Pages

Sunday, February 27, 2022

राष्ट्रीय विज्ञान दिनानिमित्त विज्ञानवारी २०२२ चे आयोजन

वनामकृवि आणि परभणी अस्‍ट्रोनोमिकल सोसायटी यांचा संयुक्‍त उपक्रम

देशाच्‍या स्‍वातंत्र्याचा अमृत महोत्‍सव आणि वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठाचे सुवर्ण महोत्‍सवी वर्षाचे औजित्‍य साधुन वसंतराव नाईक मराठवाडा कृषि  विद्यापीठ आणि परभणी अस्ट्रोनोमिकल सोसायटी यांच्या संयुक्त विद्यमाने राष्ट्रीय विज्ञान दिना निमित्त विज्ञानवारीचे २०२२ चे आयोजन करण्यात आले असुन दिनांक २८ फेब्रुवारी रोजी सकाळी ९ ते सायंकाळी ५ दरम्‍यान विद्यापीठाच्‍या नाहेप प्रकल्‍पाच्‍या सभागृहात विविध कार्यक्रम व विभागीय विज्ञान प्रदर्शनाचे आयोजन करण्‍यात आले आहे. दुपारी २.०० वाजता मार्गदर्शन व बक्षीस वितरणाच्‍या कार्यक्रमाचे आयोजन करण्‍यात आले असुन कार्यक्रमाच्‍या अध्‍यक्षस्‍थानी कुलगुरू मा डॉ अशोक ढवण हे राहणार असुन स्‍वागताध्‍यक्ष म्‍हणुन परभणी विधानसभेचे माननीय आमदार मा डॉ राहुल पाटील हे राहणार आहेत. विशेष अतिथी म्‍हणुन जिल्‍हाधिकारी मा श्रीमती आंचल गोयल, जिल्‍हा परिषदेचे मुख्‍य कार्यकारी अधिकारी मा श्री शिवानंद टाकसाळे, पोलिस अधिक्षक मा श्री जयंत मिना, महानगर पालिका आयुक्‍त मा श्री देविदास पवार आदी उपस्थित राहणार असुन शिक्षण संचालक डॉ धर्मराज गोखले, संशोधन संचालक डॉ दत्‍तप्रसाद वासकर, विस्‍तार शिक्षण संचालक डॉ देवराव देवसरकर, कुल‍सचिव डॉ धीरजकुमार कदम, परभणी अॅस्‍ट्रोनॉमीकल सोसायटीचे अध्‍यक्ष डॉ रामेश्‍वर नाईक आदींची प्रमुख उपस्थिती लाभणार आहे. 

विज्ञानवारीमध्ये विद्यापीठातील नाहेप प्रकल्‍पाच्‍या परिसरात विविध कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. यात तांबट पक्षा विषयी व जैवविविधता माहितीपट दाखविण्‍यात येणार असुन प्रकाशाच्या वर्णपट, थ्रीडी प्रिंटिंग तंत्रज्ञान यांत्रिक कलम संयंत्र, वसंतराव नाईक सभागृह कृषी विज्ञान विषयक चित्रफिती, ताऱ्यांचे विश्व, रोबोटिक्स, ड्रोन आणि आर्टिफिशियल इंटेलिजन्स, डोम प्लॅनेटोरियम शो (तारांगण), शालेय विद्यार्थ्यांचे विज्ञान प्रदर्शन चला शिकूया प्रयोगातून विज्ञान, कृषी प्रदर्शन, डे टाईम ॲस्ट्रॉनॉमी गणित आणि विज्ञान साहित्य, अंधश्रद्धा निर्मुलन दालन, कृत्रिम उपगृह प्रक्षेपण, संवाद शास्‍त्रज्ञांशी कार्यक्रम, चालता बोलता प्रश्न मंजुषा आदी उपक्रमाचे आयोजन करण्‍यात आले असुन दुपारी २ ते ३ वाजता समारोपीय कार्यक्रमात मान्‍यवरांच्‍या हस्‍ते बक्षीस वितरण होणार आहे. तरी सदरिल विज्ञानवारीत जास्तीत जास्त शिक्षक आणि विद्यार्थ्यांनी सहभाग घेण्‍याचे आवाहन संचालक शिक्षण डॉ धर्मराज गोखले, कुलसचिव धीरजकुमार कदम, अध्यक्ष डॉ रामेश्वर नाईक, उपाध्यक्ष पी आर पाटील, सचिव सुधीर सोनूनकर आदींनी केले आहे .

परभणी ऍस्ट्रोनॉमिकल सोसायटीच्या वतीने राष्ट्रीय विज्ञान दिनानिमित्त आयोजित विज्ञानवारी पूर्व परीक्षा २०२२ मराठवाड्यातील आठ जिल्ह्यांमधील निवडक शाळेत घेण्‍यात येऊन २५ विद्यार्थ्यांची निवड करण्यात आली. तसेच प्रश्नमंजुषा स्‍पर्धेतील विद्यार्थ्यांना विज्ञानवरी कार्यक्रमात मान्‍यवरांच्‍या हस्‍ते प्रमाणपत्र देऊन गौरविण्‍यात येणार आहे.