Pages

Friday, March 25, 2022

कमी पाण्‍यात जास्‍त उत्‍पादनाकरिता आधुनिक सिंचन प्रणालीचा वापर करा ...... संशोधन संचालक डॉ. दत्‍तप्रसाद वासकर

मौजे भोसा येथे शेतकरी मेळावा संपन्‍न, अनुसूचित जातीच्‍या शेतक-यांना तुषार सिंचन संचाचे वाटप

पाणी ही राष्ट्रीय संपत्ती असून कमी पाण्यात जास्तीत जास्त उत्पादन घेण्यासाठी ठिंबक व तुषार या सारख्या आधुनिक सिंचन प्रणालीचा वापर वाढवण्याची आवश्यकता आहे. तुषार सिंचन संचाच्‍या वापर करून उन्हाळी हंगामात देखिल सोयाबीन पिकाचे किफायतशीर उत्पादन घेऊ शकतो, असे प्रतिपादन संशोधन संचालक डॉ दत्‍तप्रसाद यांनी केले.

वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठातील अखिल भारतीय समन्वयीत सिंचन पाणी व्यवस्थापन प्रकल्पाच्या वतीने दिनांक २५ मार्च रोजी मौजे भोसा (ता.मानवत, जि.परभणी)  येथे आयोजित शेतकरी मेळाव्‍याच्‍या अध्‍यक्षस्‍थानावरून ते बोलत होते. कार्यक्रमास सरपंच श्री. सुभाषराव जाधव, कोरडवाहू संशोधन केंद्राचे वरिष्ठ शास्त्रज्ञ डॉ. मदन पेंडके, आयोजक मुख्य शास्त्रज्ञ डॉ.हरिश आवारी, कृषी विद्यावेत्‍ता डॉ गजानन गडदे आदींची प्रमुख उपस्थिती होती

कार्यक्रमात भारतीय कृषि अनुसंधान परिषद यांच्या अंतर्गत असलेल्‍या भुवनेश्‍वर येथील पाणी व्यवस्थापन प्रकल्पाकडून प्राप्त निधीतून अकरा अनुसुचित जातीतील लाभार्थांना शेतक-यांना पाणी व्यवस्थापनाचे महत्व अवगत करण्यासाठी व आर्थिकस्तर उंचविण्यासाठी तुषार सिंचन संचाचे वाटप मान्‍यवरांच्‍या हस्‍ते करण्यात आले.

कार्यक्रमाचे प्रास्ताविकात मुख्य शास्त्रज्ञ डॉ. हरिश आवारी यांनी सिंचनासोबतच मृद व जलसंधारणाच्या उपाययोजना अंमलात आणण्याचे आवश्यक असल्याचे नमुद केले. सुत्रसंचलन डॉ. गजानन गडदे यांनी तर आभार डॉ. मेघा जगताप यांनी मानले. कार्यक्रम यशस्वीतेसाठी श्री. नंदकुमार गिराम, श्री. सावंत, श्री. कपिलेश्‍वर बालोरे, श्री.विलास जाधव आदीसह पाणी व्यवस्थापन प्रकल्पाचे कर्मचारी आणि भोसा ग्रामवासीयांनी परिश्रम घेतले.