Pages

Friday, February 11, 2022

बालपणापासूनच अर्थ साक्षरतेचे धडे गिरवणे आवश्यक ....... डॉ.माधुरी कुलकर्णी

सामुदायिक विज्ञान महाविद्यालयातर्फे महिला सक्षमीकरण उपक्रम

परभणी येथील वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठातील सामुदायिक विज्ञान महाविद्यालयाच्या वतीने भारतीय स्वातंत्र्याच्या अमृतमहोत्सवा निमित्त विविध उपक्रमाचे आयोजन करण्यात येत असुन याचाच एक भाग म्हणून अर्थ साक्षरतेतून महिला सक्षमीकरण या विषयावर दिनांक १० फेब्रवारी रोजी मौजे दैठणा येथे व्‍याख्‍यानाचे आयोजन करण्‍यात आले होते. कार्यक्रमास विभाग प्रमुख डॉ.माधुरी कुलकर्णी, सरपंच सौ. उज्वला कच्छवे, समन्वयक विभाग प्रमुख डॉ. शंकर पुरी आदींची प्रमुख उपस्थिती होती. 

कार्यक्रमात कौटुंबिक व्यवहारचातुर्याबाबत मार्गदर्शन करतांना डॉ.माधुरी कुलकर्णी म्‍हणाल्‍या की, कुटुंबातील प्रत्येक व्यक्ती ही अर्थ साक्षर होण्यासाठी बालपणापासूनच त्यांना आर्थिक व्यवहार करण्याची संधी मिळणे आवश्यक आहे. घरामध्ये वस्तू खरेदी करण्यासाठी कर्त्या व्यक्तीने दिलेल्या रकमेतून महिलांनी कमीत कमी दहा टक्के रक्कम शिल्लक ठेवून जमा करावी आणि जेव्हा कर्त्या व्यक्तीस आर्थिक गरज असेल त्यावेळेस त्यांना ती द्यावी, मुलांना बालपणापासूनच लहान वस्तू खरेदी करण्यासाठी त्यांच्या हाती छोटी रक्कम द्यावी यामुळे मुले पैशाच्या वापराबाबत सजग होऊन त्यांच्यात व्यवहारचातुर्य निर्माण होते. कुटुंबामध्ये होणारी अनावश्यक खरेदी तसेच लग्नसमारंभातील देवाणघेवाण टाळल्यास पैशाची बचत होण्यास मदत होते. अन्नधान्याचा काटकसरीने वापर करावा वीज, पाणी यांचाही मोजकाच वापर करावा. जे काम स्वतःला करणे शक्य असेल जसे की भांडे, कपडे धुणे, घरचे कपडे शिवणे, बागकाम इत्यादी कामे स्वतः  करून कुटुंबाच्या खर्चमध्ये बचत करण्‍याचा सल्‍ला त्‍यांनी दिला.

याप्रसंगी डॉ. शंकर पुरी यांनी महिला सक्षमीकरणासाठी उत्पादन वाढीबरोबरच उत्पन्न वाढीवर भर देऊन नफा किंवा बचत करणे आवश्यक असल्याचे विशद करून उत्पादन खर्च कमी करण्याचे आवाहन केले. तसेच आयसीडीएसच्‍या पर्यवेक्षिका सौ. नीलू चव्हाण यांनी बालविवाहाचे दुष्परिणाम सांगतांना बाल विवाहामुळे कमी वयात कुटुंबाची जबाबदारी महिलेवर येते. त्यावेळेस तिचा अर्थ साक्षरते बाबतचा अनुभव फारच कमी असतो, याकरिता बालविवाह टाळावे असे स्पष्ट केले.

सरपंच सौ. उज्वला कच्छवे यांनी गावातील महिलांनी उद्योग उभारणी करावी तसेच अर्थ साक्षरतेबाबतच्या सर्व बाबी आत्मसात कराव्यात असे प्रतिपादन केले. कार्यक्रमात सहभागी महिला सौ. अनिता कुलकर्णी आणि सौ. शितल कच्छवे यांनी कार्यक्रमाविषयी प्रतिक्रिया व्यक्त केल्या तर आभार सौ विद्या धोंडारकर यांनी मानले. कार्यक्रमाचे आयोजन प्राचार्या डॉ. जया बंगाळे यांच्या मार्गदर्शनाखाली समन्वयक डॉ. शंकर पुरी, विभाग प्रमुख यांनी केले. कार्यक्रमांस महिलांनी मोठ्या संख्येने उत्स्फुर्त सहभाग नोंदविला. कार्यक्रम यशस्वीतेसाठी अखिल भारतीय समन्वयित संशोधन प्रकल्पाच्‍या संगीता नाईक, जोत्स्ना नेर्लेकर, मंजूषा रेवनवार, शितल मोरे, धनश्री चव्हाण, मनीषा कराळे आदींनी विशेष परिश्रम घेतले.