Pages

Friday, March 31, 2023

कृषि तंत्रज्ञान प्रसारासाठी वनामकृवि व पानी फाऊंडेशन यांच्‍यात सामंजस्य करार

शेतक-यांची उत्पादकता व उत्पन्न वाढीसाठी पीक उत्पादन तंत्राज्ञान प्रसाराकरिता वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठ, परभणी व पानी फाऊंडेशन, नवी दिल्ली यांच्या दरम्यान दिनांक २९ मार्च रोजी सामंजस्य करार करण्यात आला आहे. यावेळी कुलगुरू कुलगुरू मा डॉ. इन्‍द्र मणि, संचालक संशोधन डॉ. दत्तप्रसाद वासकर व पानी फाऊंडेशनचे कार्यक्रम समन्वयक श्री नामदेव ननावारे आदींची प्रमुख उपस्थिती होती. 

यावेळी कुलगुरू मा डॉ इन्‍द्र मणि म्‍हणाले की, शेतकरी कल्‍याणाकरिता विद्यापीठ कटिबध्‍द असुन कृषि तंत्रज्ञान प्रसार, शेतक-यांचे मनोबल उंचावणे व शेतीचे उत्पन्न वाढवून शेतकरी बांधवांचे जीवनमान उंचावण्याकरिता वनामकृवि व पानी फाऊंडेशन एकत्रित कार्य करू असे मत व्‍यक्‍त करून मा. कुलगुरू यांनी शुभेच्छा दिल्या आहेत. पानी फाऊंडेशनच्या सामाजिक कार्यामध्ये विद्यापीठाचे शास्त्रज्ञ सहभागी होऊन शेतीचे नवनविन तंत्रज्ञान शेतक-यांपर्यन्त पोचविण्यासाठी मदत करतील असे आश्वासन डॉ. दत्तप्रसाद वासकर यांनी दिले.

नवी दिल्ली स्थित पानी फाऊंडेशनचे संस्‍थापक प्रसिध्‍द सिनेअभिनेते श्री आमिर खान व श्रीमती किरण राव असुन पानी फाऊंडेशनच्या वतीने ग्रामीण भागातील पाणी पातळीत वाढ करणे तसेच उत्पादन खर्चात बचत करून उत्पादकता व उत्पन्न वाढविण्याच्या उद्देशाने राज्यामध्ये ‘सत्यमेव जयते फार्मर कप स्पर्धा’ सन २०२३ हंगामाध्ये राज्यातील ३९ तालुक्यातील सर्व गावांमध्ये घेण्यात येत आहे. या स्पर्धेअंतर्गत शेतकरी गटांना विविध पीकांचे लागवड व संरक्षण तंत्रज्ञान उपलब्ध करून देणे, दृकश्राव्य प्रशिक्षण साहित्य निर्मीती करणे आणि डिजीटल शेतीशाळेमध्ये शेतक-यांना मार्गदर्शन करणे आदी कार्य केले जाते. सदर करारामुळे विद्यापीठ शास्‍त्रज्ञ व पानी फाऊंडेशन संयुक्‍तपणे कृषि तंत्रज्ञान प्रसार कार्य कार्य करणार आहेत. करारावर डॉ दत्‍तप्रसाद वासकर आणि श्री नामदेव ननावारे यांनी स्वाक्षरी केल्या. पानी फाऊंडेशनच्या वतीने मागील वर्षी खरीप व रब्बी हंगामामध्ये फार्मर कप स्पर्धा आयोजित करण्यात आली होती. यामध्ये विद्यापीठ शास्त्रज्ञ तंत्राज्ञान प्रसारासाठी डिजीटल शेतीशाळेमध्ये शेतक-यांना आवश्यक ते मार्गदर्शन करण्यासाठी सहभागी झाले होते. यामुळे शेतक-यांच्या पीक लागवड खर्चात बचत होऊन उत्पादन वाढले. त्याचबरोबर कीडनाशकांचा वापर कमी होऊन शेतक-यांनी पर्यावरणपूरक शेती अवगत केली. यासोबतच कीटकनाशकमूक्त पीक उत्पादन शेतकर्यां नी घेतले. योग्य लागवड पद्धती व सिंचन व्यवस्थापणामुळे शेतीची जल उत्पादकता वाढली. या स्पर्धेमध्ये एकत्रितपणे पीक उत्पादन, शाश्वत शेती, प्रक्रिया व विक्री यांमध्ये सुयोग्य कार्य करणा-या शेतकरी गटांना दिनांक १२ मार्च २०२३ रोजी बालेवाडी, पुणे येथे झालेल्या कार्यक्रमात माननीय उपमुख्यमंत्री श्री देवेन्द्र फडणवीस व पानी फाऊंडेशनचे संस्थापक सिनेअभिनेता श्री आमीर खान यांच्या हस्ते पुरस्कार वितरीत करण्यात आले. समारंभात पानी फाऊंडेशनच्या शेतीशाळेमध्ये मार्गदर्शन करणार्याा वनामकृविच्या शास्त्रज्ञांचा सन्‍मान करण्यात आला.

सामंजस्य करारामुळे वनामकृवि शास्त्रज्ञ पानी फाऊंडेशनने आयोजित केलेल्या हंगामी व बहुवार्षिक पिके व पशुसंवर्धन यासाठी घेण्यात येणार्याञ डिजीटल शेतीशाळेमध्ये सहभागी होऊन पिकांची लागवड, पाणी व पोषण, अन्नद्रव्य व्यवस्थापन, कीड-रोग व्यवस्थापन इत्यादींबाबत शेतकरी गटांना मार्गदर्शन करणार आहेत. या शेतीशाळा पिकाच्या हंगामामध्ये नियमितपणे दर आठवड्याला आयोजित करण्यात येणार आहेत. याचा लाभ सत्यमेव जयते फार्मर कप स्पर्धेत राज्यातील ३९ तालुक्यातील स्पर्धेत सहभागी शेतकरी गटांना होणार आहे. या शेतीशाळेमध्ये शेतकर्यां ना आपल्या शेतीतील समस्याग्रस्त पिकाचे व्हिडिओ किंवा फोटो शास्त्रज्ञांना ऑनलाईन पद्धतीने दाखवता येतील. त्यामुळे  त्यात्या वेळी उद्भवणार्याच प्रश्नांचे निराकरण वेळीच करण्यात येईल.