Pages

Monday, March 6, 2023

भरड धान्य: अदृश्य ऊर्जा असलेले पौष्टिक अन्‍न ...... प्रा डॉ कैलास गाडे

वनामकृवित राष्‍ट्रीय छात्र सेनेच्‍या वतीने आयोजित कार्यक्रमात मार्गदर्शन

आंतरराष्‍ट्रीय भरड धान्‍य वर्ष २०२३ निमित्‍त वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठातील परभणी कृषी महाविद्यालयाच्‍या राष्‍ट्रीय छात्र सेनेचे छात्रसैनिक यांच्‍या करिता दिनांक ३ मार्च रोजी कृषी वनस्पतीशास्त्र विभाग येथील सभागृहात "भरडधान्य अदृश्य ऊर्जा पिके" या विषयावर मार्गदर्शन कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. यात कृषी अन्न तंत्र महाविद्यालयातील तज्ञ डॉ. कैलास गाडे यांनी मार्गदर्शन केले.

मार्गदर्शनात डॉ. कैलास गाडे म्हणाले की, भरड धान्य ही फायटो केमिकल्स युक्त, ग्लुटेन मुक्त, आम्ल निर्माण न करणारी आणि अलर्जी विरहित असुन हे मानवा करिता अदृश्य ऊर्जा असलेले अत्यंत पौष्टिक अन्‍न आहे. भरड धान्याचे सेवन केल्यास रक्तातील शर्करा ट्राय ग्लिसराइड्स आणि सी रिॲक्टिव्ह प्रोटीन च्या प्रमाणात घट होते, हृदयविकार आणि रक्तवाहिन्यासंबंधी रोग टळतात. ही धान्य तंतुमय असल्‍यामुळे आहारातील तंतूमध्ये पाणी शोषून घेऊन फुगण्याची क्षमता असते, यामुळे अन्न आतड्यात हळूहळू पुढे सरकते व पचनाचा कालावधी वाढविते. भरडधान्यात सात ते बारा टक्के प्रथिने दोन ते पाच टक्के मेद ६५ ते ७५ टक्के कर्बोदके आणि पंधरा ते वीस टक्के आहारातील फायबर असतात.

सदर कार्यक्रम शिक्षण संचालक डॉ धर्मराज गोखले, प्राचार्य डॉ. सय्यद इस्माईल यांच्‍या मार्गदर्शनाखाली छात्रसेना अधिकारी लेफ्टनंट डॉ. जयकुमार देशमुख यांनी आयोजित केला होता. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन ऋषभ रणवीर यांनी केले कार्यक्रम यशस्वीतेसाठी वैभव चाटेकर यांच्‍यासह छात्रसैनिकांनी परिश्रम घेतले.