Pages

Thursday, March 2, 2023

आंतरराष्ट्रीय भरड धान्य वर्षानिमित्त वनामकृवित भित्तीपत्रक सादरीकरणाद्वारे जागृती कार्यक्रम



आंतरराष्‍ट्रीय भरड धान्‍य वर्षानिमित्‍त वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठाच्‍या वतीने भरड धान्‍य विषयी जनजागृती करण्‍यात येत असुन दिनांक २ मार्च रोजी कृषि वनस्पतीशास्त्र विभागातर्फे पदव्‍युत्‍तर विद्यार्थ्‍यांकरिता “अन्न आणि पोषण सुरक्षेसाठी भरड धान्य” या विषयावर भित्तीपत्रके निर्मिती स्पर्धेचे आयोजन करण्‍यात आले होते, सदर भित्‍तीपत्रक दालनाचे उदघाटन कुलगुरू मा डॉ इन्‍द्र मणि यांच्‍या हस्‍ते करण्‍यात आले. यावेळी उत्‍कृष्‍ट भित्तिपत्रक तयार करणा-या विद्यार्थ्‍यांना मा. कुलगुरु मा डॉ. इन्‍द्र मणि यांच्या हस्ते प्रशस्तिपत्रे देऊन सन्‍मानित करण्‍यात आले. 

यावेळी आयोजित कार्यक्रमात मार्गदर्शन करतांना कुलगुरू मा डॉ इन्‍द्र मणि म्‍हणाले कीपरभणी येथील ज्‍वार संशोधन केंद्र देशातील सर्वात जुन्‍या संशोधन केंद्रापैकी एक असुन परभणी कृषी विद्यापीठाने ज्‍वारी व बाजरी पिकांमध्‍ये अनेक चांगली वाण विकसित केली आहेत. यावर्षी ज्‍वारी मधील देशातील पहिले जैवसंपृक्‍त वाण परभणी शक्‍ती अनेक शेतकरी बांधवानी लागवड केली आहेइतर वाणापेक्षा यात मोठया प्रमाणात लोह व जस्‍ताचे प्रमाण असुन मानवी आरोग्‍यास स्‍वास्‍थवर्धक आहे. विद्यापीठाने गेल्‍या सहा महिन्‍यात राष्‍ट्रीय व आंतरराष्‍ट्रीय संस्‍थेबरोबर सामजंस्‍य करार केले असुन याचा फायदा पदव्‍युत्‍तर विद्यार्थ्‍यांना दर्जेदार संशोधनाकरिता होणार आहे. नुकतेच नाहेप प्रकल्‍पाच्‍या माध्‍यमातुन तेवीस विद्यार्थी थायलंड येथे डिजिटल शेती तंत्रज्ञान प्रशिक्षणास गेले असुन कृषि संशोधन क्षेत्रात कृषिच्‍या विद्यार्थ्‍यांनी आपले ध्‍येय निश्चित करून कठोर परिश्रम करण्‍याचा सल्‍ला त्‍यांनी दिला. 

यावेळी पदव्‍युत्‍तर विद्यार्थ्‍यांनी तयार केलेल्‍या भित्तीपत्रकांचे सादरीकरण केले तसेच विद्यार्थीनीनी भरड धान्याचा वापर करुन काढलेल्या रांगोळीची उपस्थितांनी प्रशंसा केली. माननीय कुलगुरू यांनी विभागातील पदव्युत्तर व आचार्य पदवी विद्यार्थ्‍यांच्या संशोधन प्रक्षेत्रास भेट दिली. भाभा अणुसंशोधन केंद्र व कृषि वनस्पतीशास्त्र यांच्या संयुक्त विद्यमाने राबविल्या येत असलेल्‍या उत्परिवर्तनाद्वारे पिवळी ज्वारीच्या व रब्बी ज्वारीच्या उच्च उत्पादन व गुणवत्ता मध्ये बदल घडविण्यासाठीच्या प्रयोगांस भेट दिली. माननीय कुलगुरु यांच्या हस्ते वृक्षारोपण करण्यात आले. 

कार्यक्रमास संचालक शिक्षण डॉ. धर्मराज गोखले, सहयोगी अधिष्ठाता डॉ. सय्यद इस्माईल, विभाग प्रमुख डॉ. हिराकांत काळपांडे, विद्यार्थी कल्याण अधिकारी डॉ. सचिन मोरे आदीसह विभागातील प्राध्‍यापक, अधिकारी, विद्यार्थी उपस्थिती होती. कार्यक्रमाचे सुत्रसंचालन डॉ. मिना वानखडे व डॉ. अबिका मोरे यांनी केले तर आभार डॉ. अंबालिका चौधरी यांनी मानले. कार्यक्रम यशस्वीतेसाठी डॉ. राजेश धुतमल, डॉ. दत्तात्रय दळवी, डॉ. जयकुमार देशमुख, डॉ. दिलीप झाटे यांचे सहकार्य लाभले.