Pages

Saturday, February 26, 2022

भारतीय शेतक-यांचे पारंपारीक ज्ञान व शेती पध्दती सेंद्रीय शेतीसाठी पूरक..... डॉ. के. अे. गोपीनाथ, केंद्रीय कोरडवाहू शेती संशोधन संस्था, हैद्राबाद

वनामकृवित आयोजित सेंद्रीय शेती प्रशिक्षणात प्रतिपादन 

वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठातील सेंद्रीय शेती संशोधन आणि प्रशिक्षण केंद्राच्‍या वतीने तीस दिवसीय राज्यस्तरीय सेंद्रीय शेती प्रशिक्षण कार्यक्रमाचे ऑनलाईन माध्यमातुन दिनांक १५ फेब्रुवारी ते ३१ मार्च दरम्यान आयोजन करण्यात आले असुन सदरिल प्रशिक्षणात दिनांक २५ फेब्रुवारी रोजी “सेंद्रीय शेतीसाठी गांडुळ खत व कंपोस्ट खत निर्मिती’’ यावर अकोला येथील डॉ पंजाबराव देशमुख कृषि विद्यापीठातील मृदाशास्‍त्रज्ञ डॉ. शाम जाधव व डॉ. नितीन कोंडे यांच्या व्याख्यानाने आयोजित करण्यात आले होते. कार्यक्रमाच्‍या अध्यक्षस्थानी हैद्राबाद येथील भाकृअप - केंद्रीय कोरडवाहू शेती संशोधन संस्थचे प्रमुख शास्त्रज्ञ (कृषिविद्या) डॉ. के. अे. गोपीनाथ हे होते तर मौजे राणीसावरगांव (ता.गंगाखेड, जि.परभणी) येथील प्रगतशील शेतकरी श्री. शिवप्रसाद कोरे, मौजे लोहगाव (ता.जि.परभणी) येथील प्रगतशील महिला शेतकरी कु. रेणुका सीताराम देशमुख, आयोजक प्रमुख अन्वेषक डॉ. आनंद गोरे, विभाग प्रमुख डॉ. स्मिता खोडके, डॉ. मिनाक्षी पाटील आदींची प्रमुख उपस्थिती होती. सदरिल प्रशिक्षण कार्यक्रमाचे आयोजन कुलगुरु मा. डॉ. अशोक ढवण संचालक संशोधन डॉ. दत्तप्रसाद वासकर यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आले आहे. 

अध्‍यक्षीय भाषणात डॉ. के. अे. गोपीनाथ म्‍हणाले की, सेंद्रीय शेतीत शास्त्रीय ज्ञान तसेच शेतकरी बांधवाचे अनुभव अत्यंत महत्‍वाचे आहेत. भारतीय शेतक-यांचे पारंपारीक ज्ञान व शेती पध्दती हे सेंद्रीय शेतीसाठी पुरकच आहेत. या ज्ञानाच्‍या बळावर आजपर्यंत आपण यशस्वीपणे शेती करत आलेलो आहोत. भारतीय शेतक-यांचे आंतर पीक पध्दती, पीक फेरपालट, शेती मशागतीच्या पध्दती, सेंद्रीय खत निर्मितीच्या पध्दती आदींचे पारंपारीक ज्ञानाचा सेंद्रीय शेती करतांना निश्चितच उपयोगी आहे. हे भारतीय शेतक-यांचे ज्ञान खुपच उपयोगी असल्‍याचे थोर शास्‍त्रज्ञ सर अल्बर्ट होवार्ड यांनीही नमुद केले आहे.

मार्गदर्शनात प्रमुख वक्ते डॉ. शाम जाधव म्हणाले की, जमिनीचे आरोग्य हे तीन बाबींवर अवलंबुन असुन यात जमिनीचे भौतिक, रासायनिक व जैविक गुणधर्माचा समोवेश होतो. भौतिक गुणधर्मात जमिनीची घनता, पाणी धरुन ठेवण्याची क्षमता, विविध पदार्थाचे प्रमाण याचा समावेश होतो तर रासायनिक गुणधर्मात जमिनीचा सामु, विद्युत वाहकता सेंद्रीय कर्ब उपलब्ध होणारे मुख्य व सुक्ष्म अन्नद्रव्याचा अंतर्भाव होतो. जैविक गुणधर्मात जमिनीमध्ये आढळणारी सुक्ष्मजीव तसेच गांडुळ व कृमी यांचा समावेश होतो. जमिनीचे आरोग्य सुस्थितीत राखण्यासाठी ही गुणधर्म योग्य स्थितीत असणे आवश्यक आहे. सेंद्रीय पदार्थाचे विघटन करण्यासाठी जमिनीतील सुक्ष्मजीव व इतर सजीव यांचा उपयोग होतो, ज्यामुळे पिकांना अन्नद्रव्य उपलब्ध होतात. यावेळी त्‍यांनी कंपोस्ट खत तयार करण्यासाठीच्या विविध पध्दती जसे नाडेप, इंदौर, पी.डी.के.व्ही. कंपोस्ट पध्दत यावर माहिती दिली.

डॉ. नितीन कोंडे म्‍हणाले की, जमिनीतील कर्ब वाढवणे सद्यस्थितीत महत्वाचे असुन मागील काही वर्षापासुन हवामानाच्या बदलामुळे अनियमीत पाऊस तसेच सोसाटयाचा वारा यामुळे जमिनीची धुप मोठया प्रमाणावर होत आहे, जमिनीवरचा अन्नद्रव्य भरपुर प्रमाणात असलेला मातीचा थर वाहुन जात असुन परिणामी पिकाचे उत्पादन घटत आहे. मातीची पाणी धरुन ठेवण्याची क्षमता व निच­याची क्षमता घटत चालली आहे. हे सर्व सुस्थितीत आणण्यासाठी जैविक खते जसे कंपोस्ट खत, गांडुळ खत, लेंडी खत वापरणे गरजेचे झाले आहे.

प्रगतशील शेतकरी श्री. शिवप्रसाद कोरे यांनी त्यांच्या सेंद्रीय टरबूज लागवडीबद्दलचे अनुभव सांगतांना म्‍हणाले की, सेंद्रीय पध्दतीने उत्पादित केलेले टरबुज दिर्घकाळ टिकते व खायला चविष्ट असतात. तर श्रीमती रेणुका सीताराम देशमुख आपल्‍या सेंद्रीय शेतीतील अनुभव सांगताना म्हणाल्या की, सेंद्रीय शेतीत गांडुळ खताचे महत्‍व आहे. माझ्या शेतावर तीन गुंठयावर गांडुळ खत प्रकल्प असुन वर्षाला शंभर टन गांडुळ खत निर्मिती होते, गांडुळ बीज शेतक­यांना पुरवते. चंद्रपुर जिल्हयातील आदिवासी शेतक­यांना गांडुळ खत निर्मितीचे प्रशिक्षण दिले असल्‍याचे त्‍यांनी सांगितले.

सदरिल ऑनलाईन व्‍याख्‍यानात दोन हजार पेक्षा अधिक शेतकरी बंधू भगिनी, विद्यार्थी, कृषि शास्त्रज्ञ, कृषि विज्ञान केंद्राचे विषय विशेषज्ञ आदींनी सहभाग नोंदविला होता. कार्यक्रमाचे सुत्रसंचलन डॉ. विशाल अवसरमल यांनी केले आणि आभार डॉ. पंकज ददगाळे यांनी मानले तर प्रा. शरद चेनलवाड यांनी संकलक म्हणुन काम पाहिले. कार्यक्रम यशस्वीतेसाठी डॉ. अनुराधा लाड, डॉ. संतोष बोरगावकर, डॉ. पपीता गौरखेडे, दिपक शिंदे, अभिजीत कदम, सतीश कटारे, योगेश थोरवट आदींनी परिश्रम घेतले.