लातूर कृषि महाविद्यालयात आयोजित राष्ट्रीय परिसंवादात प्रतिपादन
आज शेती क्षेत्रापुढे
अनेक समस्या आहेत तसेच अनेक संधी देखील आहेत, देश अन्नधान्याच्या बाबतीत
स्वयंपूर्ण होऊन अतिरिक्त धान्य निर्मिती करित आहे. दर्जेदार व किफायतशीर
अन्नधान्य निर्मितीचे आपले ध्येय असले पाहिजे. सुरक्षित अन्न पोषणाचे ध्येय साध्य
करण्यासाठी शेतीत रासायनिक किडनाशक व रोगनाशकांचा अतिरेकी वापर टाळणे
अत्यावश्यक आहे. शाश्वत शेतीसाठी अन्नद्रव्य व्यवस्थापना बरोबरच जैवतंत्रज्ञान,
नॅनो तंत्रज्ञान, माहिती तंत्रज्ञान इत्यादींचा कृषि विकासासाठी अवलंब करणे गरजेचे
आहे, असे मत कुलगुरू मा डॉ अशोक ढवण यांनी व्यक्त केले. वसंतराव नाईक मराठवाडा
कृषि विद्यापीठाचे सुवर्ण महोत्सवी वर्ष, नवी दिल्ली येथील भारतीय वनस्पती
रोगशास्त्र संस्थेचे अमृत महोत्सवी वर्ष आणि भारतीय स्वातंत्र्याच्या अमृत
महोत्सवी वर्षाचे औचित्य साधून दिनांक 17 व 18 नोव्हेंबर रोजी शाश्वत पीक उत्पादनाकरिता अन्नद्रव्य व्यवस्थापन आणि पीक
संरक्षण यावर दोन दिवसीय राष्ट्रीय परिसंवादाचेए लातूर येथील कृषि महाविद्यालयात
आज उद्घाटन झाले या परिसंवादाच्या अध्यक्षीय समारोपात ते बोलत होते.
कार्यक्रमास प्रमुख
पाहूणे म्हणून नॅचरल शुगर व संलग्न उद्योग समुहाचे अध्यक्ष कृषिभुषण मा बी बी ठोंबरे
हे होते व्यासपीठावर संचालक शिक्षण डॉ धर्मराज गोखले, नवी दिल्ली येथील भारतीय पीक
रोगशास्त्र संस्थेच्या अध्यक्षा डॉ प्रतिभा शर्मा, सचिव डॉ रॉबिन गोगाई, अकोला
येथील डॉ पंजाबराव देशमुख कृषि विद्यापीठाचे विस्तार शिक्षण संचालक डॉ आर एम गाडे,
कुलसचिव डॉ धीरजकुमार कदम, परिसंवादाचे आयोजक कृषि महाविद्यालयाचे सहयोगी
अधिष्ठाता डॉ अंगद सुर्यवंशी, विलासराव देशमुख कृषि जैवतंत्रज्ञान महाविद्यालयाचे
सहयोगी अधिष्ठाता प्रा हेमंत पाटील, विभाग प्रमुख डॉ कल्याण आपेट, माजी विभाग
प्रमुख डॉ व्ही व्ही दातार, सचिव डॉ चंद्रशेखर अंबाडकर आदींची प्रमुख उपस्थिती
होती.
कुलगुरू मा डॉ अशोक ढवण पुढे
म्हणाले कि, किटकशास्त्रज्ञ, वनस्पती रोगशास्त्रज्ञ, कृषि विद्या, मृदा शास्त्रज्ञ
आणि अनुषंगीक कृषि शाखांनी वाढत्या लोकसंख्येला पोषक व सुरक्षित अन्नपुरवठा
करण्यासाठी एकत्रित संशोधन करणे आवश्यक आहे. सदरील परिसंवादातून शाश्वत शेती
उत्पन्नाचे धोरण निश्चित करण्यासाठी पीक शास्त्रज्ञांनी वाढत्या लोकसंख्येला पोषक
व सुरक्षित अन्न पुरवठा करण्यासाठी एकत्रित संशोधन करणे आवश्यक आहे.
मार्गदर्शनात कृषिभुषण
मा श्री बी बी ठोंबरे म्हणाले कि, आज देश अन्नधान्य व चारा पीकात स्वयंपूर्ण झाला
आहे, परंतू जगभर इंधन तुटवाडयाची गंभीर समस्या जाणवत आहे. भारत देश लौकिक अर्थाने
आत्मनिर्भर करण्यासाठी कृषि शास्त्रज्ञांनी शेतीतील टाकावू पदार्थापासून व इतर
वनस्पतीपासून जैवइंधन निर्मितीचे तंत्रज्ञान विकसित करणे ही काळाची निकड आहे.
परिसंवादात भारत सरकारचे
माजी कृषि आयुक्त तथा माजी कुलगुरू मा डॉ चारूदत्त मायी यांनी आभासी माध्यमाद्वारे
उपस्थितांना मार्गदर्शन केले. मार्गदर्शनात ते म्हणाले की, प्राप्त परिस्थितीत
विविध पीकांवर नवीन रोगांचा प्रादुर्भाव होत असून त्यामुळे सुमारे 25 टक्के
लोकसंख्येला पुरेल इतक्या अन्नधान्यांची नासाडी व नुकसान होत आहे, त्यामुळे
पीकांवरील विविध रोग व किडींच्या व्यवस्थापनासाठी रसायनांचा अतिरेकी वापर टाळून
जैविक किड व रोगनाशकांचा सरसकट वापर करणे अत्यावश्यक आहे.
याप्रसंगी डॉ प्रतिभा शर्मा यांनी भारतीय पीक रोगशास्त्र संस्थेच्या कारर्किदीचा लेखाजोखा मांडला तर डॉ रॉबिन गोगोई यांनी या संस्थेच्या विविध क्षेत्रातील विशेषत: रोगशास्त्रातील संशोधन कार्याचा आढावा दिला. कार्यक्रमाचे सुत्रसंचालन डॉ दयानंद मोरे यांनी केले तर आभार डॉ चंद्रशेखर अंबाडकर यांनी मानले. कार्यक्रमात विद्यापीठातून सेवानिवृत्त झालेल्या अधिकारी, शास्त्रज्ञ, प्राध्यापक यांचा सत्कार मान्यवरांच्या हस्ते करण्यात आला. सदरिल दोन दिवसीय परिसंवादात राज्यातील चारही कृषि विद्यापीठातील तसेच गुजरात व गोवा राज्यातील कृषि शास्त्रज्ञ, अभ्यासक, प्राध्यापक, कृषि उद्योजक, विद्यार्थी, प्रगतशील शेतकरी आदींनी सहभाग नोंदविला असुन परिसंवादात पीक संरक्षणावर मंथन करणार आहे. परिसंवादाचे आयोजन सचिव लातूर कृषि महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ अंगद सुर्यवंशी, सहसचिव डॉ चंद्रशेखर अबाडकर, स्थानिक आयोजन समितीचे चेअरमन डॉ आनंद कारले हे असून परिसंवादाचे आयोजन लातूर कृषि महाविद्यालय कै विलासराव देशमुख कृषि जैवतंत्रज्ञान महाविद्यालय, कृषितंत्र विद्यालय, गळीत धान्य संशोधन केंद्र येथील प्राध्यापक, अधिकारी व कर्मचारी यांच्या सहकार्याने करण्यात आले आहे.