Pages

Saturday, February 5, 2022

परभणी कृषि महाविद्यालयाच्‍या वतीने लोकशाही पंधरवडा निमित्त आयोजित ऑनलाईन वेबीनारला उत्‍स्फुर्त प्रतिसाद

वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठातील परभणी कृषि महाविद्यालयाच्‍या राष्‍ट्रीय सेवा योजनंतर्गत लोकशाही पंधरवडा निमित्त दिनांक ४ फेब्रुवारी रोजी लोकशाही शासनव्‍यवस्‍था व भारत यावर ऑनलाईन वेबीनारचे आयोजन करण्‍यात आले होते. कार्यक्रमात श्री शिवाजी विधी महाविद्यालयातील सामाजिक शास्त्रे विभागाच्‍या विभाग प्रमुख डॉ. शकुंतला जवंजाळ यांनी मार्गदर्शन केले, अध्‍यक्षस्‍थानी शिक्षण संचालक डॉ धर्मराज गोखले हे होते तर प्राचार्य डॉ सय्यद ईस्‍माईल यांची प्रमुख उपस्थिती होती.

मार्गदर्शनात डॉ. शकुंतला जवंजाळ म्‍हणाल्‍या की, सुजाण नागरीकांमुळेच भारतीय लोकशाही अधिक बळकट होईल. स्वातंत्र्य, समता आणि बंधूता या तीन तत्त्वावर भारतीय लोकशाही अवलंबुन असुन सामाजिक स्तरावर या गोष्‍टी रूजवणे गरजेचे आहे. शाहु, फुले, आंबेडकर विचारांची उजळणी वेळोवेळी करण्‍याची आवश्‍यकता असल्‍याचे मत त्‍यांनी व्‍यक्‍त केले.

प्रास्‍ताविक प्राचार्य डॉ सय्यद ईस्‍माईल यांनी केले तर सुत्रसंचालन रा.से.यो. कार्यक्रम अधिकारी डॉ. अनुराधा लाड यांनी केले. २६ जानेवारी ते १० फेब्रुवारी दरम्‍यान लोकशाही पंधरवडा निमित्‍त महाविद्यालयाच्‍या वतीने निबंध लेखन, रांगोळी स्पर्धा, ऑनलाईन वेबीनार, वादविवाद, कविता वाचन आदी लोकशाही विषयी जागरूकता कार्यक्रम घेण्यात येत आहेत. ऑनलाईन वेबीनार मध्‍ये ३५० पेक्षा जास्‍त विद्यापीठातील प्राध्यापक वृंद आणि विद्यार्थी सहभागी झाले होते.