Pages

Wednesday, May 10, 2023

परभणी कृषि महाविद्यालयाच्‍या माजी विद्यार्थ्‍यांचा स्‍नेहमेळावा उत्‍साहात साजरा

परभणी कृषि महाविद्यालयचे माजी विद्यार्थी  अॅड अनंत चोंदे यांनी नुतनीकरण केलेल्‍या खोलीचे लोकार्पण

वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठातील परभणी कृषि महाविद्यालयाच्‍या माजी विद्यार्थ्‍यांचा स्‍नेहमेळावा, ग्रीष्‍म वसतीगहातील माजी विद्यार्थ्‍यानी नुतनीकरण केलेल्‍या खोलीचे लोकार्पण व महाविद्यालयाचे विविध पदावर कार्यरत असलेल्‍या अधिकारी यांचे मार्गदर्शन कार्यक्रमाचे दिनांक ९ मे रोजी उत्‍साहात पार पडला. कार्यक्रमाच्‍या अध्‍यक्षस्‍थानी कुलगुरू मा डॉ इन्‍द्र मणि हे होते तर माननीय आमदार तथा विद्यापीठ कार्यकारी परिषदेचे सदस्‍य मा श्री सुरेशराव वरपुडकर याची उदघाटक म्‍हणुन उपस्थिती होते. व्‍यासपीठावर विशेष अतिथी व सत्‍कारमुर्ती महाविद्यालयाचे माजी विद्यार्थी तथा कृषी आयुक्‍त मा श्री सुनिल चव्‍हाण, श्रीमती चव्‍हाण, नाशिकचे पोलीस आयुक्‍त मा श्री अंकुश शिंदेशिक्षण संचालक डॉ धर्मराज गोखले, श्री रामभाऊ घाटगे, डॉ सोंडगे, आयोजक प्राचार्य डॉ सय्यद ईस्‍माइलकृषी विद्यापीठ पदवीधर संघाचे अध्‍यक्ष अॅड अनंत चोंदे आदींची प्रमुख उपस्थिती होती. 

कार्यक्रमात कृषी आयुक्‍त मा श्री सुनिल चव्‍हाण, श्रीमती चव्‍हाण, नाशिकचे पोलीस आयुक्‍त मा श्री अंकुश शिंदे आदीसह महाविद्यालयाचे माजी विद्यार्थी राज्‍यातील विविध पदावर कार्यरत अधिकारी, लोकप्रतिनिधी, व उद्योजक यांचा मान्‍यवरांच्‍या हस्‍ते शाल, स्‍मृतीचिन्‍ह देऊन विशेष सत्‍कार करण्‍यात आला. ग्रीष्‍म वसतीगृहातीत खोली क्र ४२ मध्‍ये वास्‍तव्‍यास असणारे सन १९९२ बॅचचे कृषि पदवीचे माजी विद्यार्थी तथा विद्यापीठ कार्यकारी परिषदेचे माजी सदस्य अॅड. अनंत चोंदे यांनी स्‍वखर्चातुन खोलीचे नुतनीकरण केले या खोलीचे मान्‍यवरांच्‍या हस्‍ते लोकार्पण करण्‍यात आले. 

अध्‍यक्षीय भाषणात कुलगुरू मा डॉ इन्‍द्र मणि म्‍हणाले की, परभणी कृषि विद्यापीठातुन अनेक कृषी पदवीधर देशात व राज्‍यात विविध पदावर कार्य करत आहेत. आज आपण घडलात याचे मोठे योगदान महाविद्यालयातील शिक्षकांचे मोठे योगदान आहे, त्‍यांचे ऋुण कधीही विसरू नयेत. या कृषी पदवीधराचे महावि़द्यालय, गुरूजनांशी असलेले नाते आजही अतुट आहे. महाविद्यालयीन वसतीगृहातील कार्यकाळ हा विद्यार्थी जीवनातील मोठा वळणबिंदु असतो. अॅड. अनंत चोंदे या माजी विद्यार्थीनी स्‍वखर्चातुन तो राहत असलेली खोली अत्‍यंत चांगल्‍या पध्‍दतीने नुतनीकरण केले, हे निश्चितच कौतुकास्‍पद आहे, याचा आदर्श घेऊन इतर माजी विद्यार्थी पुढे येत आहेत, ही चांगली बाब आहे. शेतकरी व विद्यार्थी हेच कृषि विद्यापीठाच्‍या कार्याचे हे केंद्रबिंदु त्‍याकरिता चांगली सेवा – सुविधा देण्‍याचा विद्यापीठ प्रयत्‍नशील असल्‍याचे ते म्‍हणाले. 

उदघाटनपर भाषणात आमदार मा श्री सुरेश वरपुडकर म्‍हणाले की, परभणी कृषी विद्यापीठाची स्‍थापना मोठया संघर्षातुन झाली असुन विद्यापीठास मोठा इतिहास आहे. या विद्यापीठातील विद्यार्थी परिपक्व होऊन बाहेर पडतो, समाजाकरिता व शेतीकरिता विविध पदावर आपले भरीव योगदान कृषि पदवीधरांनी दिले आहे. कृषि शिक्षणात मुलींचे प्रमाण वाढत असुन ही चांगली बाबी आहे. 

मनोगतात कृषी आयुक्‍त मा श्री सुनिल चव्‍हाण म्‍हणाले की, परभणी कृषी महाविद्यालयातील कृषि पदवीधरांनी जिल्‍हा प्रशासन व कृषि विभागात आपला ठास उमटवला आहे. आजही माजी विद्यार्थ्‍यांना महाविद्यालयातील शिक्षकांप्रती आदराची भावना आहे. महाविद्यालयीन मित्रामध्‍ये अतुट नाते टिकुन आहे, ही संस्‍कृती जपावी लागणार आहे. परभणी महाविद्यालयात बहुसंख्‍येने विद्यार्थी ग्रामीण भागाातुन येतात, महाविद्यालयीन वस्‍तीगृहातील वास्‍तवात अनेक समस्‍यांना तोंड देतांना विद्यार्थी घडत असतो, यामुळे नौकरी मध्‍ये कोणत्‍याही पदावर काम करतांना अडचण येत नाही. नाशिकचे पोलीस आयुक्‍त मा श्री अंकुश शिंदे म्‍हणाले की, महाविद्यालयीन संघर्षमय कार्यकाळातील अनुभवामुळे कृषि पदवीधराचे व्‍यक्‍तीमत घडते, पुढे नौकरीत अनेक समस्‍यां खंबीरपणे हा कृषि पदवीधर तोंड देता, याचा अनुभव मला आहे. विद्यापीठ ग्रंथालय अत्‍यंत चांगले असुन विद्यार्थ्‍यांनी याचा लाभ घ्‍यावा. सकारात्‍मक दृष्‍टीकोन ठेवुन कठोर परिश्रम व सातत्‍य ठेवल्‍यास कोणत्‍याही क्षेत्रात यश प्राप्‍त होते, असे मत त्‍यांनी व्‍यक्‍त केले. 

कार्यकमात शिक्षण संचालक डॉ धर्मराज गोखले यांनी परभणी कृषि महाविद्यालयाच्‍या शिक्षण योगदानाबाबत माहिती दिली. प्रास्‍ताविक प्राचार्य डॉ सय्यद ईस्‍माइल यांनी केले. सुत्रसंचालन अॅड अनंत चोंदे, डॉ पुरूषोत्‍तम झंवर, डॉ रणजित चव्‍हाण यांनी केले. कार्यक्रमास महाविद्यालयाचे माजी विद्यार्थी, अधिकारी, प्राध्‍यापक, व विद्यार्थी मोठया संख्‍येने उपस्थित होते.