Pages

Monday, August 15, 2022

जय जवान, जय किसान, जय विज्ञान आणि जय अनुसंधान ........ कुलगुरू मा डॉ इन्‍द्र मणि

वनामकृवित ७६ वा स्‍वातंत्र्य दिन उत्‍साहात साजरा

देशाचे अभेद्य सुरक्षा आमचे जवान यांच्‍या हाती असुन देशाची अन्न सुरक्षा शेतकरी बांधवाच्‍या हाती आहे. म्‍हणुनच देशाचे माजी पंतप्रधान लाल बहादूर शास्त्री यांनी जय जवान, जय किसान हा नारा दिला. स्वातंत्र्याच्या वेळी अन्नधान्य बाबतीत आयातदार असणारा देश, आज इतर देशांची भूक मिटवण्याचे काम करित आहे, हे सर्व शेतकरी बांधवांची मेहनत आणि समर्पण मुळेच शक्‍य झाले, त्‍यास विज्ञान आणि संशोधनावर आधारित तंत्रज्ञानाची जोड लाभली. म्‍हणुन जय जवान, जय किसान, जय विज्ञान आणि जय अनुसंधान हा नारा आपण पुढे घेऊन जाऊ, असे प्रतिपादन कुलगुरू मा डॉ इन्‍द्र मणि यांनी केले.

वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठात देशाच्‍या ७६ वा स्‍वातंत्र्य दिनानिमित्‍त मुख्‍य प्रागंणात कुलगुरू मा डॉ इन्‍द्र मणि यांच्‍या हस्‍ते ध्‍वजारोहण करण्‍यात आले, यावेळी उपस्थितांना संबोधित करतांना ते बोलत होते. कार्यक्रमास कुलगुरू यांच्‍या सुविद्य पत्‍नी मा श्रीमती जया इन्‍द्र मणि, श्री सौमित्र मिश्रा, शिक्षण संचालक डॉ धर्मराज गोखले, संशोधन संचालक डॉ दत्‍तप्रसाद वासकर, विस्‍तार शिक्षण संचालक डॉ देवराव देवसरकर, कुलसचिव डॉ धिरजकुमार कदम, विद्यापीठ नियंत्रक श्रीमती दिपाराणी देवतराज, प्राचार्य डॉ सय्यद ईस्‍माइल, प्राचार्य डॉ उदय खोडके, प्राचार्या डॉ जया बंगाळे, सहयोगी अधिष्‍ठाता डॉ गजेंद्र लोंढे, विद्यार्थ्‍यी कल्‍याण अधिकारी डॉ सचिन मोरे आदींची प्रमुख उपस्थिती होती.

कुलगुरू मा डॉ इन्‍द्र मणि पुढे म्हणाले कीदेशात सर्वत्र अमृत महोत्सव साजरा केला जात आहे. या महोत्सवात सर्वजण उत्‍साहाने सहभागी झाले आहेत. असे दिसते की स्वातंत्र्यासाठीच्या असंख्य संघर्षांची, असंख्य बलिदानांची आणि असंख्य तपस्यांची उर्जा संपूर्ण भारतभर एकाच वेळी पुन्हा जागृत होत आहे. देशाच्या स्वातंत्र्यलढ्यात स्वत:ला झोकून देणाऱ्या, देशाचे नेतृत्व करणाऱ्या सर्व महान व्यक्तींच्या स्‍मृतीचे स्‍फुरण आपण केले पाहिजे. आज आपला देश भक्कम पायावर उभा आहे. हे साध्य करण्यासाठी अनेकांनी झोकून दिले आहे. देशाच्या स्वातंत्र्यात महाराष्ट्राच्या पवित्र भूमीचे मोठे योगदान आहे. महाराष्ट्रात अनेक चळवळी सुरू झाल्या ज्यामुळे राजकीय-धार्मिक-सामाजिक-आर्थिक सुधारणांना चालना मिळाली. स्वराज्य संस्‍थापक छत्रपती शिवाजी महाराज यांचे जीवन आजही प्रत्येक भारतीयांच्या मनात देशभक्तीची भावना दृढ करते. महाराष्ट्राने देशाला अनेक क्षेत्रात प्रेरणा दिली आहे. सामाजिक क्रांतीत जगद्गुरू श्री संत तुकाराम महाराजांपासून ते राज्यघटनेचे शिल्पकार भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्यापर्यंत समाजसुधारकांचा अतिशय समृद्ध वारसा आहे. अनेक व्यक्ती आणि समूहांनी महाराष्ट्राच्या वैचारिक आणि सांस्कृतिक विकासाला गती दिली. देशाच्या कृषी क्षेत्राच्या विकासात आपल्या शेतकरी बांधवांचे मोठे योगदान असुन शेतकरी हे आपले दैवत आहे, शेतकऱ्यांच्या हितासाठी आपण काम करतो याचा आपल्याला सार्थ अभिमान असायला हवा. सर्व कृषी शास्त्रज्ञ, शिक्षक, देशातील कृषी विद्यापीठांचे पदवीधर यांनी प्रत्येक वेळी शेतकऱ्याच्या हिताचा विचार केला पाहिजे. शेतकरी बांधवाच्‍या कल्‍याणाकरिता आणि विद्यापीठाचे नाव शिक्षण, संशोधन आणि कृषि विस्‍तार क्षेत्रात उंचाविण्‍याकरिता आपण सर्वजण ए‍कत्रितरित्‍या प्रयत्‍न करू या, ते म्‍हणाले.

यावेळी राष्‍ट्रीय छात्र सैनिकांनी प्रभारी छात्रसेना अधिकारी डॉ हिराकांत काळपांडे यांच्‍या नेतृत्‍वात माननीय कुलगुरू यांना मानवंदना दिली. कार्यक्रमाचे सुत्रसंचालन श्री उदय वाईकर यांनी केले. कार्यक्रमास विद्यापीठातील प्राध्‍यापक, शास्‍त्रज्ञ, अधिकारी, कर्मचारी आणि विद्यार्थी मोठया संख्‍येने उपस्थित होते.