सकारात्मक जीवनशैलीचे व्यक्तीमत्व विकासात महत्वपुर्ण योगदान ........ डॉ. सी. सुधाकर
वसंतराव नाईक मराठवाडा
कृषि विद्यापीठातील राष्ट्रीय कृषि उच्च
शिक्षण प्रकल्प (नाहेप) वतीने “व्यक्तीमत्व विकास व जीवन कौशल्य” या विषयावर
ऑनलाईन राष्ट्रीय प्रशिक्षणाचे दिनांक ३ ते ५ मार्च दरम्यान आयोजन करण्यात आला
होते. प्रशिक्षणाचा समारोप दिनांक ५ मार्च रोजी संपन्न झाला. या प्रसंगी प्रमुख
पाहुणे म्हणुन हैद्राबाद येथील प्रोफेसर जयशंकर तेलंगणा कृषी विद्यापीठातील प्रमुख
शास्त्रज्ञ डॉ. सी. सुधाकर हे उपस्थित होते तर अध्यक्षस्थानी परभणी कृषी महाविद्यालयाचे
प्राचार्य डॉ. सय्यद ईस्माइल हे होते, आयोजक डॉ. गोपाळ
शिंदे, डॉ. बी.व्ही. आसेवार यांची प्रमुख उपस्थिती होती.
मार्गदर्शनात डॉ. सी. सुधाकर म्हणाले की, जीवनात यशस्वी
होण्यासाठी व्यवसायीक कौशल्यासोबतच सकारात्मक विचारसरणी, ध्यानधारणा, आनंदी विचार
यांची अत्यंत आवश्यकता आहे. कठीण परिस्थीतत सुध्दा जीवनात उत्साही मनोवृत्ती कायम
ठेवणे गरजेचे आहे. विज्ञान व तंत्रज्ञान अभ्यासाविषयी अनेक प्रशिक्षण सत्राचे
आयोजन केल्या जाते. त्या सोबतच व्यक्तीमत्व विकास व जीवनकौशल्ये या विषयावर देखील वेळोवेळी
मार्गदर्शन करणे काळाची गरज असुन पदव्युत्तर विद्यार्थी, शास्त्रज्ञांना यांचा निश्चितच
उपयोग होतो, असे ते म्हणाले.
अध्यक्षीय समारोपात डॉ. सय्यद ईस्माइल यांनी सदरील
प्रशिक्षण विद्यार्थी व शास्त्रज्ञांना निश्चीतच फलदायी ठरेल असे मत व्यक्त करून विद्यार्थ्यांनी
आळस झटकुन तांत्रिक कौशल्ये व जीवनविषयक कौशल्ये आत्मसात करावीत. विद्यार्थ्यांनी
शारिरीक आरोग्यासोबतच बौध्दीक आरोग्याविषयी सजग राहणे तितकेच आवश्यक असल्याचे ते म्हणाले.
आयोजन सचिव तथा विभाग प्रमुख डॉ. बी. व्ही. आसेवार यांनी प्रशिक्षणाचा
अहवाल सादर केला तर डॉ. गोपाळ शिंदे यांनी नाहेप प्रकल्पाविषयी उपस्थितांना माहिती
दिली. प्रशिक्षणाचा ८५ पदव्युत्तर विद्यार्थी, शास्त्रज्ञांनी लाभ घेतला. प्रशिक्षणार्थीपैकी
कु. निशा गेहलोत, डॉ. ए.माधवी लता आणि डॉ. नरेशकुमार जायेवार यांनी प्रशिक्षणाविषयी मत व्यक्त केले. कुलगुरु मा डॉ.
अशोक ढवण यांनी समारोपीय कार्यक्रमासाठी शुभेच्छा दिल्या. कार्यक्रमाचे
सुत्रसंचालन प्रा. संजय पवार, यांनी केले तर आभार डॉ. मेघा जगताप यांनी मानले. कार्यक्रमाचे
आयोजन शिक्षण संचालक डॉ. डी. एन. गोखले यांच्या मार्गदर्शनाखाली डॉ. गोपाळ शिंदे,
डॉ. बी.व्ही. आसेवार, डॉ. एम.पी. जगताप, डॉ. मदन पेंडके, प्रा. संजय पवार यांनी
केले. तांत्रिक सहाय्य नाहेपचे डॉ. अनिकेत वाईकर, डॉ. अविनाश काकडे, श्री.
रवीकुमार कल्लोजी, डॉ. नरेंद्र खत्री, इंजि. अपुर्वा देशमुख, श्री. रामदास शिंपले,
मुक्ता शिंदे आदींनी केले.