Pages

Tuesday, May 25, 2021

विविध पिकांसाठी उपयुक्‍त द्रवरूप जिवाणु खते वनामकृवित विक्रीकरिता उपलब्‍ध

वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठातील मृद विज्ञान कृषि रसायनशास्त्र विभागांतर्गत असलेल्‍या अखिल भारतीय मृदा जैव विविधता जैविक खत प्रकल्पामध्‍ये विविध पिकांसाठी द्रवरुप जिवाणु खते विक्रीसाठी उपलब्‍ध असुन सदरिल द्रवरूप जिवाणु खतांचे दर  प्र‍ती लिटर रूपये ३७५ /- या प्रमाणे आहे. यात रायझोबीयम, अॅझॅक्टोबॅक्टर, स्फुरद विरघळविणारे जिवाणु खत (पीएसबी), पालाविरघळविणार वहन करणारे जिवाणु खत, गंधक विरघळविणारे जिवाणु खत, जस्त उपलब्धता वाढविणारे जिवाणु खत, रायझोफॉस, अॅझोटोफॉस आदीचा समावेश आहे, अशी माहिती विभाग प्रमुख डॉ सय्यद ईस्‍माईल व प्रकल्‍पाचे प्रमुख डॉ अनिल धमक यांनी दिली. अधिक माहिती करिता प्रकल्‍पाचे प्रमुख अन्‍वेषक डॉ. अनिल धमक (मोबाईल क्रमांक ९४२००३३०४६), श्री. सय्यद मुन्‍शी (९९६०२८२८०३), श्री. सुनिल शेंडे (७५०७४४४४८८) यांच्‍याशी संपर्क करावा.

जाणुन घ्‍या द्रवरूप जिवाणु खतांचा वापर व उपयुक्‍तता 

द्रवरूप जिवाणु खतांची उपयुक्‍तता व फायदे : जिवाणु खत म्‍हणजे पिकांसाठी उपयुक्‍त जीवंत किंवा सुप्‍त अवस्‍थेतील जीवाणुंचे निर्जंतुक वाहकामध्‍ये केलेले मिश्रण. बियाणे किंवा रोपास बीजप्रक्रिया / अंतरक्षीकरण किंवा मातीतुन वापरल्‍यास जमिनीत पिकांकरिता उपयुक्‍त जीवाणुंचीसंख्‍येत वाढ होऊन पिकांसाठी आवश्‍यक अन्‍नद्रव्‍यांचा पुरवठा होतो, व उत्‍पादनात वाढ होते. जीवाणु खते ही कमी किंमतीत उपलब्‍ध असुन जमिनीचा पोत सुधारण्‍यासाठी त्‍यांची मदत होते. जमीन जैविक क्रियाशील बनते. म्‍ळांच्‍या संख्‍येत व लांबीत भरपुर वाढ होऊन जमीनीत मुख्‍य खोडापासुन दुरवरील व खोलवरील अन्‍नद्रव्‍य व पाणी पिकास उपलब्‍ध होते. पिकांची रोग व किड प्रतिकार शक्‍तीत वाढ होते. पिकांना अन्‍नद्रव्‍ये जमिनीतुन शोषण करण्‍यास मदत करताततसेच जमिनीची नैसर्गिक सुपिकता टिकवुन ठेवतात. जिवाणु खते वापरल्‍याने रासायनिक खताची उणिव भरून काढता येत नसुन ही खते रासायनिक खतासोबत पुरक खते म्‍हणुन वापरणे फायद्याचे आहेजिवाणु खतांमुळे पिकांना दिलेल्‍या रासायनिक खतांचा कार्यक्षमरित्‍या वापर होण्‍यास मदत होते.

द्रवरूप जैविक खताचे प्रकार

नत्र स्थिर करणारे जिवाणु रायझोबियम जीवाणु : या जिवाणुचे कार्य सहजीवी पध्‍दतीने चालतेहे जीवाणु हवेतील नत्र पिकांच्‍या मुळाच्‍या गाठीमध्‍ये स्थिर करतात. पिकाशिवाय स्‍वतंत्ररित्‍या या जीवाणुंना नत्र स्थिर करता येत नाही म्‍हणुन यास सह‍जीवी जीवाणु असे म्‍हणतात. हे जीवाणु पिकांच्‍या मुळावर गाठी तयार करून राहातात व त्‍यांना लागणारे अन्‍न वनस्‍पती कडुन मिळवितात व हवेतील नत्र शोषुन घेऊन तो अमोनियाच्‍या स्‍वरूपात पिकांना पुरवितात. रायझोबीयमचे कार्यक्षमतेच्‍या दृष्‍टीने वेगवेगळे सात गट असुन विशिष्‍ट गटातील पिकांना विशिष्‍ट गटाचे जीवाणु वापरल्‍यास फायदाचे ठरते. त्‍यामुळे जीवाणु वापरतांना कोणत्‍या गटाचे आहे याची खात्री करून वापरावीत.  या जिवाणुच्‍या वापरामुळे सोयाबीन, मुग, हरभरा, भुईमुग, तुर, उडीद आदी पिक उत्‍पादनात २० टक्कयापेक्षा जास्‍त वाढ झाल्‍याचे आढळुन आले आहे.

नत्र स्थिर करणारे जिवाणु अॅझोटोबॅक्‍टर जीवाणु : हे जीवाणु जमिनीत स्‍वतंत्रपणे वनस्‍पतीच्‍या मुळाभोवती राहुन असहजीवी पध्‍दतीने हवेतील मुक्‍त स्‍वरूपात असणा-या नत्र वायुचे स्थिरीकरण करून पिकास उपलब्‍ध करून देतो. यामुळे पिकांची जोमदार वाढ होऊन उत्‍पादनात १० ते २५ टक्कयापर्यंत वाढ होते. हे जीवाणु खत तृणधान्‍य, गळीतधान्‍य, भाजीपाला, फळझाडे, बटाटा, ऊस, कापुस, हळद, आले, फुलझाडे आदी पिकांसाठी वापरता येते. अॅझोटोबॅक्‍टर जीवाणु सेंद्रीय पदार्थाच्‍या विकरणातुन तयार होणा-या उर्जेवर जगत असल्‍यामुळे ज्‍या जमिनीत सेंद्रीय पदार्थाचे प्रमाण जास्‍त असते अशा जमिनीत हे जीवाणुचे कार्य जास्‍त प्रमाणात चालते.

स्‍फुरद विरघळविणारी जीवणु (पीएसबी) : रासायनिक खताव्‍दारे पुरवलेल्‍या स्‍फुरद सर्वच्‍या सर्व पिकास उपलब्‍ध होत नाही. यापैकी २० ते २५ टक्केच स्‍फुरद पिकांना वापरता येऊ शकतो. बाकीचा ७५ ते ८० टक्के स्‍फुरद मातीच्‍या कणावर स्थिर होऊन त्‍याची पिकांना उपलब्‍धता होत नाही. त्‍यासाठी स्‍फुरद विरघळविण्‍याचे कार्य विशिष्‍ट प्रकारचे जीवाणु करतात, त्‍यामुळे स्‍फुरद पिकांना उपलब्‍ध होतो. हे जीवाणु मातीच्‍या कणावर स्थिर झालेला व उपलब्‍ध नसणा-या स्‍फुरदाचे विघटन करून त्‍याचे पाण्‍यात विरघळु शकणा-या द्राव्‍य स्‍वरूपात रूपांतर करतात. स्‍फुरद जीवाणु खतामध्‍ये अनेक उपयुक्‍त जीवाणुंचा समावेश असतो. या जीवाणुकडुन सायट्रीक आम्‍ल, लॅक्‍टीक आम्‍ल, मॅलीक आम्‍ल, फ्युमॅरीक आम्‍ल आदी अनेक कार्बनिक आम्‍ले तयार होतात व अविद्राव्‍य स्‍वरूपात संयोग पावतात व त्‍याचे रूपांतर विद्राव्‍य स्‍वरूपात करतात.

द्रवरूप जीवाण खते वापरण्‍याची पध्‍दत

बीजप्रक्रिया किंवा बियाण्‍यास अंतरक्षीकरण : यात दहा किलो बियाण्‍यास १०० मिली प्रत्येकी द्रवरूप जीवाणु खताचा वापर करावा. हे द्रावण सारख्‍या प्रमाणात लावुन लगेच पेरणी करावी. सोयाबीन व भुईमुग या सारख्‍या बियाणावर पातळ आवरण असलेल या पिकांकरिता दहा किलो बियाण्‍यास ५० मिली प्रत्येकी जीवाणु खत पुरसे होते. पुनर्लागवड करणा-या पिकामध्‍ये जसे भाजीपाला, भात आदी मध्‍ये पुनर्लागवड करतांना अॅझोटोबॅक्‍टर किंवा अॅझोस्पिरीलम व स्‍फुरद विरघळणारी द्रवरूप जीवाणुंचा वापर केला जातो.

जीवाणु खते वापरतांना घ्‍यावयाची काळजी : जीवाणु खताच्‍या बाटल्‍या गर्मीच्‍या ठिकानी किंवा थेट सुर्य प्रकाशात ठेऊ नयेत. जीवाणु खते किटकनाशके, बुरशीनाशके, तणनाशके किंवा रासायनिक खताबरोबर मिसळु नयेत. जीवाणु खते बियाण्‍यास लावल्‍यानंतर थोडा वेळ सावलीत वाळवावीत. जीवाणु खते दिलेल्‍या अंतिम तारखेनंतर वापरू नये. ज्‍या पिकासाठी असतील त्‍याच पिकासाठी वापरावीत. जीवाणु खते जमिनीत दिल्‍यानंतर त्‍यांना जीवंत ठेवण्‍यासाठी जमिनीत ओल असणे आवश्‍यक आहे.

 

वनामकृवित हायड्रॉलिक्स आणि न्‍युमॅटिक कार्यप्रणालीचा कृषि क्षेत्रात वापर यावरील ऑनलाईन प्रशिक्षणास सुरूवात

वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठात राष्ट्रीय कृषी उच्च शिक्षण प्रकल्प, नवी दिल्ली व जागतिक बँक पुरस्‍कृत नाहेप प्रकल्‍पांतर्गत दिनांक दिनांक 24 मे ते 4 जुन दरम्यान हायड्रॉलिक्स आणि न्‍युमॅटिक कार्यप्रणालीचा कृषि क्षेत्रात वापरया विषयावर ऑनलाईन प्रशिक्षण आयोजन कृषि पदवी व पदव्युत्तर ‍विद्यार्थी, प्राध्यापक तसेच विद्यापीठ शास्त्रज्ञ यांच्याकरिता करण्‍यात आले आहे. प्रशिक्षणाचे आयोजन कुलगुरू मा. डॉ. अशोक ढवण व शिक्षण संचालक डॉ. धर्मराज  गोखले यांच्‍या मार्गदर्शनखाली आयोजन करण्‍यात असुन प्रशिक्षणांत मुंबई येथील एसएमसी इंटरनेशनल प्रा. लि. श्री. वासूदेव गाडगीळ, प्रा. एस. बी. लहाने आणि औरंगाबाद येथील छत्रपती शाहू आभियांत्रीकी महाविद्यालयाचे प्रा. व्हि. वाय. गोसावी हे मार्गदर्शन करणार आहेत. दिनांक 24 मे रोजी प्रशिक्षणाचे उदघाटन नाहेप प्रकल्‍पाचे प्रमुख अन्‍वेषक डॉ, गोपाळ शिंदे व एसएमसी इंटरनेशनल प्रा. लि. मुंबईचे वरीष्ठ प्रबंधक श्री. वासूदेव गाडगीळ यांच्‍या प्रमुख उपस्थित झाले.

यावेळी श्री. वासुदेव गाडगीळ मार्गदर्शनात म्‍हणाले की, कृषि क्षेत्रात उत्‍पादकता वाढीसाठी आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर आवश्‍यक असुन हायड्रॉलिक्स आणि न्‍युमॅटिक तंत्रज्ञानाचा वापर प्रत्‍यक्ष कृषि क्षेत्रात स्‍वयंचलीत यंत्रणा व कृषि प्रक्रिया उद्योगात मोठया प्रमाणावर करता येऊ शकतो  असे त्‍यांनी सांगितले. कार्यक्रमात डॉ. गोपाळ ‍शिंदे यांनी प्रशिक्षणार्थ्यांना नाहेपच्या ‍विविध योजना व प्रशिक्षणाबद्दल मार्गदर्शन केले.

कार्यक्रमाचे सुत्रसंचालन डॉ. नरेंद्र खत्री यांनी केले तसेच कार्यक्रमाचे आभार डॉ. अनिकेत वाईकर यांनी मानले. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी आयोजन सचिव डॉ. नरेंद्र खत्री, डॉ. अनिकेत वाईकर, डॉ. शिवराज शिंदे, डॉ. अविनाश काकडे, इंजी. रवीकुमार कल्लोजी, श्री. रामदास शिंपले व मुक्ता शिंदे आदींनी परिश्रम घेतले. प्रशिक्षणात देशभरातून पदव्युत्तर व आचार्य पदवीधारक, प्राध्यापक, शास्त्रज्ञ यांनी सहभाग नोंदविला आहे.

Friday, May 21, 2021

पर्यावरण संतुलनात व जैव विविधता टिकविण्‍यात मधमाशांचा वाटा महत्‍वाचा ..... कुलगुरू मा डॉ अशोक ढवण

वनामकृविच्‍या वतीने जागतिक मधमाशी दिन साजरा

वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठातील कृषि किटकशास्‍त्र विभाग व औरंगाबाद येथील कृषि विज्ञान केंद्, पैठण रोड, औरंगाबाद यांच्‍या संयुक्‍त विद्यमाने दिनांक २० मे रोजी जागतिक मधमाशी दिन ऑफलाईन व ऑनलाईन पध्‍दतीने साजरा करण्‍यात आला. कार्यक्रमाच्‍या अध्‍यक्षस्‍थानी कुलगुरू मा डॉ अशोक ढवण हे होते तर पुणे येथील अटारी संस्‍थेचे संचालक डॉ लाखन सिंग, शिक्षण संचालक डॉ धर्मराज गोखले, विस्‍तार शिक्षण संचालक डॉ देवराव देवसरकर, प्राचार्य डॉ सय्यद ईस्‍माईल, विभाग प्रमुख डॉ संजीव बंटेवाड, औरंगाबाद विभागीय कृषि सहसंचालक डॉ दिनकर जाधव, राष्‍ट्रीय कृषि संशोधन प्रकल्‍पाचे प्रमुख डॉ सुर्यकांत पवार, पुणे येथील केंद्रीय मक्षिकापालन प्रशिक्षण संस्‍थेचे माजी विकास अधिकारी डॉ डी एम वाखळे, डॉ पुरूषोत्‍तम नेहरकर, औरंगाबाद कृषि विज्ञान केंद्राचे प्रमुख डॉ किशोर झाडे आदींची प्रमुख सहभाग होता. 

अध्‍यक्षीय भाषणात कुलगुरू मा डॉ अशोक ढवण म्‍हणाले की, पर्यावरण संतुलनात व जैवविविधता टिकविण्‍यात मधमाशांचा महत्‍वाचा भाग आहे. मनुष्‍याला मधुमक्षिक हया सतत कार्यमग्‍न राहतात तसेच एकोप्‍याने समुहाने राहतात, हे गुण मनुष्‍यास शिकण्‍यासारखा आहे. मधमाशांचे नैसर्गिक अधिवास वाढविणे गरजेचे असुन यासाठी विद्यापीठ शास्‍त्रज्ञांनी मधुमक्षिकापालनाबाबत जागृती करणे महत्‍वाचे आहे. विद्यापीठ परिसरात वृक्षलागवड करतांना मधुमक्षिकांच्‍या अधिवास वाढविण्‍याचाही विचार करण्‍यात आला. किमान २० टक्के क्षेत्रावर विविध वृक्षांची लागवड करावी. शेतकरी बांधवानीही मधुमक्षिकांच्‍या अधिवास वाढविण्‍याच्‍या दृष्‍टीने आपल्‍या शेतात विविध प्रकारच्‍या वृक्षांची लागवड करण्‍याचा त्‍यांनी सल्‍ला दिला.

मार्गदर्शनात डॉ लाखन सिंग म्‍हणाले की, मधमाशा या संपुर्णपणे समर्पक भावनेने आपणाला नेहमी काही ना काही देत असतात, त्‍यांचे संवर्धन करणे महत्‍वाचे आहे. मधुमक्षिकापालकांची एक साखळी तयार करण्‍याची गरज असल्‍याचे ते म्‍हणाले. डॉ धर्मराज गोखले यांनी मधुमक्षिकाचे शेतीत विविध पिकावरील परागीकरणात महत्‍व असुन पिकांना चांगल्‍या प्रकारे फळधारणा होण्‍यास मदत होते असे सांगितले तर डॉ देवराव देवसरकर यांनी मधुमक्षिकापालनातुन शेतीव्‍यतिरिक्‍त उत्‍पादन मिळु शकते असे सांगितले.

मधमाशांपासुन बहुगुणी मध व इतर उत्‍पादने यावर डॉ डी एम वाखळे यांनी तर डॉ पुरूषोत्‍तम नेहरकर यांनी मधमाशांच्‍या प्रजाती, कुटुंब व मधमाशी पालनात घ्‍यावयाची दक्षता, शुध्‍द मधाची चाचणी यावर मार्गदर्शन केले. 

कार्यक्रमाचे प्रास्‍ताविक डॉ संजीव बंटेवाड यांनी केले. सुत्रसंचालन डॉ किशोर झाडे यांनी तर आभार डॉ बसवराज भेदे यांनी मानले. कार्यक्रम यशस्‍वीतेसाठी डॉ पी आर झंवर, डॉ एस एस गोसलवाड, डॉ डी आर कदम, डॉ एम एम सोनकांबळे, डॉ ए जी लाड, डॉ एफ एस खान, डॉ धुरगुडे, डॉ बोकण, श्री ए एस खंदारे, श्री बदाले, टी जी शेंगुळे, अली अहमद, हारके आदींनी नियोजन केले. कार्यक्रमात औरंगाबाद जिल्‍हयातील व राज्‍यातील शेतकरी मोठया संख्‍यनेने ऑनलाईन पध्‍दतीने सहभागी झाले होते.

Tuesday, May 18, 2021

मराठवाडयातील कृषि विकासात परभणी कृषि विद्यापीठाचे पाच दशकात भरीव असे योगदान ..... ज्‍येष्‍ठ कृषि तज्ञ मा श्री विजयअण्‍णा बोराडे

विद्यापीठाच्‍या ४९ व्‍या वर्धापन दिनानिमित्‍त आयोजित ऑनलाईन खरीप शेतकरी मेळाव्‍यास शेतकरी बांधवाचा मोठा  प्रतिसाद

वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठ हे सुवर्ण महोत्‍सवी वर्षात पदार्पन करित आहे. गेल्‍या पाच दशकात विद्यापीठाने कृषि शिक्षण, संशोधन व विस्‍तार शिक्षणाच्‍या माध्‍यमातुन मराठवाडयातील कृषि विकासात भरीव असे योगदान दिले आहे, असे प्रतिपादन जालना येथील मराठवाडा शेती सहाय्य मंडळाचे विश्‍वस्‍त तथा ज्‍येष्‍ठ कृषि तज्ञ मा श्री विजयअण्‍णा बोराडे यांनी केले.

परभणी येथील वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठातील विस्‍तार शिक्षण संचालनालय व कृषि विभाग (महाराष्‍ट्र शासन) यांच्‍या संयुक्‍त विद्यमाने दिनांक १८ मे रोजी विद्यापी ४९ व्‍या वर्धापन दिनी ऑनलाईन खरिप शेतकरी मेळाव्‍याचे आयोजन आले होते, या मेळाव्‍याचे उदघाटन करतांना ते बोलत होते. ऑनलाईन मेळाव्‍याच्‍या अध्‍यक्षस्‍थानी कुलगुरू मा डॉ अशोक ढवण हे होते तर राहुरी येथील महात्‍मा फुले कृषि विद्यापीठाचे कुलगुरू मा डॉ प्रशांतकुमार पाटील व पुणे येथील कृषि तंत्रज्ञान उपयोजन संशोधन संस्‍थेचे संचालक मा डॉ लाखन सिंग यांची विशेष अतिथी म्‍हणुन उपस्थिती होती. कार्यक्रमास शिक्षण संचालक डॉ धर्मराज गोखलेसंशोधन संचालक डॉ दत्‍तप्रसाद वासकरविस्‍तार शिक्षण संचालक डॉ देवराव देवसरकर, परभणी जिल्‍हा अधिक्षक कृषि अधिकारी श्री संतोष आळसे आदींचा प्रमुख सहभाग होता.

मा श्री विजयअण्‍णा बोराडे पुढे म्‍हणाले की, मराठवाडयातील सोयाबीन, तुर, ज्‍वारी, मुग, बाजरी आदी मुख्‍य खरीप पिकांची विद्यापीठ विकसित अनेक वाण शेतक-यांमध्‍ये प्र‍चलित झाली आहेत. कपाशी मधील नांदेड ४४ हा वाण बीटी मध्‍ये परावर्तीत केला असुन यांचे मुबलक बियाणे शेतकरी बांधवाना मिळावे. विद्यापीठातील अनेक पदे रिक्‍त असल्‍यामुळे मनुष्‍यबळाची समस्‍या आहेत. परंतु हवामान बदलाच्‍या पार्श्‍वभुमीवर जलत गतीने कृषि संशोधन होणे गरजेचे आहे. बदलत्‍या हवामानास अनुकुल पिकांची वाण, तंत्रज्ञान निर्मिती करावी लागेल. मुख्‍य पिकांना पर्यायी पिकांचा विचार करावा लागेल, यात बाबु, बिब्‍बा, खजुर, जवस आदी सारख्‍या पिकांच्‍या लागवडीवर संशोधनाची गरज आहे. एकात्मिक शेती पध्‍दतीचे मॉडेल तयार करण्‍यात यावे. सेंद्रीय शेती कडे अनेक शेतकरी बांधव वळत आहे, संशोधनाच्‍या आधारे ठोस असे सेंद्रीय तंत्रज्ञान विकसित करावे, जेणे करून सेंद्रीय शेतीबाबत शेतक-यांची फसगत होणार नाही. मराठवाडयात रेशीम उद्योग, सुगंधी व औषधी वनस्‍पती लागवड यास मोठा वाव आहे. डिजिटल माध्‍यमातुन अनेक कृषि विषयक माहिती शेतक-यांपर्यत पोहचत आहे, परंतु माध्‍यमातुन चुकीची माहिती प्रसारीत होऊ नये याचीही काळजी घ्‍यावी लागेल, असे मत त्‍यांनी व्‍यक्‍त केले.

महात्‍मा फुले कृषि विद्यापीठाचे कुलगुरू  मा डॉ प्रशांतकुमार पाटील आपल्‍या भाषणात म्‍हणाले की, परभणी कृषि विद्यापीठ विकसित नांदेड ४४ या कपाशीच्‍या वाणाची लागवड संपुर्ण देशात केली जात होती, अनेक वर्ष या वाणाने शेतक-यांमध्‍ये मोठे अधिराज्‍य गाजवले. सध्‍या विद्यापीठ विकसित सोयाबीन व तुर पिकांची वाणे शेतक-यांमध्‍ये मोठया प्रमाणात प्र‍चलित आहेत. शेतकरी बांधवाना थेट बांधावर जाऊन मार्गदर्शन करण्‍यात करिता विद्यापीठ आपल्‍या दारी, तंत्रज्ञान शेतावरी हा नाविण्‍यपुर्ण तंत्रज्ञान विस्‍तार उपक्रम विद्यापीठाचा चांगला उपक्रम आहे.

अध्‍यक्षीय भाषणात कुलगुरू मा डॉ अशोक ढवण म्‍हणाले की, परभणी कृषि विद्यापीठ येणारे वर्ष स्‍थापनेचा सुवर्ण महोत्‍सवी वर्ष म्‍हणुन साजरा करीत आहे. गेल्‍या पाच दशकाच्या कार्यकाळात कृषि शिक्षणाच्‍या माध्‍यमातुन नव्‍वद हजार पेक्षा जास्‍त कुशल मनुष्‍यबळ निर्माण केले असुन विविध क्षेत्रात कृषिचे पदवीधर कार्य करून समाज उभारणीत आपआपले योगदान देत आहे. संशोधनाच्‍या माध्‍यमातुन शेतकरी उपयुक्‍त १४४ उन्‍नत वाण विकसित केले असुन ९०० पेक्षा जास्‍त पिक व्‍यवस्‍थापन, पिक संरक्षण, काढणी पश्‍चात हाताळणी व मुल्‍यवर्धन आदीबाबतीत सुधारित तंत्रज्ञान शिफारशी दिल्‍या आहेत तसेच ४६ कृषि यंत्रे व अवजारे विकसित केले आहेत. हवामान बदलाच्‍या पार्श्‍वभुमीवर संशोधनातही बदल करण्‍यात येत आहेत. कृषि संशोधन व कुशल मनुष्‍यबळ निर्मितीकरिता देशातील अनेक अग्रगण्‍य संस्थेशी विद्यापीठाने सामजंस्‍य करार केले आहेत. रासायनिक खतांचा वाढता खर्च पाहाता, खतांची कार्यक्षम वापर करिता प्रयत्‍न करावे लागतील. पिक वाढीकरिता विद्यापीठ निर्मित जैविक उत्‍पादने बायोमिक्‍स, जैविक खते आदीचा शेतकरी बांधव मोठा उपयोग करित आहेत, ही उत्‍पादने पर्यावरण पुरक असुन कमी खर्चिक असल्‍याचे ते म्‍हणाले.

मा डॉ लाखन सिंग आपल्‍या भाषणात म्‍हणाले की, कोरोना रोगाच्‍या प्रादुर्भावातही परभणी कृषि विद्यापीठाचे कार्य अविरत चालु असुन शेतकरी बांधवाच्‍या गरजेनुसार तंत्रज्ञान व मार्गदर्शन विद्यापीठ शास्‍त्रज्ञ विविध माध्‍यमातुन करतात. तसेच परभणी जिल्‍हा अधिक्षक कृषि अधिकारी श्री संतोष आळसे यांनी आपल्‍या मनोगतात खरीप हंगामातील कृषि विभागाच्‍या विविध योजनांचा शेतकरी बांधवांना लाभ घेण्‍याचे आवाहन केले. प्रास्‍ताविकात डॉ डी बी देवसरकर यांनी शेतकरी बांधवानी सोयाबीनचे स्‍वत:च्‍या घरचे बियाणे उगवण क्षमता तपासुन वापरण्‍याचा सल्‍ला दिला.

ऑनलाईन तांत्रिक सत्रात कापुस लागवडीवर डॉ ए जी पंडागळे, सोयाबीन लागवडीवर डॉ एस पी म्‍हेत्रे, कडधान्‍य लागवडीवर डॉ डी के पाटील, खरीप पिकांतील एकात्मिक कीड व्‍यवस्‍थापनावर डॉ पी आर झंवर, खरीप पिकात कृषि यंत्रे व अवजारांचा वापर यावर डॉ स्मिता सोळंकी, हवामान अनुकुल शेती यावर डॉ कैलास डाखोरे आदींनी मार्गदर्शन केले. तसेच शेतकरी बांधवाच्‍या कृषि विषयक प्रश्‍नांना विद्यापीठ शास्‍त्रज्ञांनी उत्‍तरे दिली. 

कार्यक्रमात मा डॉ अशोक ढवण यांच्‍या हस्‍ते सामुदायिक विज्ञान महाविद्यालयातील शास्‍त्रज्ञांनी विकसित केलेले महिला शेतक-यांसाठी तंत्रज्ञान या मोबाईल अॅपचे विमोचन करण्‍यात आले. कार्यक्रमाचे सुत्रसंचालन डॉ विणा भालेराव व डॉ प्रविण कापसे यांनी केले तर आभार मुख्‍य विस्‍तार शिक्षण अधिकारी डॉ व्‍ही बी कांबळे यांनी मानले. सदरिल मेळावा ऑनलाईन घेण्‍याकरिता तांत्रिक सहाय्य नाहेप प्रकल्‍पाचे प्रमुख अन्‍वेषक डॉ गोपाल शिंदे यांच्‍या मार्गदर्शनाखाली डॉ. अविनाश काकडे, श्री. रवीकुमार कल्लोजी, इंजि. खेमचंद कापगाते, डॉ. अनिकेत वाईकर आदींनी सहकार्य केले. सदरिल ऑनलाईन मेळाव्‍यास मराठवाडयातील सर्व जिल्‍हातुन शेतकरी बांधवांनी मोठा सहभाग नोंदविला. संपुर्ण कार्यक्रमाचे विद्यापीठाच्‍या युटयुब चॅनेल https://www.youtube.com/user/vnmkv वर उपलब्ध आहे.

Sunday, May 16, 2021

वनामकृवि निर्मित बियाणे जुन महिन्‍याच्‍या पहिल्‍या आठवडयात विक्री करिता उपलब्‍ध होणार

परभणी येथील वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठाच्‍या वतीने विद्यापीठ वर्धापन दिनानिमित्त दरवर्षी १८ मे रोजी खरीप शेतकरी मेळाव्याचे आयोजन करण्यात येते. परंतु करोना रोगाचा प्राद्रुर्भाव व लॉकडाऊन परिस्थिती लक्षात घेता या वर्षी १८ मे रोजी ऑनलाईन खरीप शेतकरी मेळाव्‍याचे आयोजन करण्यात आले आहे. विद्यापीठ निर्मित विविध पिकांच्‍या वाणांचे खरीप बियाणे मराठवाडयातील शेतक­-यांना उपलब्ध होण्‍याच्‍या दृष्‍टीने विद्यापीठ कार्यक्षेञातील जिल्हयातील कार्यरत असलेल्या कृषि विज्ञान केंद्रे, संशोधन केंद्रे, कृषि महाविद्यालये यांचे मार्फत माहे जुन महिन्‍याच्‍या पहिल्‍या आठवडयात बियाणे विक्रीस उपलब्ध करुन देण्यात येणार असल्‍याची माहिती सहयोगी संचालक (बियाणे) यांनी दिली आहे.

बियाणे विक्री केद्रांची नावे खालीलप्रमाणे

परभणी येथील विद्यापीठातील बीज प्रक्रिया केंद्र, औरंगाबाद, बदनापुर (जिल्‍हा जालना), खामगांव (जिल्‍हा बीड) व तुळजापुर (जिल्‍हा उस्‍मानाबाद) येथील कृषि विज्ञान केंद्र तसेच कृषि महाविद्यालय, गोळेगांव (जिल्‍हा हिंगोली) व कृषि महाविद्यालय, अंबाजोगाई (जिल्‍हा बीड), नांदेड येथील कापुस संशोधन केंद्र व लातुर येथील गळीत धान्‍य संशोधन केंद्र या ठिकाणी बियाणे जुन महिन्‍याच्‍या पहिल्‍या आठवडयात विक्रीस उपब्‍लध होणार आहे.  

Wednesday, May 12, 2021

वनामकृविच्या वतीने ऑनलाईन खरिप शेतकरी मेळाव्याचे आयोजन

विद्यापीठाच्‍या ४९ व्‍या वर्धापन दिनानिमित्‍त कार्यक्रमाचे आयोजन 

परभणी येथील वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठातील विस्‍तार शिक्षण संचालनालयाच्‍या वतीने दिनांक १८ मे रोजी विद्यापीवर्धापन दिनानिमित्‍त दरवर्षी खरीप शेतकरी मेळाव्‍याचे आयोजन करून साजरा करण्‍यात येतो. परंतु यावर्षी करोना रोगाचा प्रादुर्भावाच्‍या पार्श्‍वभुमीवर यावर्षीचा ऑनलाईन खरिप शेतकरी मेळाव्‍याचे आयोजन मंगळवार दिनांक १८ मे रोजी सकाळी ११.०० वाजता करण्‍यात आले आहे. 

ऑनलाईन मेळाव्‍याच्‍या अध्‍यक्षस्‍थानी कुलगुरू मा डॉ अशोक ढवण हे राहणार असुन प्रमुख तिथी तथा उदघाटक म्‍हणुन जालना येथील मराठवाडा शेती सहाय्य मंडळाचे विश्‍वस्‍त तथा ज्‍येष्‍ठ कृषि तज्ञ मा श्री विजयअण्‍णा बोराडे हे सहभागी होणार आहेत तर पुणे येथील कृषि तंत्रज्ञान उपयोजन संशोधन संस्‍थेचे संचालक मा डॉ लाखन सिंग यांची विशेष अतिथी म्‍हणुन उपस्थिती लाभणार आहे. कार्यक्रमास शिक्षण संचालक डॉ धर्मराज गोखले, संशोधन संचालक डॉ दत्‍तप्रसाद वासकर, विस्‍तार शिक्षण संचालक डॉ देवराव देवसरकर आदींचा सहभाग राहणार आहे.

कार्यक्रमाचे आयोजन झुम मि‍टींग सॉफ्टवेअरच्‍या माध्‍यमातुन करण्‍यात येणार असुन शेतकरी बांधवानी झुम मिटींग सॉफ्टवेअर आपल्‍या मोबाईल मध्‍ये डाऊनलोड करून मिटिंग आयडी ९५३ ३९३ ३३६१ वर पासवर्ड १२३४ टाकुन सहभाग नोंदवावा. सदरिल कार्यक्रमात विद्यापीठ शास्‍त्रज्ञ खरिप हंगामातील कापुस, सोयाबीन, तुर लागवड तंत्रज्ञान व इतर कृषि तंत्रज्ञानावर मार्गदर्शन करणार असुन सहभागी शेतक-यांच्‍या निवडक प्रश्‍नांना विद्यापीठ शास्‍त्रज्ञ उत्‍तर देणार आहेत. तरी सदरिल ऑनलाईन मेळाव्‍यास शेतकरी बांधवानी सहभागी व्‍हावे, असे आवाहन विस्‍तार शिक्षण संचालक डॉ देवराव देवसरकर, मुख्‍य विस्‍तार शिक्षण अधिकारी डॉ व्‍ही बी कांबळे व  जिल्‍हा अधिक्षक कृषि अधिकारी श्री संतोष आळसे यांनी केले आहे. या संपुर्ण कार्यक्रमाचे प्रक्षेपण विद्यापीठाच्‍या युटयुब चॅनेल https://www.youtube.com/user/vnmkv वर उपलब्ध होणार आहे.

Zoom Meeting ID: ९५३ ३९३ ३३६१ Password: १२३४

Monday, May 3, 2021

सामुदायिक विज्ञान महाविद्यालयात आयोजित राज्यस्तरीय ऑनलाइन उन्हाळी शिबिरास उत्स्फूर्त प्रतिसाद

वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठातील सामुदायिक विज्ञान महाविद्यालया अंतर्गत मानव विकास व कौटुंबिक अभ्यास विभागातर्फे दिनांक ७ ते ३० एप्रिल दरम्यान चार ते आठ वर्षे वयोगटातील बालक व त्‍यांच्‍या पालकां करिता ऑनलाइन राज्यस्तरीय उन्हाळी शिबिराचे  करण्‍यात आले होते. या शिबिराचा समारोप दिनांक 30 एप्रिल रोजी संपन्‍न झाला.  

समारोपीय कार्यक्रमाच्या अध्यक्षस्‍थानी सहयोगी अधिष्ठाता डॉ. जयश्री झेंड या होत्‍या तर आयोजिका मानव विकास विभाग प्रमुख डॉ. जया बंगाळे व समन्‍वयक सहयोगी प्राध्यापिका डॉ. वीणा भालेराव यांची उपस्थिती होती.

शिबिरास पालकांचा तसेच बालकांचा अगदी भरभरून प्रतिसाद लाभला. संपूर्ण महाराष्ट्रातून अगदी कानाकोपऱ्यातून जसे की कोल्हापुर, इचलकरंजी, मुंबई, बुलढाणा, पुणे, चंद्रपूर, नागपूर, औरंगाबाद, जालना, परभणी तथा शहरी तसेच ग्रामीण भागातील मुलांनी देखील या शिबिराचा लाभ घेतला. 

शिबिरात बालकांसाठी प्रार्थना, चित्रकला, सृजनात्मक कृती, सामान्य ज्ञान, पाककला, विज्ञान अनुभव, शैक्षणिक मनोरंजक खेळ, जीवन कौशल्य विकसन, नाटिका, नैतिक कथा, गंमत कोडी आदी विविधांगी कृती घेण्यात आल्या. पालकांकरिता उत्कृष्ट पालकत्व, कोरोना काळामधील बालसंगोपनतील आव्हाने, वैदिक गणितीय संकल्पना, लेखनाची पूर्वतयारी या विषयांवर  मार्गदर्शन करण्यात आले. शिबिर कालावधीत आलेल्या विशेष दिन जसे की जागतिक आरोग्य दिन, पृथ्वी दिन याविषयी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करण्यात आले. बालकांचा सर्वांगीण विकास घडविण्या सोबतच अनेक मनोरंजक कृतीद्वारे त्यांना गुंतवून ठेवण्यात आले.

समारोपीय कार्यक्रमाच्‍या अध्‍यक्षीय भाषणात डॉ. जयश्री झेंड यांनी ऑनलाइन उपस्थित सर्व पालकांचे तसेच त्यांच्या बालकांचे उन्हाळी शिबिरा दरम्यान दर्शविलेल्या उत्साहाबद्दल कौतुक केले. कोरोना रोगाच्‍या प्रादुर्भाव परिस्थितीतही बालविकास घडविण्‍याबाबत तत्‍पर असलेल्‍या पालकांचे अभिनंदन केले. डॉ. जया बंगाळे यांनी पालकांना कुटुंबातील आजी-आजोबांचे महत्व विशद केले तसेच पालकांनी कोरोनाच्या संकट काळात बालकांची  योग्य काळजी घेण्याविषयी आवाहन केले. या प्रसंगी डॉ. वीणा भालेराव यांनी संपूर्ण उन्हाळी शिबिराचा आढावा सादर केला.

शिबिर यशस्वितेसाठी प्रायोगिक पूर्व प्राथमिक शाळेच्या शिक्षिका श्रीमती श्रुती औंढेकर, श्रीमती वैशाली जोशी, श्रीमती मीना सालगोडे, श्रीमती वर्षा लोंढे यांनी विशेष परिश्रम घेतले. शिबिराचा जवळपास ९५ विद्यार्थ्यांनी लाभ घेतला. पालकांनी तथा बालकांनी त्यांच्या मनोगताद्वारे कोरोना काळात  शाळा बंद असताना या शिबिराच्या माध्यमातून मुलांना खूप काही नवीन गोष्टी हसत खेळत शिकण्याची संधी मिळाल्याबद्दल समाधान व्यक्त केले.