वनामकृवित आयोजित सेंद्रीय शेती प्रशिक्षणात प्रतिपादन
वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठातील सेंद्रीय शेती संशोधन आणि प्रशिक्षण केंद्राच्या वतीने तीस दिवसीय राज्यस्तरीय सेंद्रीय शेती प्रशिक्षण कार्यक्रमाचे ऑनलाईन माध्यमातुन दिनांक १५ फेब्रुवारी ते ३१ मार्च दरम्यान आयोजन करण्यात आले असुन सदरिल प्रशिक्षणात दिनांक २६ फेब्रुवारी रोजी “महाराष्ट्रासाठी शाश्वत सेंद्रीय शेती’’ या विषयावर अकोला येथील डॉ पंजाबराव देशमुख कृषि विद्यापीठातील कृषिविद्या विभागाचे विभाग प्रमुख डॉ. आदिनाथ पसलावार यांच्या व्याख्यानाचे आयोजन करण्यात आले होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी गोळेगांव कृषि महाविद्यालयाचे प्राचार्य तथा कृषिविद्या विभागाचे प्रमुख डॉ. भगवान आसेवार हे होते तर मौजे बोरगव्हाण (ता. पाथरी, जि. परभणी) येथील प्रगतशील शेतकरी श्री. वैभव खुडे, आयोजक प्रमुख अन्वेषक डॉ. आनंद गोरे, विभाग प्रमुख डॉ. स्मिता खोडके आदींची प्रमुख उपस्थिती होती. सदरिल प्रशिक्षण कार्यक्रमाचे आयोजन कुलगुरु मा. डॉ. अशोक ढवण व संचालक संशोधन डॉ. दत्तप्रसाद वासकर यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आले आहे.
अध्यक्षीय भाषणात डॉ. भगवान आसेवार यांनी प्रदुषणावर मात करण्यासाठी, जमिनीची सुपिकता वाढविण्यासाठी, जैवविविधता टिकविण्यासाठी आणि सकस - संतुलीत आहाराच्या उपलब्धतेसाठी सेंद्रीय शेती करणे आवश्यक असल्याचे सांगितले.
प्रमुख वक्ते डॉ. आदिनाथ पसलावार म्हणाले की, रासायनिक खतांचा व कीटकनाशकांचा अवाचवी वापर यामुळे पारंपारीक शेतीचा किफायतशीरपणा कमी झाला आहे. शेतकरी बांधवाचे स्वत:च्या शेतातील अनुभवातुन स्वत: शास्त्रज्ञ बनुन एकात्मिक पध्दतीने सेंद्रीय शेती केल्यास निश्चितच अधिक किफायतशीर होईल. सेंद्रीय शेतीत देशी वाणांची निवड, पिकांची फेरपालट, मुलस्थानी पालापाचोळा कुजवणे, जैव आच्छादनाचा वापर, सापळा पिकांचा वापर, जैविक किटकनाशकांचा वापर करुन उत्पादन वाढ करता येते, असे सांगुन त्यांनी दशपर्णी अर्क, पंचगव्य, बीजामृत, जीवामृत आदींचे महत्व सांगितले.
प्रगतशील शेतकरी श्री. वैभव खुडे यांनी सेंद्रीय पध्दतीने रेशीम उद्योगा बाबतचे स्वत: चे अनुभव सांगितले. त्यांनी बचतगटाच्या माध्यमातुन रेशीम उद्योगासोबतच शेळीपालन, कुक्कुटपालन, दुग्धोत्पादन आदीं पुरक व्यवसायांची जोडी दिली असुन सेंद्रीय शेतीमध्ये विविध प्रयोग करुन जीवनमान उंचावन्यास मोलाची मदत झाली असल्याचे त्यांनी सांगितले.
प्रशिक्षण कार्यक्रमास शेतकरी बंधू भगिनी, विद्यार्थी, कृषि शास्त्रज्ञ, कृषि विज्ञान केंद्राचे विषय विशेषज्ञ आदींनी मोठ्या प्रमाणावर सहभाग नोंदविला. सुत्रसंचलन डॉ. विशाल अवसरमल यांनी केले तर आभार डॉ. पंकज ददगाळे मानले तसेच श्री. ऋषिकेश औंढेकर यांनी संकलक म्हणुन काम पाहिले. कार्यक्रम यशस्वीतेसाठी डॉ.अनुराधा लाड, डॉ. संतोष बोरगावकर, दिपक शिंदे, अभिजीत कदम, सतीश कटारे, योगेश थोरवट आदींनी परिश्रम घेतले.