Pages

Sunday, June 27, 2021

अन्‍न प्रक्रियातील संशोधन व विकास कार्यासाठी वनामकृवितील अन्नतंत्र महाविद्यालय आणि बारामती कृषी विज्ञान केंद्र यांच्यात सामंजस्य करार

राज्‍यातील अन्न प्रक्रिया उद्योगाच्या विकासासाठी परभणी कृषि विद्यापीठाचे तांत्रिक सहकार्य 

भारत सरकारच्या अन्न प्रकिया उद्योग मंत्रालयाने आत्मनिर्भर भारत अभियानांतर्गत प्रधानमंत्री सुक्ष्‍मखाद्य उद्योग उन्नयन योजना (पीएम-एफएमइ) राबविण्यासाठी वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठातील परभणी येथील अन्नतंत्र महाविद्यालयास तांत्रिक सहकार्य करण्याबाबत शासनस्तरावरून सूचित करण्यात आलेले आहे. या पार्श्वभूमीवर बारामती (जिल्हा पुणे) येथील कृषि विज्ञान केंद्र व अन्नतंत्र महाविद्यालय, परभणी या दोन संस्थेमध्ये अन्‍न प्रक्रियेतील संशोधन, विस्तार कार्य आणि राज्यात प्रधानमंत्री सुक्ष्‍मखाद्य उद्योग उन्नयन योजना प्रभावीपणे राबविण्याच्या उद्देशाने दिनांक २५ जुन रोजी कुलगुरू मा डॉ अशोक ढवण यांच्‍या प्रमुख उपस्थितीत सामंजस्य करार करण्यात आला. यावेळी शिक्षण संचालक डॉ. धर्मराज गोखले, सहयोगी अधिष्ठाता डॉ. उदय खोडके, कृषी विज्ञान केंद्राच्‍या संस्‍थेचे समन्‍वयक डॉ. मिलिंद जोशी आदीची उपस्थिती होती. सदरिल सामजंस्‍य करारावर अन्नतंत्र महाविद्यालयातर्फे सहयोगी अधिष्ठाता डॉ. उदय खोडके यांनी तर कृषी विज्ञान केंद्र बारामती यांचे तर्फे संस्थेचे समन्वयक डॉ. मिलिंद जोशी यांनी स्वाक्षरी केली.

याप्रसंगी बोलतांना कुलगुरू मा डॉ अशोक ढवण म्‍हणाले की, प्रधानमंत्री सुक्ष्‍मखाद्य उद्योग उन्नयन योजना प्रभावीपणे राबविण्यासाठी बारामती येथील कृषि विज्ञान केंद्र व विद्यापीठातील अन्नतंत्र महाविद्यालय दोन संस्थेकडे अनेक बलस्थाने असुन या दोन्‍ही संस्‍थेतील चांगल्‍या सोयीसुविधा, कुशल मनुष्यबळ आणि विकसित केलेलं अन्‍न प्रक्रिया तंत्रज्ञान यांचे आदानप्रदानामुळे राज्‍यातील अन्न प्रक्रिया उद्योगाच्या विकासासाठी चांगला हातभार लागेल.

भारत सरकारच्या अन्न प्रकिया उद्योग मंत्रालयाने आत्मनिर्भर भारत अभियानांतर्गत प्रधानमंत्री सुक्ष्‍मखाद्य उद्योग उन्नयन योजना सन २०२१-२०२५ या पाच वर्षांच्या कालावधीसाठी राबविण्याचे नियोजित केले आहे. ही योजना राबविण्यामागे असंघटीत क्षेत्रातील उद्योगाचे बळकटीकरण करणे, कौशल्य व मनुष्यबळ विकास करणे, अन्न प्रक्रिया उद्योगामध्ये नवीन तंत्रज्ञान व यंत्रसामुग्री यांचा अंतर्भाव करणे, अन्नसुरक्षा नियंत्रण व्यवस्था निर्माण करणे इत्यादी उद्धेश आहेत. त्या अनुषंगाने केंद्र शासनाकडून योजनेच्या मार्गदर्शक सूचना प्राप्त झालेल्या आहेत. सदर योजनेंतर्गत सद्यस्थितीत अस्तित्वात असलेल्या व नव्याने समाविष्ट होणाऱ्या योजना, अन्नप्रकिया उद्योजक यांचे प्रशिक्षण, मनुष्यबळ विकास करणे, तसेच प्रक्रिया उद्योग प्रकल्प उभारणी करीता आवश्यक असणारे परवाने, परवानगी, मंजुरी इत्यादी देण्यासाठी महाराष्ट्र शासनस्तरावर कृषी आयुक्तालय येथे नोडल विभाग कार्यान्वित करण्यात आलेला आहे. या योजनेच्या अंमलबजावणीसाठी बारामती (जिल्हा पुणे) येथील कृषी विज्ञान केंद्र यांची “राज्यस्तरीय तांत्रिक संस्था” म्हणून नामनिर्देशन करण्यात आलेले आहे. तसेच विद्यापीठातील अन्नतंत्र महाविद्यालय हे अन्नतंत्र व प्रक्रिया क्षेत्रातील अग्रगण्य संस्‍था असुन सोयीसुविधांनी युक्त असलेली व जुनी संस्था म्हणून सन १९७५ पासून कार्यरत आहे. या महाविद्यालयात देशास व राज्यास अनेक अन्न प्रक्रिया क्षेत्रातील उद्योजक घडले, व अन्न प्रक्रिया उद्योग उभारणीसाठी तांत्रिक मदत करण्यात या महाविद्यालयाचा सिंहाचा वाटा आहे. महाविद्यालयातील पदवीधर देशभरातील अनेक प्रक्रिया उद्योगात उच्‍च पदावर कार्यरत असून या उद्योगात भरीव योगदान देत आहे. अन्नतंत्र महाविद्यालयाने संशोधन कार्यातून अनेक अन्न प्रक्रिया व तंत्रज्ञान विकसित केलेले असून त्यांच्या शिफारसी केलेल्या आहेत व उद्योगामध्ये त्यांचा वापर होत आहे. याप्रसंगी महाविद्यालयातील विभाग प्रमुख डॉ. राजेश क्षीरसागर, प्रा. दिलीप मोरे, प्रा. हेमंत देशपांडे, डॉ. कैलाश गाढे, डॉ. विजया पवार, डॉ. आगरकर आदीसह इतर प्राध्यापक व कर्मचारी उपस्थित होते.