Pages

Tuesday, April 5, 2022

सामुदायिक विज्ञान महाविद्यालयाचे रासेयो अंतर्गत विशेष शिबिर संपन्न

वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठातील सामुदायिक विज्ञान महाविद्यालयाच्‍या राष्ट्रीय सेवा योजना अंतर्गत दिनांक २४  ते ३० मार्च  दरम्‍यान मौजे खानापुर येथे विशेष शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. विशेष शिबिरा दरम्यान विविध उपक्रम राबविण्‍यात आले. सार्वजनिक स्वच्छता अभियान, पर्यावरण संरक्षण, पाण्याचा सुयोग्य वापर, आरोग्‍याची घ्यावयाची काळजी आदी विषयांवर  जनजागृती करण्यात आली. विशेष शिबिरात विविध विषयावर तज्ज्ञांनी विद्यार्थी व गावक-र्यांना मार्गदर्शन केले.

शिबिराच्या उदघाटन प्रसंगी बाल विकासात कुटुंबाची भूमिका या विषयावर बोलताना सहयोगी अधिष्‍ठाता डॉ. जया बंगाळे यांनी कुटुंबातील मुला–मुलींचे संगोपन हे समान पद्धतीने करणे गरजेचे असल्याचे विशद केले. गृह्कार्यातील थकव्याचे निराकरण कसे करावे यावर बोलताना डॉ. माधुरी कुलकर्णी  यांनी महिलांनी  शरीराची भाषा समजून कार्यपद्धतीमध्ये बदल करावेत. थकवा आल्यानंतर थोडी विश्रांती घ्यावी. त्याच बरोबर स्वत:च्या तब्येतीकडे लक्ष द्यावे आणि आनंदी राहावे असे प्रतिपादन केले. यश प्राप्तीसाठी आवश्यक जीवन कौशल्ये यावर  कार्यक्रम अधिकारी डॉ. विद्यानंद मनवर यांनी जागतिक आरोग्य संघटनेने निर्देषित केलेल्या विद्यार्थ्यांसाठी आवश्यक दहा जीवन कौशल्यांची मांडणी केली तसेच ही जीवन कौशल्ये विद्यार्थ्यांना जीवनात यशस्वी होण्यास आवश्यक असल्याचे सांगितले. अंधश्रद्धा निर्मुलन काळाची गरज या विषयावर विविध उदाहरणे देत प्रात्यक्षिकाद्वारे समाजातील मानवी विकासाठी अडथळे ठरणारे बुवाबाजी, चमत्कार, रूढी, परंपरा याबाबत डॉ. सुनील जाधव व प्रा.माणिक लिंगायत, राज्य कार्यकारणी सदस्य, अनिस, जि. परभणी  यांनी उपस्थितांना  मार्गदर्शन केले, तसेच ‘अंधश्रद्धा निर्मुलन वार्तापत्र’ या मासिकाचे अंक विद्यार्थी व गावक-र्यांना मोफत वाटप करण्यात आले.  समतोल आहाराचे  महत्व या विषयावर  डॉ. तसनिम नाहीद खान यांनी उपस्थित महिला शेतकऱ्यांना मार्गदर्शन केले. दैनंदिन आहाराचे नियोजन योग्य पोषक तत्वांवर आधारित असावे. ही सर्व पोषक तत्वे समतोल आहारामार्फत मिळतात. शेती कामात निर्णय घेण्याचे काम पुरुष मंडळी करते तर घर काम तसेच शेतीकामात महिलांचाच सहभाग अधिक असल्याचा दिसून येतो.त्याच कारणाने शरीराची झीज भरून काढण्यासाठी महिलांना समतोल आहार घेणे आवश्यक आहे. आहारात कडधान्ये, हिरव्या भाज्या, फळ भाज्या यांचे समतोल प्रमाण साधने गरजेचे आहे असे प्रतिपादन केले.  शेती कामात  वापरावयाची संरक्षक वस्त्रे आणि त्यांची निगा या संदर्भात मार्गदर्शन करताना  डॉ. सुनीता काळे यांनी शेती व्यवसायात पीक लावणी ते काढणी पर्यंत विविध जोखमीचे कामे महिलांना करावी लागतात  तेव्हा आपल्या शरीराचे संरक्षण करणारी संरक्षक वस्त्रे तयार करून वापरावे. तसेच विविध वस्त्रकलेवर आधारित कौशल्ये त्यांचा ग्रामीण महिलांमध्ये प्रशिक्षणाद्वारे प्रसार करून वस्त्र उपयोगी  वस्तूंची निर्मिती आणि या माध्यमातून अर्थार्जन अल्प गुंतवणुकीमध्ये  उपलब्ध साधनांचा आणि प्रशिक्षणाद्वारे  प्राप्त केलेल्या विविध कौशल्यांचा  संयुक्तिक वापर बचत गटातील महिला एक यशस्वी उद्योग सुरु करू शकतात असे मनोगत व्यक्त केले. कृषि क्षेत्रात माहिती तंत्रज्ञानाचा वापर या विषयावर बोलतांना  डॉ. शंकर पुरी यांनी समाज माध्यमांचा परिणाम कारक वापर  करून कृषि उत्पन्नात भरघोस वाढ करणे शक्य असल्याचे प्रतिपादन केले. कृषि विद्यापीठाचे महिला शेतकरी अॕप तसेच महाराष्ट्र शासनाचे ई- पीक पाहणी अॕप शेतकऱ्यांसाठी अतिशय उपयुक्त असल्याचे प्रतिपादन केले. सहयोगी अधिष्‍ठाता डॉ जया बंगाळे यांच्‍या मार्गदर्शनाखील कार्यक्रम अधिकारी डॉ. विद्यानंद मनवर यांनी या शिबिराचे आयोजन केले. शिबिरास रासेयो स्वयंसेवकांसह गावक-र्यांनी मोठया संख्येने सहभाग नोंदविला. शिबिर यशस्वीतेसाठी खानापूर येथील राम शिंदे, तुकाराम मोहिते, साहेबराव जाधव, पंडीत थोरात, उर्मिला शिंदे, सावित्रा मोहिते आदींनी सहकार्य केले.