Pages

Saturday, February 18, 2023

संपुर्ण मराठवाडयाकरिता स्‍थळ निहाय डिजिटल मृदा नकाशे तयार करण्‍यात येऊन मातीच्‍या प्रकारानुसार पिकांची निवड करणे होणार शक्‍य

नागपुर येथील भाकृअप- राष्ट्रीय मृदा सर्वेक्षण व भुमी उपयोग नियोजन संस्थेशी वनामकृविचा सामंजस्‍य करार

नागपुर येथील भारतीय कृषी अनुसंधान परिषदेची राष्ट्रीय मृदा सर्वेक्षण व भुमी उपयोग नियोजन संस्था व वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठ यांच्यात दिनांक १६ फेब्रुवारी रोजी सामंजस्य करार करण्यात आला. करारावर कुलगुरू मा. डॉ. इन्‍द्र मणि, राष्ट्रीय मृदा सर्वेक्षण व भुमी उपयोग नियोजन संस्थेचे संचालक डॉ. बी. पी. भास्कर, संचालक संशोधन डॉ. दत्तप्रसाद वासकर आणि मृद विज्ञान व कृषि रसायनशास्त्र विभागाचे विभाग प्रमुख डॉ. प्रविण वैद्य यांनी स्‍वाक्षरी केल्‍या. यावेळी विद्यापीठ कार्यकारी परिषदेचे सदस्‍य विधान परिषद सदस्‍य मा आ श्री सतीश चव्‍हाण, विधान परिषद सदस्‍य मा आ श्री रमेशराव कराड, विधानसभा सदस्‍य मा आ श्री अभिमन्‍यु पवार, शिक्षण संचालक डॉ. धर्मराज गोखले आदींची प्रमुख उपस्थिती होती.

शाश्‍वत शेतीकरिता मातीचा कार्यक्षम वापर करणे आवश्‍यक आहे. सदर करारामुळे संशोधन व सर्वेक्षणाच्‍या माध्‍यमातुन दोन्‍हा संस्‍था रिमोट सेन्सिंग, भौगोलिक माहिती प्रणाली (जीआयएस), उपग्रह या आधुनिक तंत्रज्ञानाचा उपयोग करून संपुर्ण मराठवाडा विभागातील प्रत्‍येक ठिकाणाचा डिजिटल मृदा नकाशे तयार करणार आहेत, या संशोधनाव्‍दारे निर्णय समर्थन प्रणाली विकसित करण्‍यात येणार आहे, ही निर्ण प्रणाली मुळे शेतकरी बांधवाना मातीच्‍या गुणधर्मानुसार योग्‍य पिकांची लागवड निवड व जमिन वापराचे काटेकोर नियोजन शक्‍य होणार आहे. मृदा स्‍थळ उपयुक्तता, मातीची सुपीकता, स्‍थळनिहाय विशिष्ट माती आणि अन्‍नद्रव्‍य व्यवस्थापन याकरिता ही प्रणाली मार्गदर्शक ठरेल. कराराच्‍या माध्‍यमातुन दोन्‍ही संस्‍थेतील वैज्ञानिक यांचे ज्ञान, माहिती आणि कौशल्‍य यांची देवाणघेवाण करण्‍यात येऊन पदव्‍युत्‍तर विद्यार्थ्‍यांच्‍या मृदा संशोधनासही हातभार लाभणार असुन संशोधन लेखांची गुणवत्ता वाढविण्याकरिता संधी प्राप्त होणार आहे.