Pages

Wednesday, March 29, 2023

आरोग्‍यवर्धक जीवनाकरिता सेंद्रीय शेतीकडे वळावे लागेल ....... कुलगुरू मा डॉ इन्‍द्र मणि

वनामकृवित आयोजित तीन दिवसीय राज्‍यस्‍तरीय सेंद्रीय शेती प्रशिक्षणाचा समारोप, प्रभावी प्रशिक्षण ठरल्‍याच्‍या सहभागी शेतकरी बांधवाच्‍या प्रतिक्रिया 


देश स्‍वातंत्र झाला त्यावेळी वाढत्‍या लोकसंख्‍येकरिता अन्‍न निर्मिती हे शेती पुढील आव्‍हान होते, आता पौष्टिक अन्‍न निर्मिती हे आपल्‍या पुढील आव्‍हान आहे. रासायनिक किटकनाशके व खते यांच्‍या मर्यादा आपणास लक्षात आल्‍या असुन आरोग्‍यवर्धक जीवनाकरिता टप्प्‍या-टप्‍प्‍याने रासायनिक शेती कमी करून सेंद्रीय शेती खालील क्षेत्र वाढवावे लागेल. नैसर्गिक शेतीच शाश्‍वत शेती असुन केंद्र व राज्‍य सरकार यास प्रोत्‍साहन देत आहे. विद्यापीठ संशोधनाव्‍दारे विविध पिकांच्‍या रोग व किड प्रतिकारक वाण विकसित करित असुन या वाणाचा वापर सेंद्रीय शेतीत उपयुक्‍त ठरेल. विद्यापीठ शेतकरी बांधवाच्‍या सेवेेत तत्‍पर असल्‍याचे प्रतिपादन कुलगुरू मा डॉ इन्‍द्र मणि यांनी केले.

भारतीय स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवाचे औचित्य साधुन वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठातील सेंद्रीय शेती संशोधन आणि प्रशिक्षण केंद्राच्‍या वतीने राज्‍यस्‍तरीय तीन दिवसीय सेंद्रीय शेती प्रशिक्षण कार्यक्रमाचे दिनांक २७ मार्च ते २९ मार्च दरम्‍यान ऑनलाईन व ऑफलाईन पध्‍दतीने आयोजन करण्‍यात आले होते, सदर प्रशिक्षणाच्‍या समारोपीय कार्यक्रमाच्‍या अध्‍यक्षस्‍थानावरून ते बोलत होते. व्‍यासपीठावर संशोधन संचालक डॉ दत्‍तप्रसाद वासकर,  प्राचार्य डॉ. सय्यद इस्माईल, डॉ व्‍ही एन नारखेडे, हदगांव येथील प्रगतशील शेतकरी श्रीमती सुषमा देव, राजेंद्र पाटील, संजय देशमुख, मुख्‍य आयोजक मुख्‍य अन्‍वेषक डॉ आनंद गोरे आदींची प्रमुख उपस्थिती होती. 

यावेळी संशोधन संचालक डॉ दत्‍तप्रसाद वासकर म्‍हणाले की, परभणी कृषि विद्यापीठाच्‍या सेंद्रीय शेती संशोधन केंद्र २०१८ पासुन कार्यरत असुन दरवर्षी आयोजित प्रशिक्षण वर्गास शेतकरी बांधवाचा मोठा प्रतिसाद असतो, यावेळी देखिल शेतकरी बांधवानी ऑनलाईन व ऑफलाईन पध्‍दतीने मोठा प्रतिसाद दिला. प्रत्‍यक्ष प्रशिक्षणाप्रसंगी सहभागी शेतकरी एकामेकांशी संवाद साधुन अनेक अनुभवाची देवाणघेवाण करतात, अनेक गोष्‍टी शिकतात. विद्यापीठाचे सेंद्रीय शेती संशोधन प्रगतीपथावर असुन येणा-या काळात याचा विस्‍तार वाढेल.  

यावेळी कृषीभुषण भगवान इंगोले, सदाशिव अडकिणे, अश्विनी शिंदे, राहुल सुर्यवंशी, जनार्धन आवरगंड आदी शेतकरी बांधवानी आपल्‍या मनोगतात विद्यापीठाने आयोजित केलेले प्रशिक्षण वर्ग अत्‍यंत प्रभावी झाल्‍याची भावना व्‍यक्‍त केली. मान्‍यवरांच्‍या हस्‍ते सहभागी शेतकरी बांधवाना प्रमाणपत्र वितरित करण्‍यात आले. कार्यक्रमाचे प्रास्‍ताविक आयोजक मुख्‍य अन्‍वेषक डॉ आनंद गोरे यांनी केले. सुत्रसंचालन डॉ प्रितम भुतडा यांनी केले तर आभार डॉ पपिता गौरखेडे यांनी मानले.

सदर प्रशिक्षणास मराठवाडा विभागातील शेतकरी बंधु भगिनीकृषि विज्ञान केंद्राचे विषय विशेषज्ञकृषि शास्त्रज्ञविद्यार्थीकृषि विभागाचे अधिकारीकर्मचारी व स्वयंसेवी संस्थांचे सदस्य सहभागी झाले होते तर प्रशिक्षणाचे थेट प्रक्षेपणाचा लाभ राज्‍यातील हजारो शेतकरी बांधवानी घेतला. तीन दिवसीय प्रशिक्षणात सेंद्रीय शेतीमध्ये पीक लागवड तंत्रज्ञानसेंद्रीय शेतीमध्ये अन्नद्रव्य व्यवस्थापनजैविक कीड व रोग व्यवस्थापनभाजीपाला व फळपिकांचे सेंद्रीय पद्धतीने व्यवस्थापनसेंद्रीय शेतीसाठी केंद्र व राज्य शासनाच्या विविध योजनाअवजारांचा कार्यक्षम वापरजैविक निविष्ठांची निर्मिती व वापरपशुधन व्यवस्थापनसेंद्रीय प्रमाणीकरणसेंद्रीय शेतमाल विक्री व बाजारपेठ व्यवस्थापन आदी विविध विषयांवर राज्यातील कृषि विद्यापीठेसंशोधन संस्थास्वयंसेवी संस्थाखाजगी संस्था येथील तज्ञांचे व प्रगतशील शेतकरी यांचे मार्गदर्शन केले तसेच यशस्‍वी सेंद्रीय शेती करणा-यां शेतकरी बांधवानी आपले अनुभव मांडले.