Pages

Saturday, March 4, 2023

हुंडाबळी, बालवि‍वाह, स्‍त्रीभ्रुण हत्‍या या समाजातील विकृती विरोधात लढा दयावा लागेल......मा श्रीमती रूपालीताई चाकणकर

वनामकृवितील विद्यार्थी-विद्यार्थींनीशी साधला संवाद


देशाने व राज्‍याने मोठी प्रगती केले आहे, तरिही स्‍त्रीबाबत समाजाचा दृष्‍टीकोन आजही बदलेला नाही. हुंडाबळी, बालविवाह, स्‍त्री भ्रुण हत्‍या या कमी होतांना दिसत नाही, समाजातील या विकृती विरोधात आपणास लढा दयावा लागेल, असा सल्‍ला महाराष्‍ट्र राज्‍य महिला आयोगाच्‍या अध्‍यक्षा मा श्रीमती रूपालीताई चाकणकर यांनी दिला. वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठात दिनांक ३ मार्च रोजी महिला आयोग आपल्‍या दारी उपक्रमांतर्गत विद्यार्थ्‍यांशी संवाद साधतांना त्‍या बोलत होत्‍या. यावेळी व्‍यासपीठावर शिक्षण संचालक डॉ धर्मराज गोखले, महिला आयोगाच्‍या सदस्‍या श्रीमती संगिताताई चव्‍हाण, प्रभारी जिल्‍हाधिकारी डॉ प्रताप काळे, श्रीमती भावनाताई नखाते, श्री कैलास तिडके, प्राचार्या डॉ जया बंगाळे, प्राचार्य डॉ सय्यद ईस्‍माईल, प्राचार्य डॉ उदय खोडके, प्राचार्य डॉ राजेश क्षीरसागर, प्राचार्य प्रा हेमंत पाटील आदींची प्रमुख उपस्थिती होती.

मा श्रीमती रूपालीताई चाकणकर पुढे म्‍हणाल्‍या की, राज्‍यात सर्वात जास्‍त बालविवाह परभणी जिल्‍हयात होतात, हे चित्र आपणास बदलावे लागेल. शेतकरी आत्‍महत्‍या मागे हुंडा प्रथा, मुलींचे मोठे लग्‍न लावणे हे सुध्‍दा कारण असुन सर्वांनी हुंडा घेणार नाही व हुंडा देणार नाही असे ठरविले तर अनेक लेकीचे बाप वाचतील. आज रूढी परंपराच्‍या नावाखाली महिलांवर अत्‍याचार होत आहे, हे थांबविण्‍याकरिता एकत्रित आपण लढा देऊ, असे त्‍या म्‍हणाल्‍या.

अध्‍यक्षीय समारोपात डॉ धर्मराज गोखले यांनी श्रीमती रूपालीताई चाकणकर यांचे आभार मानुन विद्यापीठ विद्यार्थीनी व महिला सुरक्षाबाबत संवेदनशील असल्‍याचे सांगितले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक डॉ जया बंगाळे यांनी केले. कार्यक्रमाचे सुत्रसंचालन डॉ विणा भालेराव यांनी केले तर आभार डॉ निता गायकवाड यांनी मानले. कार्यक्रमास विद्यापीठातील विद्यार्थी-विद्यार्थीनी, प्राध्‍यापक व कर्मचारी मोठया संख्‍येने उपस्थित होते.