Pages

Monday, August 15, 2022

युवा शेतकऱ्यांनी कृषि उद्योगाकडे वळावे……. कुलगुरू मा. डॉ. इन्द्र मणि

मौजे पिंगळी येथे आयोजित शेतकरी मेळाव्‍यात प्रतिपादन

आज शासकीय व इतर क्षेत्रात नौकरीच्‍या संधी मागणीच्‍या प्रमाणात अत्‍यंत कमी आहेत. ग्रामीण भागात कृषि पुरक उद्योगास मोठा वाव आहे. युवा शेतकऱ्यांनी नोकरीच्या मागे न लागता शेतीपूरक उद्योग निर्माण करावेत, यात इतरांनाही रोजगार देण्‍याची क्षमता आहे. शासनाद्वारे शेतकरी उत्पादक कंपनींना प्रोत्साहन देण्यात येत आहे. कृषि उद्योगात युवा शेतक-यांना प्रशिक्षित करण्‍यावर विद्यापिठाचा  विशेष भर राहणार असुन सर्वांनी एकत्र येऊन काम करण्याची गरज असल्‍याचे मत कुलगुरू मा डॉ इन्‍द्र मणि यांनी व्‍यक्‍त केले.  

भारतीय स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवी वर्षाच्या निमीत्ताने वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठाच्‍या वतीने मौजे पिंगळी येथे दिनांक १५ ऑगस्‍ट रोजी शेतकरी मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते. मेळाव्याच्या अध्यक्षस्थानावरून ते बोलत होते. कार्यक्रमास विस्तार शिक्षण संचालक डॉ. डी. बी. देवसरकर, संशोधन संचालक डॉ. डी. पी. वासकर, संचालक शिक्षण डॉ. डी. एन. गोखले, कुलसचिव डॉ. डी. आर. कदम आदीची प्रमुख उपस्थिती होती. कार्यक्रमाचे आयोजन पिंगळी येथील शेतकरी श्री.रामकिशन पवार यांच्या शेतात करण्यात आले होते.

यावेळी विस्‍तार शिक्षण संचालक डॉ.डी.बी.देवसरकर यांनी शेतकरी बांधवांनी घरच्या घरी बीजोत्पादन करण्‍याचे आवाहन करून विद्यापीठ विकसित सोयाबीन, तूर पिकाच्या वाणांची शेतकरी बांधवांनी लागवड करावी व उत्पादन वाढीसाठी बीबीएफ तंत्रज्ञानाचा वापर करण्‍याचा सल्‍ला दिला. तर संशोधन संचालक डॉ.डी.पी.वासकर यांनी विद्यापीठ विकसित विविध वाण व भविष्यात येणारे सोयाबीनचे वाण, चाऱ्याचे वाण याविषयी सविस्तर माहिती दिली.

शिक्षण संचालक डॉ.डी.एन.गोखले यांनी एकच एक पीक पद्धती न घेता आंतरपीक पद्धतीचा अवलंब करावा जेणेकरून शाश्वत उत्पादन मिळेल असे सांगितले तर डॉ.डी.आर.कदम यांनी शेतकऱ्यांनी एकत्र येऊन शेतकरी उत्पादक कंपन्यांची स्थापना करून विविध उपक्रम राबवावेत जेणेकरून शेतकऱ्यांचा व गावाचा विकास होईल, असे सांगि‍तले.

कार्यक्रमाच्या प्रास्ताविकेत श्री.रामकिशन पवार यांनी विद्यापीठाद्वारे विविध कृषि तंत्रज्ञान व वाण शेतक-यांना उपलब्ध व्‍हावीत अशी अपेक्षा व्‍यक्‍त केली. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन श्री.एस.एस.खताळ यांनी केले. यावेळी श्री.रामकिशन पवार यांनी विकसित केलेले आंतरमशागत यंत्राचे अनावरण माननीय कुलगुरू यांच्या हस्ते करण्यात आले. तसेच श्री रामकिशन पवार यांच्या विद्यापीठ विकसित सोयाबीन वाण एमएयुएस-७१ या प्रक्षेत्रास मान्यवरांनी भेट दिली. माननीय कुलगुरू यांच्या हस्ते काही उपस्थित यशस्‍वी युवा शेतकऱ्यांचा सत्कारही करण्यात आला. 

तांत्रिक सत्रात विस्तार कृषि विद्यावेत्ता डॉ. जी. डी. गडदे, कृषी विद्यावेत्ता डॉ. ए. के. गोरे, कीटकशास्त्रज्ञ डॉ. डी. डी. पटाईत, वरिष्ठ संशोधन सहाय्यक श्री. एम. बी. मांडगे आदींनी विविध विषयावर मार्गदर्शन केले. मेळाव्‍यास पावसाचे वातावरण असतांनाही मौजे पिंगळी परिसरातील शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते.