Pages

Saturday, March 18, 2023

लहान शेतकरी बांधवाकरिता भरड धान्‍य लागवड होईल लाभदायक ..... माननीय पंतप्रधान श्री नरेंद्र मोदी

आंतरराष्‍ट्रीय पौष्‍टीक तृणधान्‍य वर्षानिमित्‍त थेट प्रेक्षपणाव्‍दारे देशाला केले संबोधीत   

जग आतरराष्ट्रीय पौष्टिक तृणधान्‍य वर्ष साजरे करत असतांना भारत या मोहिमेचे नेतृत्व करत असुन याचा लाभ देशातील लहान शेतकरी बांधवांना होणार आहे. देशात विविध प्रकाराचे भरड धान्‍य पिकवली जातात. कमी पाण्‍यात, कमी खर्चात व बदलत्‍या हवामानात भरड धान्‍याची आपण शेती करू शकतो. ही भरड धान्‍य मानवी आरोग्‍याच्‍या दृष्‍टीने अत्‍यंत महत्‍वाची असुन याबाबत जनजागृती केल्‍यास याचे आहारातील प्रमाणात वाढ होईल, भरड धान्‍याची मागणीत वाढ होईल. याचा लाभ छोटया शेतकरी बांधवाना होणार आहे, असे प्रतिपादन माननीय पंतप्रधान मा. श्री नरेंद्र मोदी यांनी केले.

आंतरराष्‍ट्रीय पौष्‍टीक तृणधान्‍य वर्षानिमित्‍त पुसा (नवी दिल्‍ली) येथील भारतीय कृषि संशोधन संस्‍थेत ग्‍लोबल मिलेट्स परिषदेचे दिनांक १८ मार्च रोजी करण्‍यात आले होते. सदर परिषदेचे उदघाटन माननीय पंतप्रधान मा. श्री नरेंद्र मोदी यांच्‍या हस्‍ते करण्‍यात आले, यावेळी त्‍यांनी देशाला संबोधीत केले. माननीय पंतप्रधान यांच्‍या हस्‍ते हैद्राबाद येथील श्री अण्णा ग्लोबल एक्सलन्स रिसर्च सेंटर चे उदघाटन करण्‍यात आले तसेच  आंतरराष्‍ट्रीय भरड धान्‍य वर्ष २०२३ याचे टपाल तिकीट आणि अधिकृत नाण्याचे अनावरण करण्‍यात आले.  

माननीय पंतप्रधान यांच्‍या भाषणाचे थेट प्रक्षेपण वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठातील विस्‍तार शिक्षण संचलनालयाच्‍या वतीने करण्‍यात आले होते. यावेळी कार्यक्रमाच्‍या अध्‍यक्षस्‍थानी कुलगुरू मा डॉ इन्द्र मणि हे होते, तर शिक्षण संचालक डॉ धर्मराज गोखले, संशोधन संचालक डॉ दत्‍तप्रसाद वासकर, विस्‍तार शिक्षण संचालक डॉ देवराव देवसरकर, कुलसचिव डॉ धिरजकुमार कदम, प्राचार्य डॉ सय्यद ईस्‍माईल, प्राचार्य डॉ राजेश क्षीरसागर, प्राचार्य डॉ जया बंगाळे, प्राचार्य डॉ उदय खोडके आदींची प्रमुख उपस्थिती होती. 

माननीय पंतप्रधान मा. श्री नरेंद्र मोदी पुढे म्‍हणाले की, मानवाच्‍या आहारात भरड धान्‍याचा समावेश केल्‍यास जीवनशैलीशी निगडीत अनेक आजारांशी लढण्‍यास मदत होते, यात विविध जीवनसत्‍व व खनिजे असुन उच्‍च प्रतीचे तंतुमय पदार्थ असतात. पौष्टिक तृणधान्‍यास श्री अन्‍न असे संबोधले जाते, हेच श्री अन्‍न समग्र विकासाचे माध्‍यम बनु शकते, लहान शेतकरी बांधवाच्‍या समृध्‍दीचा मार्ग बनु शकते, देशातील जनतेच्‍या पोषणाचे मुख्‍य घटक होऊ शकते, आदिवासी समाजाचा सन्‍मान होऊ शकते, रसायनमुक्‍त शेतीचा आधार होऊ शकते, असे प्रतिपादन त्‍यांनी केले.

यावेळी विद्यापीठातील सभागृहात उपस्थितांना मार्गदर्शनात कुलगुरू मा डॉ इन्‍द्र मणि म्‍हणाले की, बदलत्‍या हवामान परिस्थितीत लहान शेतकरी बांधवाकरिता भरड धान्‍य पिके एक चांगला पर्याय होऊ शकतो. भरड धान्‍याचा आहारातील वापर वाढीकरिता भरड धान्‍यावर आधारीत विविध प्रक्रियायुक्‍त पदार्थ मुबलक प्रमाणात उपलब्‍ध झाली पाहिजेत. जीवनशैलीशी निगडीत अनेक शारीरिक व्‍याधीमध्‍ये पौष्टिक तृणधान्‍य उपयुक्‍त असुन याबाबत सर्वसामान्‍य नागरिकांमध्‍ये जनजागृती करण्‍याचा विद्यापीठ प्रयत्‍न करित आहे. बाजरी व ज्‍वारी पिकांचे चांगले वाण परभणी कृषि विद्यापीठाने विकसित केले असुन या वाणांचे बीजोत्‍पादन करून शेतकरी बांधवा जास्‍तीत जास्‍त बियाणे उपलब्‍ध करण्‍याचा विद्यापीठाचा प्रयत्‍न आहे.  

याप्रसंगी मान्‍यवरांनी शेतकरी बांधव श्री पंडित थोरात (खानापुर), श्री प्रकाश हरकळ (आर्वी), जनार्धन आवरगंड (माखणी), रामेश्‍वर साबळे (भोगाव साबळे) यांनी भरड धान्‍यापासुन तयार केलेल्‍या खाद्य पदार्थचा आस्‍वाद घेतला. कार्यक्रमाचे सुत्रसंचालन डॉ प्रशांत देशमुख यांनी केले. कार्यक्रमास विद्यापीठातील प्राध्‍यापक, शास्‍त्रज्ञ, अधिकारी, कर्मचारी व विद्यार्थी मोठया संख्‍येने उपस्थित होते.