Pages

Wednesday, April 26, 2023

कृषि पदवीधरांनी प्रामाणिकपणे समाजहिताकरिता कार्य करावे ...... कुलगुरू मा डॉ इन्‍द्र मणि

वनामकृवितील परभणी कृषि महाविद्यालयात आयोजित निरोप समांरभात प्रतिपादन 

जीवनात अनेक संकटे येतात, संकटांना तोंड देतांना व्‍यक्‍तीचे व्‍यक्‍तीमत्‍व घडत असते. महाविद्यालयीन जीवन हे व्‍यक्‍तीच्‍या आयुष्‍यातील महत्‍वाचा काळ असतो. जीवनात अनेक संधी येतात, त्‍या संधीना ओळखुन संधीचे सोने केले पाहिजे. कठोर परिश्रम व दृढ आत्‍मविश्‍वास हेच यशाचे गमक आहे. परभणी कृषि विद्यापीठाने देशाला व राज्‍याला अनेक अधिकारी दिले असुन राज्‍यात आज उच्‍च पदावर कृषि पदवीधर कार्य करित आहेत. कृषि पदवीधरांनी कोणत्‍याही क्षेत्रात कार्य करतांना प्रामाणिकपणे समाजाकरिता कार्य केले पाहिजे. येणा-या काळात विद्यापीठ विद्यार्थ्‍यांना अधिकाधिक सुविधा पुरविण्‍याकरिता प्रयत्‍न करित असल्‍याचे प्रतिपादन कुलगुरू मा डॉ इन्‍द्र मणि यांनी केले.

वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठातील परभणी कृषि महाविद्यालयाच्‍या कृषि पदवीच्‍या अंतिम वर्षातील विद्यार्थ्‍यांसाठी निरोप समारंभाचे दिनांक २५ एप्रिल रोजी आयोजन करण्‍यात आले होते, त्‍यावेळी ते बोलत होते. व्‍यासपीठावर प्रमुख पाहुणे म्‍हणुन शिक्षण संचालक डॉ धर्मराज गोखले हे होते तर प्राचार्य डॉ सय्यद ईस्‍माईल, जिमखाना उपाध्‍यक्ष डॉ पी आर झंवर, शिक्षण प्रभारी डॉ आर व्‍ही चव्‍हाण, कार्यक्रम अधिकारी डॉ आर जी भाग्‍यवंत आदींची प्रमुख उपस्थिती होती.

यावेळी शिक्षण संचालक डॉ धर्मराज गोखले म्‍हणाले की, परभणी कृषि विद्यापीठात शिकणारे अनेक विद्यार्थी हे ग्रामीण भागातुन येतात, कठिन परिश्रम घेऊन स्‍पर्धा परिक्षेची तयार करतात आणि विविध पदावर त्‍यांची निवड होते. विद्यापीठाचे कुलगुरू मा डॉ इन्‍द्र मणि हे ही ग्रामीण भागातुन शिक्षण घेऊन कठिन परिश्रमाच्‍या आधारे उच्‍च पदावर पोहचले असल्‍याचे ते म्‍हणाले.प्रास्‍ताविकात डॉ सय्यद ईस्‍माईल म्‍हणाले की, कृषि पदवीधरांनी कोणत्‍याही क्षेत्रात काम करतांना भ्रष्‍टाचारापासुन दुर राहीले पाहिजे.

कार्यक्रमात महाविद्यालयाचे विद्यार्थी शुशांत धनवडे व ऋषिकेश बोधवड यांची कृषि उपसंचालक म्‍हणुन निवड झाल्‍याबद्दल तर प्रविण पुरी व विजय मुनगीलवार यांची तालुका कृषि अधिकारी या पदावर निवड झाल्‍याबद्दल तसेच प्रज्ञाशिल वाघमारे यांची विक्री कर निरीक्षक म्‍हणुन निवड झाल्‍याबद्दल माननीय कुलगुरू यांच्‍या हस्‍ते सत्‍कार करण्‍यात आले. कार्यक्रमात महाविद्यालयाच्‍या विद्यार्थ्‍यांनी विविध सांस्‍कृतिक कला प्रकार सादर केले. कार्यक्रमाचे आयोजन पदवीच्‍या सहाव्‍या सत्राच्‍या विद्यार्थ्‍यांनी केले होते. कार्यक्रमास महाविद्यालयातील प्राध्‍यापक, अधिकारी, कर्मचारी व विद्यार्थी मोठया संख्‍येने उपस्थित होते.









Tuesday, April 25, 2023

वनामकृवित आंतरराष्ट्रीय भरड धान्य वर्षानिमित्त प्रमुख शास्त्रज्ञ डॉ. अशोक बडिगन्नावार यांचे व्‍याख्‍यान संपन्‍न

वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठातील परभणी कृषि महाविद्यालयाच्‍या वनस्‍पतीशास्‍त्र विभागाच्‍या वतीने दिनांक २४ एप्रिल रोजी अन्न व पोषण सुरक्षेत भरड धान्याची भुमिका या विषयावर भाभा अणुसंशोधन केंद्राचे प्रमुख शास्त्रज्ञ डॉ. अशोक बडिगन्नावार यांच्‍या व्‍याख्‍यानाचे आयोजन करण्‍यात आले होते. कार्यक्रमाच्‍या अध्‍यक्षस्‍थानी शिक्षण संचालक डॉ धर्मराज गोखले हे होते तर प्राचार्य डॉ सय्यद ईस्‍माइल, विभाग प्रमुख डॉ हिराकांत काळपांडे यांची प्रमुख उपस्थिती होती.

मार्गदर्शनात डॉ. अशोक बडिगन्नावार म्‍हणाले की, भरड धान्‍य पिके ही बदलत्‍या हवामानात तग धरणारी पिके असुन मानवी आरोग्‍यकरिता भरड धान्‍य उपयुक्‍त आहेत. भरड धान्‍याचा आहारात उपयोग केल्‍यास जीवनशैलीशी निगडीत अनेक शारिरीक व्‍याधीपासुन आपण लांब राहु शकतो.

याप्रसंगी डॉ अशोक बडिगन्‍नावार यांनी विभागातील पदव्युत्‍तर व आचार्य पदवीच्या विद्यार्थ्‍यांच्या विविध संशोधन प्रयोग प्रक्षेत्रास आणि कृषि वनस्पतीशास्त्र व भाभा अणुसंशोधन केंद्र यांच्या संयुक्त विद्यमाने राबविल्या जाणा­या प्रकल्‍प उत्परिवर्तनाद्वारे पिवळी ज्वारीच्या व रब्बी ज्वारीच्या उच्च उत्पादन व गुणवत्तामध्ये बदल घडविण्यासाठीच्या प्रयोगांना भेट देऊन उत्परिवर्तनाबाबत विद्यार्थ्‍यांना मार्गदर्शन केले. तसेच भाभा अणुसंशोधन केंद्र येथे नौकरीच्‍या संधी बाबत  माहिती दिली. कार्यक्रमाचे प्रास्तावीक विभाग प्रमुख डॉ. हिराकांत काळपांडे यांनी केले तर सुत्रसंचालन  डॉ. अंबिका मोरे यांनी केले. कार्यक्रम यशस्‍वीतेकरिता डॉ. राजेश धुतमल, डॉ. दिलीप झाटे, डॉ. अंबिका मोरे, डॉ. जयकुमार देशमुख आदींनी प्रयत्न केले. कार्यक्रमास विभागातील पदव्‍युत्‍तर विद्यार्थी मोठया संख्‍येने उपस्थित होते. 

Friday, April 21, 2023

ड्रोनव्‍दारे कीटकनाशक फवारणीचे प्रमाणित कार्य पध्‍दती (एसओपी) निश्चित

पिकनिहाय ड्रोन व्‍दारे फवारणीचे कुलगुरू मा डॉ इन्द्र मणि समितीने निश्चित केलेल्‍या प्रमाणित कार्य पध्‍दती (एसओपी) मसुदा अहवालाचे केंद्रीय कृषि मंत्री माननीय श्री नरेंद्र सिंह तोमर यांच्‍या हस्‍ते नवी दिल्‍ली येथे राष्‍ट्रीय पातळीवर विमोचन

पिकनिहाय ड्रोन व्‍दारे फवारणीकरिता प्रमाणित कार्य पध्दती (एसओपी) निश्चित करण्‍यासाठी राष्‍ट्रीय पातळीवर कृषि आणि शेतकरी कल्‍याण मंत्रालयाच्‍या कृषि, सहकार आणि शेतकरी कल्‍याण विभागाच्‍या वतीने वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठाचे कुलगुरू मा डॉ इन्‍द्र मणि यांच्‍या अध्‍यक्षतेखाली जुलै २०२२ मध्‍ये उच्‍चस्‍तरीय समितीचे गठण करण्‍यात आले होते. सदर समितीने दहा पिकनिहाय ड्रोन व्‍दारे फवारणीबाबत  प्रमाणित कार्य पध्‍दती निश्चित करून मसुदा अहवाल मंत्रालयास सादर केले होता. सदर मसुदा अहवालाचे दिनांक २० एप्रिल रोजी केंद्रीय कृषि मंत्री माननीय श्री नरेंद्र सिंह तोमर यांच्‍या हस्‍ते विमोचन कृषि भवन नवी दिल्‍ली येथे ऑनलाईन व ऑफलाईन माध्‍यमातुन करण्‍यात आले.

कार्यक्रमास कृषी आणि शेतकरी कल्याण मंत्रालयाचे सचिव मा श्री मनोज आहुजा, आयसीएआरचे महासंचालक मा डॉ. हिमांशू पाठक, कृषी आणि शेतकरी कल्याण मंत्रालयाचे अतिरिक्त सचिव श्री अभिलाक्ष लेखी, सहसचिव श्रीमती. शुभा ठाकूर, श्रीमती. एस. रुक्मणी, सुश्री विजयालक्ष्मी, कृषी आयुक्त श्री पी.के. सिंग, उपायुक्त (यांत्रिकीकरण आणि तंत्रज्ञान) श्री सी.आर.लोही आणि श्री. ए.एन. मेश्राम, ड्रोन समितीचे अध्‍यक्ष कुलगुरू मा डॉ इन्‍द्र मणि आदीसह देशातील कृषि तज्ञ, ड्रोन फेडरेशन ऑफ इंडिया, नागरी विमान मंत्रालयातील अधिकारी ऑनलाईन माध्‍यमातुन मोठया संख्‍येने उपस्थित होते. 

यावेळी मार्गदर्शनात केंद्रीय कृषी मंत्री श्री नरेंद्र सिंह तोमर म्‍हणाले की, कृषी क्षेत्रात ड्रोन तंत्रज्ञान सरकारने स्वीकारले आहे. देशात दोन वर्षापुर्वी काही भागात टोळ किडींचा प्रादुर्भाव झाला तेव्हा त्या वेळी ड्रोन तंत्रज्ञानाची गरज भासली होती, तेव्हापासून पंतप्रधान श्री मोदी यांच्या मार्गदर्शनाखाली केंद्र सरकारच्या पूर्ण सहकार्याने ड्रोन तंत्रज्ञान कार्य करण्‍यात येऊन आज ड्रोन व्‍दारे फवारणीचे कार्य पध्‍दती निश्चित झाली आहे. शेतीवरील खर्च कमी करण्यासाठी आणि कीटकनाशकांचे दुष्परिणाम टाळण्यासाठी शेतकऱ्यांना ड्रोनचा मोठ्या प्रमाणात फायदा होणार आहे. सदर ड्रोन तंत्रज्ञानाचा लाभ सर्वसामान्‍य शेतकरी, पदवीधर, लहान शेतकरी आदीसह शेवटच्या व्यक्तीपर्यंत पोहोचण्‍याकरिता शासन प्रयत्‍न करित आहे. याकरिता कृषी विद्यापीठे, कृषि विज्ञान केंद्रे, महाविद्यालये सर्वांनी मिळून काम करण्याची गरज आहे. विशेषत: कृषि पदवीधरांन करिता प्रशिक्षणे आयोजित केली पाहिजेत, ड्रोन तंत्रज्ञानाद्वारे त्यांना रोजगार मिळू शकेल, शिवाय त्यांना रोजगारही मिळू शकेल.

शेती क्षेत्रात ड्रोन वापराबाबत शेतकरी बांधवामध्‍ये मोठया प्रमाणात उत्‍सुकता असुन किटकनाशकांच्‍या फवारणीसाठी ड्रोनचा वापर भविष्‍यात निश्चितच फायदेशीर ठरणार आहे. तसेच तण व्यवस्थापन, जल व्यवस्थापन, कीड व रोग व्यवस्थापन, अन्नद्रव्य व्यवस्थापन आणि पिक विमा करिता ड्रोन चा वापर होणार आहे. ड्रोन वापरून हवाई फवारणी केल्याने मोठ्या प्रमाणात वेळ आणि श्रमाची बचत होऊन मोठ्या भागावर फार कमी कालावधीत फवारणी शक्‍य होते. काही वेळेस मनुष्याच्या आणि जमिनीवरील यंत्राव्‍दारे फवारणी करणे शक्‍य होत नाही, तेव्हा ड्रोनद्वारे फवारणी केली जाऊ शकते. शेतीतील कृषि निविष्‍ठा व ड्रोन तंत्रज्ञानाचा सुरक्षितकार्यक्षम आणि प्रभावी वापर करणे शक्‍य आहे. तसेच भविष्‍यात रोग आणि कीटकांचा प्रादुर्भाव शोधणे, पीक आरोग्य निरीक्षण, लक्ष्यित निविष्‍ठांचा वापर आणि पीक उत्पादन आणि पीक नुकसानाचे जलद मूल्यांकन करण्यासाठी ड्रोनचा वापर होणार आहे.

समितीने दहा पिकांकरिता प्रमाणित कार्य पध्‍दती केली निश्चित

सदर समितीने सोयाबीन, कापुस, ऊस, गहु, भात, मका, भुईमुग, तुर, करडई, तीळ आदी दहा पिकांत ड्रोनचा वापराची प्रमाणित कार्य पध्‍दती निश्चित केली असुन ड्रोन फवारणी करतांना घ्‍यावयाची काळजी याबाबतची मार्गदर्शक तत्‍वे दिली आहेत. कोणकोणती किटकनाशके, बुरशीनाशके ड्रोन फवारणीस उपयुक्‍त आहेत, त्‍याचे वापरावयाचे प्रमाण, ड्रोन उडण्‍याचा योग्‍य वेग व उंची, पाण्‍याचे प्रमाण, नोझलचा प्रकार, फवारणी करिता योग्‍य हवामानाची स्थिती, पिकांच्‍या कोणत्‍या वाढ अवस्‍थेत ड्रोनचा वापर करावा आदीबाबतचे मार्गदर्शक तत्‍व दिली आहेत. ड्रोन व्‍दारे फवारणी करतांना शेतीतील मित्र किडीं व पर्यावरणाचे नुकसान होणार नाही याबाबत काळजी घ्‍यावी लागणार आहे. सोयाबीन सारख्‍या स्वपरागित पिकांमध्‍ये फुलो-या अवस्‍थेते ड्रोन व्‍दारे फवारणी टाळण्‍यात यावी अन्‍यथा पिकांचे नुकसान होऊ शकते. पिकांवर किटकनाशकांची ड्रोन व्‍दारे फवारणी शक्‍यतो सकाळी किंवा सायंकाळी केल्‍यास जास्‍त प्रभावी ठरते, दुपारी किटकांच्‍या अळया मातीत लपलेल्‍या असतात. तसेच वा-यांचा वेग जास्‍त असल्‍यास, उष्‍ण वातावरणात, एक ते दोन दिवसात पाऊसाची शक्‍यता असतांना ड्रोन व्‍दारे फवारणी न करण्‍याची शिफारस करण्‍यात आली आहे. ड्रोन व्‍दारे फवारणी चुकीच्या पद्धतीने केल्‍यास पर्यावरण दूषित होऊ शकते. यासर्व बाबी ड्रोन चालकांस माहिती असणे आवश्‍यक आहे.

सदर समितीत देशातील तज्ञ मंडळीचा समावेश

सदर कुलगुरू मा डॉ इन्‍द्र मणि यांच्‍या अध्‍यक्षतेखालील समितीत देशातील तज्ञ मंडळीचा समावेश होता, यात नवी दिल्‍ली येथील कृषि मंत्रालयातील उपायुक्‍त इं‍जि. एस आर लोही हे सदस्‍य सचिव होते, तर समितीत पिक संरक्षण विभागाच्‍या डॉ अर्चना सिन्‍हाआयसीएआरचे डॉ आर एन साहुराहुरी कृषि विद्यापीठाचे डॉ सुनिल गोरंटीवारगुंटुर येथील डॉ ए सामभायआयएआरआयचे डॉ दिलीप कुशावाहकोईम्‍बतुर येथील डॉ एस पाझानिवेलनहैद्राबाद येथील किटकशास्‍त्रज्ञ डॉ रामगोपाल वर्मा आदींची समावेश होता. यासोबतच देशातील विविध कृषि विद्यापीठे, व खाजगी कंपन्‍या यांच्‍या कडील उपलब्‍ध संशोधनात्‍मक माहिती व आकडेवारीचा वापर करून सदर प्रमाणित कार्य पध्‍दती तयार करण्‍यात आली आहे.

शेतीत ड्रोन वापराबाबत परभणी कृषि विद्यापीठाचा पुढाकार

अमेरिकेतील फ्लोरिडा विद्यापीठ व देशातील खासगी ड्रोन कंपनीशी परभणी कृषि विद्यापीठाने सामजंस्‍य करार केले असुन नुकतेच परभणी कृषि विद्यापीठाने पाच ड्रोन खरेदी केली आहेत, विद्यापीठात अधिकृत ड्रोन पायलट प्रशिक्षण संस्‍था उभारण्‍यात येणार आहे. याव्‍दारे शेतकरी बांधव व ड्रोन चालकांना शास्‍त्रशुध्‍दी पध्‍दतीने ड्रोन फवारणी व ड्रोन परवानाकरिता प्रशिक्षणे आयोजित करण्‍यात येणार आहे. विद्यापीठात कस्‍टम हायरींग सेंटर स्‍थापन करून फवारणी करिता ड्रोन भाडे तत्‍वावर सेवा पुरविण्‍याची सुविधा निर्माण करण्‍यात येणार आहे. ड्रोन तंत्रज्ञानाबाबत शेतकरी बांधवात जागृती निर्माण करण्‍याकरिता ड्रोन कंपनीच्‍या मदतीने ड्रोन यात्रेचे आयोजन करण्‍यात येणार असल्‍याचे  कुलगुरू मा डॉ इन्‍द्र मणि यांनी सांगितले. 


Thursday, April 20, 2023

परभणी पर्यावरण रक्षक मोहिम येणार राबविण्‍यात ........ खासदार मा डॉ फौजिया खान

पर्यावरणीय बदल व पर्यावरणाचे होत असलेले प्रदुषण मोठया प्रमाणात होत असुन याबाबत जनजागृती करून पर्यावरणाचे वाढते प्रदुषण कमी करण्‍याच्‍या दृष्‍टीने उपाययोजना करणे अत्‍यंत आवश्‍यक आहे. या दृष्‍टीकोनातुन मोहिम स्‍वरूपात काम करण्‍याकरिता परभणी पर्यावरण रक्षम ही मोहिम राज्‍यसभा सदस्‍या खासदार मा डॉ फौजिया खान यांच्‍या पुढाकारातुन कास्‍मोपोलीटन एज्‍युकेशनल अॅन्‍ड वेल्‍फेअर सोसायटी परभणी आणि वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठ यांच्‍या संयुक्‍त विद्यमाने राबविण्‍यात येणार असुन सदर मोहिमेंतर्गत दिनांक १९ एप्रिल रोजी जिल्‍हयातील शालेय शिक्षकांच्‍या कार्यशाळेचे आयोजन परभणी कृषि महाविद्यालयाच्‍या सभागृहात करण्‍यात आले होते.

कार्यशाळाचे उदघाटन कार्यक्रमाच्‍या अध्‍यक्षस्‍थानी कुलगुरू मा डॉ इन्‍द्र मणि हे होते तर उदघाटक म्‍हणुन खासदार मा डॉ फौजिया खान या होत्‍या. व्‍यासपीठावर शिक्षणाधिकारी श्री विठ्ठल भुसारे, माजी वन अधिकारी श्री तहसिन अहमद खान, महाराष्‍ट्र प्रदुषण मंडळाचे उपविभागीय अधिकारी श्री एस आर कुलकर्णी, निवृत्‍त उपजिल्‍हाधिकारी श्री विश्‍वंभर गावंडे, गट शिक्षणाधिकारी श्री नरवडे, श्री मोहित जाने आदींची प्रमुख उपस्थिती होती.

अध्‍यक्षीय भाषणात कुलगुरू मा डॉ इन्‍द्र मणि म्‍हणाले की, आपणासमोर अन्‍न सुरक्षा, जल सुरक्षा आणि ऊर्जा सुरक्षेचे आव्‍हान असुन हवामान बदलाचा सर्वाधिक परिणाम शेतीवर होत आहे. शेतकरी बांधवांना अनेक समस्‍यांना तोंड दयावे लागत असुन विद्यापीठ बदलत्‍या हवामानास अनूकुल कृषि तंत्रज्ञान विकसित करीत आहे. पर्यावरणातील प्रदुषण रोखण्‍याची जबाबदारी सर्वांची असुन पर्यावरण सुरक्षित परभणी मोहिमेत शिक्षकांचे योगदान महत्‍वाचे आहे. शिक्षकांच्‍या माध्‍यमातुन विद्यार्थी या मोहिमेत मोठे योगदान देऊ शकतात असे मत व्‍यक्‍त करून परभणी कृषि विद्यापीठ या मोहिमे आपले सक्रीय सहभागी घेईल असे आश्‍वासन दिले.  

मार्गदर्शनात खासदार मा डॉ फौजिया खान म्‍हणाल्‍या की, परभणी जिल्‍हयात धुळीमुळे होत असलेले तसेच पाण्‍याचे होत असलेले प्रदुषण अत्‍यंत घातक आहे. त्‍यास आळा घालणे आवश्‍यक असुन याकरिता विविध पातळीवर मोहिम स्‍वरूपात काम करावे लागेल. मोहिमेत सर्वांनी सहभागी होण्‍याचे त्‍यांनी आवाहन केले. यात सर्व घटकात शिक्षक व विद्यार्थी यांनी सहभाग घ्‍यावा, या मोहिमेचे मुल्‍यांकन केले जाईल व त्‍यातुन चांगल्‍या शिक्षकांचा गौरव करण्‍यात येतील असे जाहिर केले.

श्री विठ्ठल भुसारे यांनी सर्व शिक्षकांचा या मोहिमेत सक्रीय सहभाग राहील व त्‍याची सुरूवात एक विद्यार्थी एक झाड लावण्‍याचा व ते वाढविण्‍याचा संकल्‍प व्‍यक्‍त केला. कार्यक्रमाच्‍या प्रास्‍ताविकात श्री विश्‍वंभर गावंडे यांनी विविध मार्गाने हवा, पाणी, ध्‍वनी व वातावरणीय प्रदुषणावर नियंत्रण करणे गरजेचे असल्‍याचे सांगुन कार्यशाळेचे आयोजनाचा उद्देश विषद केला. कार्यक्रमात मोहित जाने यांनी मोहिमेतील घटक व मोहिमेचा कालबध्‍द कार्यक्रम सांगुन याकरिती संगणकीय प्रणालीची संक्षिप्‍त माहीती दिली तर प्रदुषण मंडळाचे श्री एस आर कुलकर्णी यांनी प्रदुषक कमी करण्‍याचे उपाय सांगितले. कार्यक्रमाचे आभार श्री जावेद यांनी मानले. कार्यशाळेस जिल्‍हयातील सातवी, आठवी व नववी वर्गाचे शिक्षक मोठया संख्‍येने उपस्थित होते. यावेळी या मोहिमेमुळे परभणी जिल्‍हयात पर्यावरण पुरक वातावरण निर्माण होईल अशी आशा व्‍यक्‍त केल्‍या जात आहे. परभणी जिल्‍हयात पर्यावरण रक्षम ही मोहिम जुन ते डिसेंबर कालावधीत राबविण्‍यात येणार असुन मोहिमेत शिक्षकांच्‍या सहकार्याने विद्यार्थ्‍यांचा सहभाग घेण्‍यात येणार आहे. 

Wednesday, April 19, 2023

महिला सुक्ष्‍म उद्योजक विकास कार्यशाळा संपन्‍न

वसंतराव नाईक मराठवाडा विद्यापीठ, शेतकरी उत्‍पादक गट आमराई व एस.पी. जैन रिसर्च इन्स्टिट्यूट मुंबई यांच्या संयुक्त विद्यमाने दिनांक १९ एप्रिल रोजी महिला कुशल सूक्ष्म उद्योजक विकास कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले होते. कार्यक्रमास उद्घाटक म्हणून कुलगुरू मा डॉ. इन्‍द्र मणि हे होते तर खासदार मा श्रीमती फौजिया खान, एस.पी.जैन इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंट अँड रिसर्च च्‍या अधिष्‍ठाता डॉ. चंद्रलिका परमार, अन्न तंत्र महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. राजेश क्षीरसागर, आमराई डॉ.सॅम्युअल नाजरेद, प्राचार्या डॉ.जया बंगाळे, डॉ. स्मिता खोडके, बँक ऑफ इंडिया मुंबई श्रीमती ममता भट, डॉ. ज्योत्स्ना इंगळे, श्रीमती ठाकूर आदी प्रमुख व्याख्याते उपस्थित होते.

अध्‍यक्षीय भाषणात कुलगुरू मा डॉ इन्‍द्र मणि म्‍हणाले की, विद्यापीठ शास्‍त्रज्ञ विविध कृषि उद्योग, प्रक्रिया उद्योग, मुल्‍यवर्धीत पदार्थ निर्मिती यावर वेळोवेळी तांत्रिक मार्गदर्शन करतात. यासोबत विविध संस्‍थाच्‍या सहकार्याने उद्योग उभारी करिता मदत केल्‍यास महिला उद्योजकता विकासास मोठा हातभार लाभेल. कृषी विद्यापीठ कृषि उद्योजकता विकासाकरिता वेळोवेळी प्रशिक्षणाचे आयोजन करते.

खासदार मा श्रीमती फौजिया खान म्‍हणाल्‍या की, ग्रामीण महिलांना शेती पुरक व्‍यवसाय करण्‍यास मोठा वाव असुन यामुळे महिला सक्षमीकरण होऊन ग्रामीण विकासास हातभार लाभेल.

कार्यशाळेचा उद्देश जिल्ह्यातील उद्योजकांना एकत्र करून प्रशिक्षण, ब्रॅण्डिंग, योग्य पॅकिंग करून त्यांना मार्केट उपलब्ध करून देण्यासाठी मुंबई येथील एस पी जैन कॉलेज, अमराई सहकार्य करणे. ग्रामीण भागातील महिलांनी उत्पादित केलेल्या प्रक्रिया पदार्थ एका छत्रा खाली आणून त्यांचा व्यवसाय वृद्धिंगत करण्यास मदत होईल. पारंपरिक अन्नपदार्थ वेगवेगळ्या ऑनलाईन मार्केट, मॉल, व्यवसायिक यांच्या मदतीने विक्री व्यवस्था सक्षम करण्यास मदत होईल. कार्यशाळेत विद्यापीठातील तज्ञांनी मार्गदर्शन केले.

शेतकरी उत्‍पादक कंपनी व स्‍वयंसहाय्यता गटाचे प्रतिनिधी प्रगतशील शेतकरी श्री नरेश शिंदे, श्री सुशील कांबळे, श्री सुकेशनी चौधरी, श्री युवराज गव्हाणे, श्री अनिल समिंद्रे आदीसह महिला बचत गटाच्या प्रतिनिधी व उद्योजक महिला उपस्थित होत्या. असोला, मुरुंब, ब्राह्मणगाव, पिंगळी आणि इतर गावातील महिला उद्योजिकांच सहभाग होता.


दामपुरी येथील अशोक सालगोडे यांना क्रीडा चा उत्‍कृष्‍ट शेतकरी पुरस्‍कार

अखिल भारतीय समन्वित कृषि हवामानशास्‍त्र संशोधन प्रकल्‍प निक्रा अंतर्गत  हवामान आधारीत कृषी सल्‍ला पत्रिकेनुसार  आधुनिक  पध्‍दतीने  शेती  तसेच फळबागेचे  व्‍यवस्‍थापन करत या तंत्रज्ञानाचा शेतक-यांमध्‍ये प्रसार केल्‍याबद्दल दामपुरी ता परभणी येथील प्रगतशील शेतकरी श्री अशोक सालगोडे यांना भारतीय कृषी संशोधन परिषद  अंतर्गत हैद्राबाद येथील केंद्रीय कोरडवाहु शेती संशोधन संस्‍थेच्‍या सेंद्रल इन्स्टिटयुट ऑफ ड्रायलॅन्‍ड अॅग्रिकल्‍चर क्रीडा ३९ व्‍या स्‍थापना दिनानिमित्‍त उत्‍कृष्‍ट शेतकरी पुरस्‍कार देऊन सन्‍मानित करण्‍यात आले. यावेळी आयसीएआर चे माजी महासंचालक डॉ त्रिलोचन महापात्रा, माजी कुलगुरू डॉ बी व्‍यंकटेश्‍वरलु, आनंद कृषि विद्यापीठाचे माजी कुलगुरू डॉ ए एम शेख, क्रीडाचे  संचालक डॉ व्ही के सिंग, माजी संचालक डॉ वाय एस रामकृष्ण,  प्रकल्‍प समन्‍वयक डॉ एस के बल, डॉ तोमर, डॉ वर्मा, डॉ शेख, डॉ कैलास डाखोरे आदी उपस्थित होते.

Friday, April 14, 2023

वनामकृवित भारतरत्‍न डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती उत्‍साहात साजरी


वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठाच्‍या विद्यार्थी कल्‍याण अधिकारी कार्यालयाच्‍या वतीने भारतरत्‍न डॉ बाबासाहेब आंबेडकर यांची १३२ वी जयंती दिनांक १४ एप्रिल रोजी साजरी करण्‍यात आली. यावेळी भारतरत्‍न डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्‍या प्रतिमेचे कुलगुरू मा डॉ इन्‍द्र मणि यांच्‍या हस्‍ते पुजन करून विनम्र अभिवादन करण्‍यात आले. व्‍यासपीठावर शिक्षण संचालक डॉ धर्मराज गोखले, संशोधन संचालक डॉ दत्‍तप्रसाद वासकर, विस्‍तार शिक्षण संचालक डॉ देवराव देवसरकर, कुलसचिव डॉ धिरजकुमार कदम, प्राचार्य डॉ उदय खोडके, प्राचार्या डॉ जया बंगाळे, प्राचार्य डॉ राजेश क्षीरसागर, विद्यापीठ उपअभियंता डॉ दयानदं टेकाळे, विभाग प्रमुख डॉ गजेंद्र लोंढे, विद्यार्थी कल्‍याण अधिकारी डॉ सचिन मोरे आदींची प्रमुख उपस्थिती होती.

याप्रसंगी कुलगुरू मा डॉ इन्‍द्र मणि यांनी भारतरत्‍न डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती निमित्‍त शुभेच्‍छा देतांना म्‍हणाले की, डॉ बाबासाहेब यांचे जीवन मोठे संघर्षमय होते, त्‍यांनी कठीन परिश्रमाव्‍दारे अध्‍ययन करून जगातील ज्ञान प्राप्‍त केले. ते एक ज्ञानी पुरूष, विकास पुरूष व शिक्षण पुरूष होते. त्‍यांचे विचार आजही जीवंत आहेत. त्‍यांनी दाखविलेल्‍या मार्गाचा अवलंब केल्‍यास देशाचा विकास होईल, विद्यार्थ्‍यांनी त्‍यांच्‍या चरित्रांचे व विचारांचे मंथन केले पाहिजे, त्‍यांचे विचार आचरणात आणले पाहिजेत, जीवनात यशस्‍वी होण्‍याकरिता दुरदृष्‍टी ठेऊन विद्यार्थ्‍यांनी कठोर परिश्रम केले पाहिजे. समाज बांधणी मध्‍ये आपले योगदान दिले पाहिजे, असा सल्‍ला देवुन त्‍यांनी जयंती निमित्‍त विद्यार्थ्‍यांनी राबविलेल्‍या सतत अठरा तास अभ्‍यास उपक्रमाचे कौतुक केले. 

यावेळी विद्यापीठाच्‍या वतीने ढोलताश्‍याच्‍या गजरात भारतरत्‍न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्‍या प्रतिमेची मिरवणुक काढण्‍यात आली. कार्यक्रमास विद्यापीठातील अधिकारी, कर्मचारी व विद्यार्थी-विद्यार्थींनी मोठ्या संख्‍येने उपस्थित होते.





Thursday, April 13, 2023

वनामकृवित भारतरत्‍न डॉ. बाबासाहेब आंबेडकर व महात्‍मा ज्‍योतिबा फुले यांच्‍या संयुक्‍त जयंती निमित्‍त अठरा तास अभ्यासमालिका

५०९ विद्यार्थी व विद्यार्थींनीचा सहभाग

भारतरत्‍न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे संपुर्ण जीवन हे संघर्षमय होते. सामाजिक आणि आर्थिक अडचणीवर मात करुन यांनी आपले उच्‍च शिक्षण पुर्ण केले व भारत देशाची राज्‍यघटनेची निर्मिती केली, ही राज्‍यघटना म्‍हणजे जगाला दिलेली एक अजोड देणगी असुन संपुर्ण जग त्‍यांचा सन्‍मान करतो, असे प्रतिपादन वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठाचे कुलगुरू मा डॉ. इन्‍द्र मणि यांनी केले. कृषि महाविद्यालयाच्‍या वतीने भारतरत्‍न डॉ. बाबासाहेब आंबेडकर व महात्‍मा ज्‍योतिबा फुले यांच्‍या संयुक्‍त जयंती निमित्‍त अठरा तास अभ्‍यासमालिकेचे आयोजन दिनांक १३ एप्रिल रोजी करण्‍यात आले होते, या कार्यक्रमाच्‍या उदघाटन प्रसंगी ते बोलत होते. यावेळी शिक्षण संचालक डॉ. धर्मराज गोखले, प्राचार्य डॉ जी एम वाघमारे, विविध विभागाचे विभाग प्रमुख आदींची प्रमुख उपस्थिती होती. माननीय कुलगुरू यांच्‍या हस्‍ते भारतरत्‍न डॉ. बाबासाहेब आंबेडकर व महात्‍मा ज्‍योतिबा फुले यांच्‍या प्रतिमेचे पुजन करून विनम्र अभिवादन करण्‍यात आले.

कुलगुरू मा डॉ इन्‍द्र मणि पुढे म्‍हणाले की, भारतरत्‍न डॉ. बाबासाहेब आंबेडकर विद्यार्थीदशेत अठरा तास अभ्‍यास करीत होते. अभ्‍यासाच्‍या माध्‍यमातुन त्‍यांनी अजोड असे ज्ञान प्राप्‍त केले, त्‍यामुळेच भारतीय राज्‍यघटनेची निर्मिती ते करु शकले. त्‍यांच्‍या जीवनचरित्रापासुन विद्यार्थ्‍यांनी प्रेरणा घेवुन आपला जास्‍तीत जास्‍त महाविद्यालयीन वेळ हा अभ्यासासाठी द्यावा, असा सल्‍ला त्‍यांनी दिला. 

कार्यक्रमाचे सुत्रसंचालन विद्यापीठ ग्रंथपाल डॉ संतोष कदम यांनी केले. अठरा तास अभ्‍यासवर्गाच्‍या उपक्रमात कृषि महाविद्यालयाचे ५०९ विद्यार्थी व विद्यार्थींनीनी सहभाग नोंदविला. कार्यक्रमास विद्यापीठातील विद्यार्थी, विद्यार्थीनी, प्राध्‍यापक व कर्मचारी मोठ्या संख्‍येने उपस्थित होते. 




Thursday, April 6, 2023

पूर्व-प्राथमिक शाळेचे राष्ट्र निर्माणात मोठे योगदान ..... कुलगुरू मा डॉ. इन्द्र मणि

वनामकृविच्‍या सामुदायिक विज्ञान महाविद्यालयातील प्रायोगिक पूर्व प्राथमिक शाळेचा ११ वा दीक्षांत समारंभात प्रतिपादन

बालकांच्या सर्वांगीण विकासात पूर्व प्राथमिक शिक्षणाचे अनन्य साधारण महत्त्व असून या शाळांचे राष्ट्र निर्माणात मोठे योगदान असल्याचे मत कुलगुरू मा डॉ इन्‍द्र मणि यांनी केले. वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठातर्गत असलेल्‍या सामुदायिक विज्ञान महाविद्यालयातील मानव विकास व कौटुंबिक अभ्यास विभागात असलेल्या प्रायोगिक पूर्व प्राथमिक शाळेचा ११ व्या कॉन्व्होकेशन दीक्षांत समारंभाच्‍या अध्‍यक्षीय भाषणात ते बोलत होते. कार्यक्रमास विशेष अतिथी म्‍हणुन शिक्षण संचालक डॉ. धर्मराज गोखले तर व्‍यासपीठावर सहयोगी अधिष्ठाता व प्राचार्य डॉ. जया बंगाळे यांची प्रमुख उपस्थिती होती.

कुलगुरू मा डॉ इन्‍द्र मणि पुढे म्‍हणाले की, प्रायोगिक पूर्व प्राथमिक शाळेत विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासाचा पाया मजबूत होत असल्याने त्यांचा लाभ विदयार्थ्यांचे उज्वल भविष्य घडवण्यासाठी निश्चीतपणे होत आहे. या शाळेला ४० वर्षापेक्षाही अधिक वैभवशाली इतिहास असून याकरिता अद्यापपर्यंत अनेकांनी योगदान दिले आहे. शाळेचा शैक्षणिक दर्जा टिकवून ठेवत तो अधिक उंचावण्यासाठी सध्‍या प्राध्यापक व शिक्षक प्रयत्न करत असल्याने त्यांचेही त्यांनी कौतूक केले.

मार्गदर्शनात डॉ. धर्मराज गोखले यांनी सर्व विद्यार्थ्यांचे अभिनंदन करुन बालकांच्या विकासाकरिता पूरक वातावरण निर्मिती करण्याची जबाबदारी पालक, शिक्षक व समाजाची असल्याचे मत व्यक्त केले. प्रास्‍ताविकात प्राचार्य डॉ जया बंगाळे यांनी प्रायोगिक पूर्व प्राथमिक शाळेत बालकांच्या सर्वांगीण विकास घडवत असतांना नवीन शैक्षणिक धोरणानुसार त्यांच्या पायाभूत साक्षरतेवर अधिक भर देत असल्याने पालकांकडून या शाळेला मुलांच्‍या प्रवेशाकरिता मोठी मागणी असल्याचे सांगितले.

समारोहात ब्रिज सेक्शनचे विद्यार्थी अन्वी हिंगे, स्वरुपा भातलवंडे, इशिता शिंदे, नित्यायनी तिवारी, राजवीर सोंळके यांनी शाळेविषयी त्यांच्या असणाऱ्या ह्रदयस्पर्शी भावना व्यक्त केल्या. समारोहात प्रायोगिक पूर्व प्राथमिक शाळेमधून पूर्व प्राथमिक शिक्षण यशस्वीरित्या पूर्ण केलेल्या एकूण ३० विद्यार्थ्यांना मान्यवरांनी प्रशस्तीपत्रे प्रदान केली. कार्यक्रमात नुकतेच प्रशिक्षणासाठी थायलंड येथे जाऊन आलेल्या डॉ. वीणा भालेराव आणि पदव्युत्तर विद्यार्थीनी सुषमा माने यांचे देखील मा. कुलगुरू यांच्या हस्ते  सन्मान करण्यात आलला. समारोहाच्या यशस्वीतेसाठी प्रा. नीता गायकवाड व प्रियंका स्वामी तसेच या शाळेच्या शिक्षिका व मदतनीस, महाविद्यालयातील कर्मचारी, पदव्युत्तर व पदवीपूर्व विद्यार्थ्यांचे सहकार्य लाभले. समारोहाचे सुत्र संचालन डॉ. वीणा भालेराव यांनी केले. याप्रसंगी विद्यार्थी,पालक, प्राध्यापक व कर्मचारी बहुसंख्येने उपस्थित होते.