्‍ये बिंबवणे गरजेचे असुन यासाठी विद्यापीठ व कृषि विभागाने जनजागृती करावी, असे प्रतिपादन कुलगुरू मा डॉ अशोक ढवण यांनी केले. वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठांतर्गत असलेल्‍या औरंगाबाद येथील राष्ट्रीय कृषी संशोधन प्रकल्प, वैजापूर येथील बाजरी संशोधन केंद्र व कृषी विभाग यांच्या संयुक्त विद्यमाने दिनांक ६ मार्च रोजी बाजरी महोत्सव व शेतकरी मेळाव्‍याचे आयोजन वैजापूर येथे करण्‍यात आले होते, कार्यक्रमाच्‍या अध्‍यक्षस्‍थानावरून ते बोलत होते. कार्यक्रमास प्रमुख अतिथी म्‍हणुन संशोधन संचालक डॉ दत्‍तप्रसाद वासकर हे उपस्थित होते तर व्‍यासपीठावर उपविभागीय कृषी अधिकारी श्री प्रकाश देशमुख, सहयोगी संचालक संशोधन डॉ सूर्यकांत पवार, प्रभारी अधिकारी डॉ गजेंद्र जगताप, श्री नानासाहेब कुंदे आदींची प्रमुख उपस्थिती होती. 

कुलगुरू मा डॉ अशोक ढवण पुढे म्‍हणाले की, बाजरी पिकाचे महत्‍व लक्षात घेता केंद्र सरकारने बाजरीचा पोषक तृणधान्ये पीक म्हणून समावेश केला आहे. हैद्राबाद येथील इक्रिसॅट संस्‍थेच्‍या साह्याने विद्यापीठाने विकसित केलेल्या एएचबी १२०० बाजरी वाणाचे मोठ्या प्रमाणावर बीजोत्पादन घेऊन त्याचे बियाणे शेतकऱ्यांना उपलब्ध करून देण्यात येईल. बाजरी पिकाचे क्षेत्र वाढून उत्पादनाबरोबरच मूल्यवर्धन करून त्याची साखळी अधिक बळकटी करणे आवश्यक आहे.

संशोधन संचालक डॉ दत्‍तप्रसाद वासकर आपल्‍या भाषणात म्‍हणाले की, बाजरी पिकांमधील गुणधर्म लक्षात घेता आहारामध्ये समावेश करण्याबरोबरच लागवडीमध्ये शेती विस्तार करणे गरजेचे आहे. औरंगाबाद येथील राष्ट्रीय कृषी संशोधन प्रकल्पाने अधिकतम लोह व जस्त असणारे बाजरीचा एएचबी १२०० व एएचबी १२६९ या वाणाची निर्मिती केली असून या  वाणाचे मोठ्या प्रमाणात बीजोत्‍पादन घेऊन हे बियाणे शेतकरी बंधू यांना उपलबध करून देण्यात येईल. बचत गटाच्या माध्यमातून बाजरीचे मूल्यवर्धन करून विक्री केल्यास शेतकरी बंधू यांचे उत्पन्‍न वाढीस मदत होईल.

कार्यक्रमात बाजरी संशोधन केंद्राचे श्री नानासाहेब कुदे यांचा उत्कृष्ठ बीजोत्पादन केल्या बद्दल कुलगुरू मा डॉ अशोक ढवण यांचे हस्ते सत्कार करण्यात आला. हैद्राबाद येथील बाजरी उत्पादक शेतकरी श्री विर पाटील, तसेच बचत गटातील यशस्‍वी महिला व पुरुष यांचा देखील मान्यवरांचे हस्ते सत्कार करण्यात आला. यावेळी बाजरी पासुन तयार करण्‍यात आलेल्‍या मुल्‍यवर्धीत पदार्थचे स्टॉल लावण्यात आले होते. तांत्रिक सत्रात सुधारीत बाजरी लागवडीवर प्रा दिनेश लोमटे, आधुनिक फळबाग लागवडीवर डॉ मोहन पाटील, सुधारित कांदा लागवडीवर डॉ गजेंद्र जगताप, कृषी विभागातील विविध योजनावर श्री प्रकाश देशमुख आदींनी मार्गदर्शन केले.

कार्यक्रमाचे प्रास्ताविक डॉ सूर्यकांत पवार यांनी केले, सुत्रसंचालन डॉ दिनेश लोमटे यांनी केले तर डॉ गजेंद्र जगताप यांनी आभार मानले. कार्यक्रमास विद्यापीठातील डॉ के एस बेग, डॉ एम बी पाटील, डॉ डी के पाटील, डॉ अशोक जाधव, डॉ गजेंद्र लोंढे, डॉ घुगे डॉ कांबळे, डॉ मिसाळ, डॉ पेंडके, डॉ औंडेकर, डॉ किशोर झाडे आदीसह प्रगतशील शेतकरी, बचत गटाच्या महिला व कृषि विभागातील अधिकारी कर्मचारी उपस्थित होते.