Pages

Thursday, June 29, 2023

कृ‍षी क्षेत्रात फोटोव्‍होल्‍टेइक तंत्रज्ञानाच्‍या वापराकरिता वनामकृविचा जर्मनीच्‍या जीआयझेड कंपनीशी सामंजस्‍य करार

अॅग्रीपीव्‍ही तंत्रज्ञानाच्‍या माध्‍यमातुन सौर उर्जेतुन वीज निर्मिती सोबत पिकांची लागवड असे दुहेरी उत्‍पादन शक्‍य ...... कुलगुरू मा डॉ इन्द्र मणि

अॅग्रोपीव्‍ही तंत्रज्ञान विकास व संशोधन करिता वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठ, परभणी,  जर्मन एजन्सी जीआयझेड (GIZ) आणि सनसीड प्रायव्‍हेट लिमिटेड यांच्‍यात दिनांक २४ जुन रोजी नवी दिल्‍ली येथील भारतीय राष्‍ट्रीय विज्ञान अकादमी सभागृहात सामंजस्‍य करार झाला. यावेळी कुलगुरू मा डॉ इन्‍द्र मणि आणि जीआयझेडच्‍या इंडो-जर्मन एनर्जी फोरमचे संचालक टोपियास विंटर, सनसीड एपीव्ही प्रायव्हेट लिमिटेडचे मुख्‍य कार्यकारी अधिकारी श्री. विवेक सराफ, जीपी पंत कृषी आणि तंत्रज्ञान विद्यापीठाचे माजी कुलगुरू डॉ.पी.एल. गौतम, आणि वायव्‍हीके राहुल हे उपस्थित होते.

अॅग्रीपीव्‍ही तंत्रज्ञानाबाबत माहिती देतांना कुलगुरू मा डॉ इन्‍द्र मणि म्‍हणाले की, अॅग्रीपीव्‍ही - अॅग्रीफोटोव्‍होल्‍टेइक (AgriPV) तंत्रज्ञानाच्‍या माध्‍यमातुन शेतात सौर उर्जेतुन वीज निर्मिती आणि विविध पिकांचे लागवड दोन्‍ही कार्य करणे शक्‍य होते. सौर ऊर्जा निर्मितीचे जे पॅनल असतात ते शेतात उभे करून त्‍याखालील जागेत विविध पिकांची लागवड केली जाते. हे तंत्रज्ञान पर्यावरण पुरक असुन कोणतेही प्रदुषण होत नाही. या तंत्रज्ञानाचा जर्मनी, जपान व इटली देशामध्‍ये वापर होत असुन भारतातही तंत्रज्ञानास वाव आहे. सौर ऊर्जाच्‍या पॅनल करिता मोठया प्रमाणात जमिन क्षेत्रफळाची आवश्‍यकता लागते, त्‍यामुळे अॅग्रीपीव्‍ही तंत्रज्ञानाच्‍या माध्‍यमातुन सौर ऊर्जेतुन वीज निर्मितीसोबत विविध पिकांची लागवड केल्‍यास शेतकरी बांधवाना दुहेरी उत्‍पन्‍न मिळण्‍याचे साधन प्राप्‍त होऊ शकते. हे तंत्रज्ञान भारताकरिता नवीन असुन या तंत्रज्ञानाची मराठवाडयातील पिक पध्‍दतीत कितपत उपयुक्‍त ठरू शकते, याकरिता संशोधनाची गरज असुन परभणी कृषि विद्यापीठाने जीआयझेड सामजंस्‍य करार केला आहे.

जीआयझेड हा जर्मन फेडरल सरकारच्या मालकीचा आंतरराष्ट्रीय उपक्रम आहे, जो १३० हून अधिक देशांमध्ये अनेक क्षेत्रात कार्यरत आहे. सदर करारांतर्गत संशोधन प्रकल्‍पाचा उद्दिष्ट विविध ऍग्रिव्होल्टेइक संरचना अंतर्गत योग्य पीक लागवडीची धोरणे तयार करणे आहे, तसेच भारतातील हवामानात विशेषतः मराठवाडा विभागात अॅग्रीपीव्ही तंत्रज्ञानास अनूकुल पिक पध्‍दती तयार करणे हा असुन विद्यापीठाच्‍या पदव्‍युत्‍तर विद्यार्थ्‍यांनाही संशोधनास मदत होणार आहे. यासोबतच कराराच्‍या माध्‍यमातुन सेंद्रीय शेती, काटेकोर शेती, नैसर्गिक संसाधन व्‍यवस्‍थापन आणि इतर तत्‍सम क्षेत्रात जीआयझेड सोबत सहकार्याने संशोधन करण्‍यात येणार आहे.




Tuesday, June 27, 2023

कृषि व ग्राम विकासात महिलांचे मोठे योगदान …… कुलगुरू मा डॉ इन्‍द्र मणि

मौजे मांडाखळी येथे आयोजित माझा एक दिवस माझ्या बळिराजासाठी उपक्रमात प्रतिपादनड्रो

न फवारणीचे दाखविण्‍यात आले प्रात्‍यक्षिक 

महिला व युवकांचा मोठा सहभाग 

कृषि व ग्राम विकासात महिलांचे मोठे योगदान असुन समाजात महिलांचा योग्‍य सन्‍मान झाला पाहिजे. प्रत्‍येक क्षेत्रात महिला आघाडीवर असुन शेतीतील अनेक काम महिला चांगल्‍या पध्‍दतीने करतात. कृषि क्षेत्रात डिजिटल तंत्रज्ञान वापराबाबत परभणी कृषि विद्यापीठाने पुढाकार घेतला असुन शेतकरी बांधवामध्‍ये ड्रोन तंत्रज्ञानाचा प्रसार व प्रचार करिता विविध उपक्रम राबविण्‍यात येत आहेत. राष्‍ट्रीय पातळीवर शेतीत ड्रोन वापराबाबत कार्यपध्‍दती व मार्गदर्शक तत्‍वे निश्चित झाले आहे. ड्रोनचा वापर केल्‍यास कमी वेळात कार्यक्षमरीत्‍या किटकनाशकांची फवारणी होते. सेंन्‍सर व्‍दारे ड्रोनच्‍या माध्‍यमातुन पिकांतील किड व रोगाचा प्रादुर्भाव ओळखुन इच्छित ठिकाणीची किटकनाशकांची फवारणी करता येणार आहे, असे प्रतिपादन कुलगुरू मा डॉ इन्‍द्र मणि यांनी केले. महाराष्‍ट्र शासनाच्‍या सुचनेनुसार वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठाच्या वतीने संपूर्ण मराठवाड्यात दिनांक २७ जुन रोजी 'माझा एक दिवस माझ्या बळीराजासाठी' हा उपक्रम राबविण्यात आला, या उपक्रमांतर्गत परभणी तालुक्‍यातील मौजे मांडाखळी येथे परभणी कृषी विज्ञान केंद्र व विस्‍तार शिक्षण संचालनालय यांच्‍या संयुक्‍त विद्यमाने शेतकरी मेळाव्‍याचे आयोजन करण्‍यात आले होते. कार्यक्रमाच्‍या अध्‍यक्षस्‍थानी कुलगुरू मा डॉ इन्‍द्र मणि हे होते, तर विस्‍तार शिक्षण संचालक डॉ देवराव देवसरकर, सरपंच श्री नागेश सिराळ, उद्यानविद्या महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ एम बी पाटील, कृषि विज्ञान केंद्राचे कार्यक्रम समन्‍वयक डॉ प्रशांत भोसले, नाहेप प्रकल्‍प अन्‍वेषक डॉ गोपाल शिंदे आदीसह विद्यापीठाचे शास्त्रज्ञ व अधिकारी उपस्थित होते. 

अध्‍यक्षीय भाषणात कुलगुरू मा डॉ इन्‍द्र मणि म्‍हणाले की, विद्यापीठाने नुकतेच ग्राफ्टींग रोबोट खरेदी केले असुन ही सुविधा शेतकरी बांधवा उपलब्‍ध करण्‍यात येईल. डिजिटल तंत्रज्ञानाबाबत ग्रामीण युवकांचे कौशल्‍य विकास केल्‍यास मोठा रोजगार ही उपलब्‍ध होईल. विद्यापीठ शेतकरी,  महिला व युवकांमध्‍ये उद्योजकता विकासाकरिता प्रयत्‍नशील आहे. नवीन राष्‍ट्रीय शिक्षण धोरणात निरंतर शिक्षणाची संधी सर्वांना मिळणार आहे. या वर्षी विद्यापीठाने १२५० एकर अतिरिक्‍त जमीन वहती खोली आणली असुन यामुळे विद्यापीठाचे बीजोत्‍पादन दुप्‍पट होण्‍यास मदत होणार आहे.         

डॉ देवराव देवसरकर म्‍हणाले की, शेतकरी बांधव सोयाबीन, तुर, ज्‍वारी, मुग आदींची पिकांचे स्‍वतांचे बियाणे वापरू शकतो. पेरणीपुर्वी बीजप्रक्रिया केल्‍यास उत्‍पादनात वाढ होते. ज्‍या शेतकरी बांधवांना शक्‍य आहे, त्‍यांनी सोयाबीन पिकांकरिता बीबीएफ पध्‍दतीचा अवलंब करण्‍याचे आवाहन केले. डॉ एम बी पाटील यांनी संत्रा फळबागेचे व्‍यवस्‍थापनावर तर डॉ गोपाल शिंदे यांनी ड्रोनचा वापराबाबत मार्गदर्शन केले. कार्यक्रमात शेतकरी रमेश राऊत, महिला शेतकरी अर्जना सिराळ यांनी मनोगत व्‍यक्‍त केले. यावेळी शेतकरी बांधवाच्‍या शेतात ड्रोन फवारणीचे प्रात्‍याक्षिक दाखविण्‍यात आले.  कार्यक्रमाचे प्रास्‍ताविक डॉ प्रशांत भोसले यांनी केले तर सुत्रसंचालन श्रीधर पवार यांनी केले. कार्यक्रमास गावातील शेतकरी बांधव, महिला शेतकरी व युवक मोठया संख्‍येने उपस्थित होते.

महाराष्‍ट्र शासनाच्‍या सुचनेनुसार वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठ परभणी च्या वतीने संपूर्ण मराठवाड्यात दिनांक २७ जुन रोजी 'माझा एक दिवस माझ्या बळीराजासाठी' हा उपक्रम राबविण्यात आला. विद्यापीठ अंतर्गत असलेल्‍या कृषी विज्ञान केंद्रे, संशोधन केंद्रे, कृषी महाविद्यालये आदीं ठिकाणीचे विद्यापीठ शास्त्रज्ञ प्रत्यक्ष गावात जाऊन शेतकऱ्यांना मार्गदर्शन केले तसचे त्‍यांच्‍या शेती विषयी तांत्रिक समस्याचे समाधान करण्यात आले.



Saturday, June 24, 2023

वनामकृवित बाल्‍य रेशीम किटक संगोपनावर दहा दिवसीय रेशीम उद्योग प्रशिक्षणाचे आयोजन

वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठातील रेशीम संशोधन योजनेच्‍या वतीने “बाल्य रेशीम किटक संगोपन” या विषयावर युवक, शेतकरी व महीलांसाठी दिनांक ४ ते १३ जुलै दरम्‍यान १० दिवसीय रेशीम उद्योग प्रशिक्षणाचे आयोजन करण्यात आले आहे. सदर प्रशिक्षण सशुल्क असून मराठवाडयातील सर्व जिल्हयातुन ३० रेशीम उद्योजक शेतक-यांची निवड करण्यात येईल. प्रशिक्षणा दरम्यान राहण्याची व जेवणाची व्यवस्था करण्यात येणार आहे, तरी इच्छुक शेतक­यांनी नाव नोंदणी करिता वरिष्ठ संशोधन सहाय्यक श्री. धनंजय मोहोड (मो.न. 9403392119) यांच्या कडे संपर्क करावा, अशी माहिती रेशीम संशोधन योजनेचे प्रभारी अधिकारी डॉ सी बी लटपटे यांनी दिली आहे.

Friday, June 23, 2023

कृषी व कृषी संलग्‍न शिक्षण व्‍यावसायिक पदवी अभ्‍यासक्रमांच्‍या केंद्रिभुत प्रवेश प्रक्रियेस सुरूवात


महाराष्‍ट्रातील वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठ, परभणी, महात्‍मा फुले कृषि विद्यापीठ, राहुरी, डॉ बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठ, दापोली आणि डॉ पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठ, अकोला या चारही कृषि विद्यापीठातील पदवी अभ्‍यासक्रमाच्‍या प्रवेशास सुरूवात करण्‍यात आली आहे. राज्‍य सामाईक प्रवेश परीक्षा कक्षामार्फत शैक्षणिक वर्ष २०२३-२४ साठी कृषी शिक्षण विभागांतर्गत असलेल्‍या कृषी शिक्षण व्‍यावसायिक पदवी अभ्‍यासक्रमांच्‍या प्रवेशासाठी केंद्रिभुत प्रवेश प्रक्रिया शनिवार दिनांक २४ जुन पासुन सुरू करण्‍यात आली आहे. कृषी व कृषी संलग्‍न व्‍यावसायिक पदवी अभ्‍यासक्रमांच्‍या प्रवेशासाठी एमएचटी-सीईटी २०२३ सामाईक प्रवेश परीक्षा तसेच संबंधित अभ्‍यासक्रमाशी निगडीत इतर राष्‍ट्रीय प्रवेश परीक्षा दिलेल्‍या आहेत, अशा पात्र उमेदवारांनी शनिवार दिनांक २४ जुन पासुन ते रविवार दिनांक ९ जुलै पर्यंत राज्‍य सामाईक प्रवेश परीक्षा कक्षाच्‍या www.mahacet.org या अधिकृत संकेतस्‍थळावरील लिंकवर क्लिक करून प्रवेशासाठी नोंदणी (Registration) करून ऑनलाईन पध्‍दतीने अर्ज स्‍वीकृती संगणक प्रणालीव्‍दारे (Online Application System) योग्‍य कागदपत्र तसेच प्रमाणपत्र स्‍कॅन (Scan) करून अपलोड करावीत. सविस्‍तर वेळापत्रक राज्‍य सामाईक प्रवेश परीक्षा कक्षाच्‍या अधिकृत संकेतस्‍थळाावर प्रसिध्‍द करण्‍यात येईल, अशी माहिती आयुक्‍त, राज्‍य सामाईक प्रवेश परीक्षा कक्ष महाराष्‍ट्र राज्‍य मुंबई जाहिर सुचनेव्‍दारे दिली आहे.

Thursday, June 22, 2023

वनामकृवित डिजिटल तंत्रज्ञानावर व्‍याख्‍यान संपन्‍न

वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठातील राष्ट्रीय कृषि उच्च शिक्षण प्रकल्प (नाहेप) च्‍या वतीने दिनांक २२ जुन रोजी कृषि क्षेत्रात डिजिटल तंत्रज्ञानाचा वापर यावर भारतीय कृषि संशोधन संस्‍‍थेचे कृषि भौतिकशास्‍त्राचे प्रमुख शास्‍त्रज्ञ डॉ रबी साहू यांचे दिनांक २२ जून रोजी आयोजीत करण्यात आले होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी कुलगुरू मा. डॉ. इन्द्र मणि हे होते.

डॉ. आर. एन. साहू म्‍हणाले की, विद्यार्थ्यांना आपल्या विषयांची चांगल्या प्रकारे माहिती असणे आवश्यक असुन जगातील अत्‍याधुनिक तंत्रज्ञान शेतीत वापराबाबत ज्ञान प्राप्‍त करावे. येणा-या काळात शेतीत रिमोट सेन्सिंग व ड्रोन टेक्नॉलॉजीचा वापर मोठया प्रमाणात होणार आहे. विद्यापीठ शास्‍त्रज्ञांनी राष्‍ट्रीय व आंतरराष्‍ट्रीय पातळीवरील विविध संशोधन प्रकल्‍प मिळविण्‍याकरिता प्रयत्‍न करण्‍याचा सल्‍ला त्‍यांनी दिला.

मार्गदर्शनात कुलगुरु मा डॉ इन्द्र मणि म्‍हणाले की, डिजिटल तंत्रज्ञानात डॉ. आर. एन. साहू यांचे मोठे संशोधन असुन त्‍यांच्‍या ज्ञानाचा लाभ विद्यापीठातील शास्‍त्रज्ञ व विद्यार्थ्‍यांनी घेऊन नाहेप प्रकल्प माध्‍यमातुन विविध सेन्संर आणि आधुनिक साधनांचा वापर संशोधनास करावा.

सुत्रसंचालन डॉ. कैलास डाखोरे यांनी केले. कार्यक्रम यशस्वीतेसाठी नाहेप प्रकल्‍पाचे मुख्‍य अन्‍वेषक डॉ. गोपाळ यु. शिंदे, डॉ गोदावरी पवार, डॉ. के. के. डाखोरे, डॉ. विशाल इंगळे, प्रा. डी. व्हि. पाटील, डॉ. अनिकेत वाईकर, डॉ. शिवराज शिंदे, इंजि. श्रध्दा मुळे, इंजि. अंजिक्य ब्रम्हनाथकर, इंजि. शिवानंद शिवपुजे, इंजि. पोर्णिमा राठोड, इंजि. तेजस्विनी कुमावत, इंजि. संजिवनी कानवटे, मुक्ता शिंदे, नमीता विडोळकर हनुमंत शिराळे, नितीन शहाणे, मारोती रणेर, जगदीश माने यांनी परीश्रम घेतले. कार्यमक्रमाची कृषि विद्यापीठातील पदयुत्तर व आचार्य पदवी कृषि व कृषि अभियांत्रिकी विभागातील विद्यार्थी तसेच शास्त्रज्ञ यांची मोठया प्रमाणात उपस्थिती होती.




वनामकृवितील कृषि विद्या विभागात सेंद्रीय शेतीवर मार्गदर्शन

वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठातील कृषी विद्या विभाग, कृषी महाविद्यालय, परभणी येथे परभणी चाप्टर इंडियन सोसायटी ऑफ अग्रोनोमीच्‍या वतीने दिनांक २२ जुन रोजी डॉ. बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठाचे शिक्षण संचालक डॉ. पी एस बोडके यांचे हवामान अनुकूल सेंद्रीय शेती या विषयावर व्याख्यान आयोजित करण्यात आले. कार्यक्रमाचे आयोजन शिक्षण संचालक डॉ. धर्मराज गोखले यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आले. मार्गदर्शनात डॉ पी एस बोडके सेंद्रिय शेतीमध्ये पिकांची फेरपालट, जैवविविधताआच्छादनांचा वापर, रसायन अवशेष मुक्त पीक उत्पादन यावर मार्गदर्शन केले. येणाऱ्या काळात देशातील अन्नधान्याच्या गरजा भागविण्यासाठी एकात्मिक पीक नियोजन करणे  आवश्यक असल्याचे सांगितले. कार्यक्रमास विभाग प्रमुख डॉ.वासुदेव नारखेडे व विभागातील प्राध्यापक व विद्यार्थी मोठया संख्‍येने उपस्थित होते.

Wednesday, June 21, 2023

संपुर्ण जगात योगाच्‍या माध्‍यमातुन वसुधैव कुटूंबकम ही भावना निर्माण करणे शक्‍य..... कुलगुरू मा डॉ इन्‍द्र मणि

वनामकृवित जागतिक योग दिन उत्‍साहात साजरा

वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठातील विद्यार्थी कल्‍याण अधिकारी कार्यालयाच्‍या वतीने राष्‍ट्रीय सेवा योजने अंतर्गत दिनांक २१ जुन रोजी जागतिक योग दिन उत्‍साहात साजरा करण्‍यात आला. कार्यक्रमाच्‍या अध्‍यक्षस्‍थानी कुलगुरू मा. डॉ. इन्‍द्र मणि हे  होते.  शिक्षण संचालक डॉ धर्मराज गोखले, विस्‍तार शिक्षण संचालक डॉ देवराव देवसरकर, कुलसचिव डॉ धिरजकुमार कदम, प्राचार्य डॉ सय्यद ईस्‍माइलप्राचार्य डॉ राजेश क्षीरसागरप्राचार्या डॉ जया बंगाळे, प्राचार्य डॉ एम बी पाटील, सहयोगी अधिष्‍ठाता (निम्‍न शिक्षणडॉ गजेंद्र लोंढेविद्यार्थी कल्‍याण अधिकारी डॉ सचिन मोरे आदींची प्रमुख उपस्थिती होती. 

अध्‍यक्षीय भाषणात कुलगुरू मा डॉ इन्‍द्र मणि म्‍हणाले कीयोग हे भारताने जगाला दिलेली मोठी भेट असुन आज संपुर्ण जगात योग दिन साजरा करण्‍यात येत आहे. यावर्षी योग दिन वसुधैव कुटूंबकम हा विचार घेऊन साजरा करित असुन योगाच्‍या माध्‍यमातुन संपुर्ण जग एक कुटूंब ही भावना निर्माण करणे शक्‍य आहे, याची सुरूवात प्रत्‍येक व्‍यक्‍तीनी स्‍वत: पासुन करावी, व्‍यक्‍ती-व्‍यक्‍तीमधील कटुता कमी करून प्रेमाचे संबंध स्‍थापित करणे गरजेचे आहे. नियमित योगाचा सराव केल्‍याने जीवनातील ताणतणाव कमी होण्‍यास मदत होते. व्‍यक्‍ती अधिक कार्यक्षमतेने कार्य करू शकतो. योग व आसन हे आपल्‍या जीवनशैलीचा भाग झाला पाहिजे.

याप्रसंगी ऑर्ट ऑफ लिविंगचे योगशिक्षक प्रा. दिवाकर जोशीश्री रत्‍नपारखी आदींसह त्‍यांच्‍या पथकांच्‍या मार्गदर्शनानुसार विविध आसने, प्राणायाम आदींचे सामुदायिकरित्‍या प्रात्‍यक्षिके करण्‍यात आली. प्रास्‍ताविक डॉ सचिन मोरे यांनी केले तर सुत्रसंचालन डॉ प्रविण घाटगे यांनी केले. कार्यक्रमात विद्यापीठातील अधिकारी, कर्मचारी, विद्यार्थी आणि राष्‍ट्रीय सेवा योजनेचे स्‍वयंसेवक आदींनी मोठया संख्‍येने सहभागी झाले होते. कार्यक्रम यशस्‍वीतेकरिता विद्यार्थी कल्‍याण अधिकारी कार्यालयातील डॉ डी एफ राठोड, डॉ चव्‍हाण, रासेयोचे कार्यक्रम अधिकारी डॉ रवि शिंदे, डॉ संजय पवार, डॉ प्रविण घाटगे, डॉ विद्याधर मनवर, डॉ बी एम कलालबंडी, डॉ भाग्‍यश्री गजभिये आदीसह व कर्मचा-यांनी परिश्रम घेतले.






Thursday, June 15, 2023

हवामान बदलानुरूप तंत्रज्ञानाचा वापर करुन कोरडवाहू शेतीत उत्पादकता वाढी शक्‍य …… कुलगुरू मा. डॉ. इन्द्र मणि

वनामकृवित आयोजित खरीप हंगाम नियोजन व शेतकरी मेळाव्‍यात प्रतिपादन

कोरडवाहू शेती ही पर्जन्य आधारीत असुन माती व पाणी या नैसर्गिक संसाधनाचे संवर्धन करणे आवश्‍यक आहे. कोरडवाहू शेती तंत्रज्ञानाचा अवलंब करून कोरडवाहू शेतीत पीक उत्पादनात वाढ करणे शक्य आहे. कोरडवाहू एकात्मिक शेती पध्दती, विद्यापीठाने विकसीत वाण आणि कोरडवाहू शेती संशोधन केंद्राने विकसीत केलेले विहीर व कुपनलिका पुनर्रभरण तंत्रज्ञानाचा अवलंब शेतकऱ्यांनी करावा, असा सल्‍ला कुलगुरू मा डॉ. इन्द्र मणि यांनी दिला.

वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठातील अखिल भारतीय समन्वयीत कोरडवाहू शेती संशोधन प्रकल्‍पाच्या वतीने खरीप हंगाम नियोजन व शेतकरी मेळाव्‍याचे आयोजन दिनांक १५ जुन रोजी करण्यात आले होते, कार्यक्रमाच्‍या अध्‍यक्षस्‍थानावरून ते बोतल होते. यावेळी प्रमुख पाहुणे संशोधन संचालक डॉ. दत्तप्रसाद वासकर, विद्यापीठ कार्यकारी परिषदेचे सदस्‍य मा श्री प्रविण देशमुख, सरपंच (बाभुळगाव) श्री. रामदास दळवे, सरपंच (उजळंबा) श्री. विठ्ठल धोतरे, सरपंच (सोन्ना) श्री. मारोती कदम, सरपंच (आडगांव) श्री. बालासाहेब ढोले आदींची विशेष उपस्थिती होती. कोरडवाहू शेती संशोधन केंद्रामार्फत हवामान बदलानुरूप राष्ट्रीय कृषि उपक्रम परभणी तालुक्यातील बाभुळगाव, उजळंबा आणि सोन्ना या गावात शेतकऱ्यांच्या शेतावर राबविण्यात येतो. तसेच कोरडवाहू एकात्मिक शेती पध्दती प्रकल्प आडगांव ता. पालम, जि. परभणी येथील शेतकऱ्यांच्या शेतावर राबविण्यात येतो. या प्रकल्‍पा अंतर्गत सदर मेळाव्‍याचे आयोजन करण्‍यात आले होते.

मार्गदर्शनात संचालक संशोधन डॉ. दत्‍तप्रसाद वासकर म्‍हणाले की, कोरडवाहू शेती संशोधन केंद्राने विकसीत तंत्रज्ञानाचा वापर करावा. विद्यापीठ विकसिकोरडवाहु शेतीस अनूकुल विविध पिकांच्‍या वाणांचा वापर करण्याचे आवाहन करून कार्यक्रमात शेतकऱ्यांचा सहभाग चांगल्‍या मिळाल्याबद्दल समाधान व्यक्त केले. यावेळी मा श्री. प्रविण देशमुख यांनी शेतकऱ्यांशी संवाद साधला. मुख्यशास्त्रज्ञ डॉ. वासुदेव नारखेडे यांनी आंतरपीक पध्दती एकात्मिक शेती पध्दती, एकात्मिक अन्नद्रव्ये व्यवस्थापन, आपतकालीन पीक नियोजन, मुलस्थानी जलसंधारण याबद्दल मार्गदर्शन केले.

याप्रसंगी मान्यवरांच्या हस्ते वृक्षारोपन करण्यात तसेच प्रात्याक्षिकांसाठी निवडक शेतकरी बांधवांना विद्यापीठ विकसित बियाणे वाटप करण्‍यात आले. कार्यक्रमाच्‍या प्रास्ताविकात डॉ. मदन पेंडके यांनी उपक्रमात केलेल्या कार्याचा आढावा सादर केला. सुत्रसंचालन डॉ. पपिता गौरखेडे यांनी केले तर आभार श्रीमती आम्रपाली गुजंकर यांनी मानले. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी मंगेश राऊत, शिवाजी काळे, विलास रिठे, मोरेश्वर राठोड, सुमीत सुर्यवंशी आदींनी परीश्रम घेतले.



Wednesday, June 14, 2023

जागतिक रक्‍तदाता दिवसानिमित्‍त ३४ छात्रसैनिकांनी केले रक्‍तदान

जागतिक रक्तदाता दिवसानिमित्त परभणी कृषि महाविद्यालय आणि श्री शिवाजी महाविद्यालया यांच्‍या राष्ट्रीय छात्रसेना विभागाच्‍या वतीने दिनांक १४ जून रोजी रक्तदान शिबीर आयोजित करण्यात आले होते. सदर कार्यक्रमाचे उदघाटन वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठाचे कुलगुरू मा डॉ. इन्‍द्र मणि  यांच्‍या हस्‍ते करण्‍यात आले. कार्यक्रमास शिक्षण संचालक डॉ. धर्मराज गोखले आणि प्राचार्य डॉ. सय्यद इस्माईल यांची प्रमुख उपस्थिती होती. कुलगुरू मा.डॉ. इन्‍द्र मणि यांनी रक्‍तदान हे श्रेष्‍ठदान असुन समाज सेवा करण्‍याची संधी असल्‍याचे सांगुन रक्‍तदाते छात्रसैनिकांचे अभिनंदन केले. शिबिरामध्ये एकूण ३४ छात्रसैनिकांनी स्वयंस्फूर्तीने रक्तदान केले. विद्यापीठातील विविध विभागाचे विभाग प्रमुख, जिमखाना उपाध्यक्ष, हवालदार श्री संजय घोष व एनसीसीचे कॅडेट्स मोठ्या संख्येने उपस्थित होते. शिबिराचे नियोजन लेफ्टनंट डॉ. जयकुमार देशमुख व लेफ्टनंट डॉ. प्रशांत सराफ यांनी केले. कार्यक्रम यशस्वीतेकरिता फर्स्ट ऑफिसर श्री. जयपूरकर, सरकारी रक्तपेढीची संपूर्ण पथक आणि अंडर ऑफिसर ऋषभ रणवीर, कॅडेट्स वैभव, श्रीकृष्ण, गायत्री, विद्या, धनराज, प्रसन्न, प्रकाश, अविराज, अभय यांनी परिश्रम केले.



Monday, June 12, 2023

वनामकृवित द्रवरूप जिवाणू खते विक्रीकरिता उपलब्ध

जिवाणू खतांमुळे पिकांना दिलेल्‍या रासायनिक खतांचा कार्यक्षमरीत्या वापर होऊन पिक उत्‍पादनात होते वाढ

वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठातील मृद विज्ञान व कृषी रसायनशास्त्र विभागांतर्गत अखिल भारतीय मृद जैव विविधता-जैविक खत प्रकल्पामध्ये विविध पिकांसाठी द्रवरूप जिवाणू खते १८ मे पासून विक्रीसाठी उपलब्ध आहेत, द्रवरूप जिवाणू खताचे दर रु. ३७५/- प्रति लिटर असुन यात रायझोबीयम, अझोटोबक्टर, स्फुरद विरघळवीणारे / वहन करणारे जिवाणू खत (पीएसबी), पालाश विरघळवीणारे जिवाणू खत, गंधक विघटन करणारे व जस्त उपलब्धता वाढविणारे जिवाणू खत, रायझोफॉस (रायझोबीयम व पीएसबी मिश्रण) व अझोटोफॉस (अझोटोबक्टर, व पीएसबी मिश्रण) आदींचा समावेश आहे. 

पिकांना दिलेल्या रासायनिक खतांचा कार्यक्षमरीत्या वापर होण्यास जिवाणू खतांमुळे मदत होते. त्यात रायझोबीयम या नत्र स्थिर करणाऱ्या जीवाणूमुळे सोयाबीन, मुग, हरभरा, भुईमुग, तूर, उडीद आदी पिक उत्पादनात २० टक्क्यापेक्षा जास्त वाढ होते. अझोटोबक्टर या नत्र स्थिर करणाऱ्या जिवाणूमुळे पिकांची जोमदार वाढ होऊन उत्पादनात १० ते २५ टक्क्यापर्यंत वाढ होते. तसेच तृणधान्य, गळीतधान्य, भाजीपाला, फळझाडे, बटाटा, ऊस, कापूस, हळद, आले, फुलझाडे आदी पिकांसाठी अझोटोबक्टर, पीएसबी व पालाश विरघळवीणारे जिवाणू खत (बायो-एनपीके) यांचे एकत्रित मिश्रण वापरता येते, अशी माहिती डॉ. अनिल धमक यांनी सांगितले.

द्रवरूप जिवाणू खते वापरण्याच्या पध्दती

बीजप्रक्रिया : एकदल पिके म्‍हणजेचे ज्वारी, तूर, बाजरी, मका, कापूस, गहू, साळ, आदी पिकांमध्‍ये अझोटोफॉस (अझोटोबक्टर व पीएसबी मिश्रण) हे जीवाणु संवर्धन वापरता येते. सदर २०० मिली जिवाणू संवर्धने प्रती १० किलो बियाण्यास सारख्या प्रमाणात लावून लगेच पेरणी करावी.

द्विदल पिके म्‍हणजेचे सोयाबीन, भुईमुग, तूर, मूग, उडीद, हरभरा इत्‍यादी मध्‍ये रायझोफॉस (रायझोबीयम व पीएसबी मिश्रण) हे जीवाणु सवंर्धन वापरता येते. हे जीवाणु संवर्धन सोयाबीन व भुईमुग करिता १०० मिली जिवाणू संवर्धने प्रती १० किलो तर तूर, मूग, उडीद, हरभरा ई. करिता २०० मिली जिवाणू संवर्धने प्रती १० किलो बियाण्यास सारख्या प्रमाणात लावून लगेच पेरणी करावी.

ठिबक सिंचनाद्वारे बायो-एनपीके:  हे जीवाणु सवंर्धन हळद, ऊस, केळी, आले, टरबूज, खरबूज, फळझाडे आदी फळपिकांकरिता उपयुक्‍त असुन एकरी २ लिटर द्रवरूप जिवाणू संवर्धने वेंचुरी टॅंक मध्ये टाकून पिकास द्यावे.

उभ्या पिकास पिकाच्या मुळा भोवती बायो-एनपीके हे जीवाणु संवर्धन देता येते. २०० मिली द्रवरूप जीवाणू संवर्धणे १५ लिटर नोझल काढलेल्या पाठीवरच्या फवार्‍याच्या सहाय्याने मुळा भोवती आळवणी करावी. एक एकरासाठी १० फवार्‍याच्या टाक्या किंवा २ लिटर प्रती एकर याचा वापर करावा.  

द्रवरूप जिवाणू खते वापरतावेळी घ्यावयाची काळजी: जिवाणू खताच्या बाटल्या उष्ण ठिकाणी किवा थेट सूर्य प्रकाशात ठेऊ नयेत. द्रवरूप जिवाणू खते कीटकनाशके, बुरशीनाशके, किवा रासायनिक खतासोबत मिसळू नयेत. द्रवरूप जिवाणू खते लावल्यानंतरथोडा वेळ सावलीत वाळवावीत. जमिनीत दिल्यानंतर त्यांना जिवंत ठेवण्यासाठी जमिनीत ओल असणे आवश्यक आहे.

अधिक माहितीसाठी प्रकल्पाचे प्रमुख अन्वेषक डॉ. अनिल धमक (९४२००३३०४६),  सय्यद मुन्शी (९९६०२८२८०३) यांच्याशी संपर्क साधावा.

Sunday, June 11, 2023

राष्‍ट्रीय शैक्षणिक धोरणाच्‍या अंमलबजावणीकरिता माननीय राज्‍यपाल यांनी घेतली कुलगुरूंची बैठक

अकोला : महाराष्‍ट्राचे माननीय राज्यपाल तथा विद्यापीठाचे कुलपती मा श्री रमेश बैस यांच्‍या अध्‍यक्षतेखाली दिनांक १० जुन रोजी अकोला येथील डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठात राष्ट्रीय शैक्षणिक धोरणाच्या अंमलबजावणीबाबत नऊ अकृषी व दोन कृषी विद्यापीठांच्या कुलगुरुं समवेत बैठक संपन्‍न झाली. बैठकीस कृषीमंत्री मा ना श्री अब्दुल सत्तार, राज्यपालांचे प्रधान सचिव मा श्री संतोष कुमार, उच्च व तंत्र शिक्षण प्रधान सचिव मा श्री विकासचंद्र रस्तोगी, कृषी विभागाचे प्रधान सचिव मा श्री एकनाथ डवले, पशुसंवर्धन विभागाचे प्रधान सचिव मा श्री जे. पी. गुप्ता आदींची प्रमुख उपस्थिती होती.

माननीय राज्‍यपाल श्री रमेश बैस म्‍हणाले की, नवे राष्ट्रीय शैक्षणिक धोरण लागू करण्यासाठी थोडा कालावधी शिल्लक असुन याबाबत आवश्यक तयारी व भरीव अंमलबजावणी करून राज्‍यातील विद्यापीठांनी देशापुढे उदाहरण उभे करावे. राज्‍यातील विद्यापीठांनी एनआयआरएफ रॅकिंग मध्‍ये अव्‍वल स्‍थान मिळवण्‍याकरिता प्रयत्‍न करावे. विद्यार्थ्‍यांच्‍या सर्वागीण विकासाकरिता विद्यापीठांनी कार्य करावे. विद्यार्थ्‍यांना नोकरीसाठी, संशोधनासाठी, विदेशात जाण्‍यासाठी परिक्षेचे निकास ३० दिवसाच्‍या आत विद्यापीठांनी काटेकोरपण लावण्‍याच्‍या सुचना केल्‍या.

बैठकीमध्‍ये विद्यापीठांनी परीक्षांचे निकाल वेळेवर लावणे, सीएसआर फंड मधुन जास्‍तीत जास्‍त निधी मिळविणे, नवीन राष्‍ट्रीय शैक्षणिक धोरणांची येत्‍या शैक्षणिक सत्रापासुन अंमलबजावणी करणे, सर्व परीक्षांच्‍या पदवी व गुणपत्रिका नॅड पोर्टलवर अपलोड करणे, उद्योग व संस्‍थामध्‍ये समन्‍वय, विद्यापीठाचे मानांकन, भारतीय ज्ञान पध्‍दतीने एकीकरण, स्‍वंयम अभ्‍यासक्रम लागु करणे, विद्यार्थ्‍यांना इंटरशिपची सुविधा उपलब्‍ध करून देणे, प्रत्‍येक विद्यापीठ व महाविद्यालयात संशोधन व विकास कक्षाची स्‍थापना करणे, इ-समर्थची काटेकोरपणे अंमलबजावणी आदी बाबींवर बैठकीत सविस्‍तर चर्चा करण्‍यात आली. राष्ट्रीय धोरणाच्या तयारीचा आढावा व विद्यापीठाशी निगडित सामायिक विषयांवर यावेळी चर्चा झाली. केंद्र शासनाच्या योजना, सामाजिक उत्तरदायित्व निधीतून राबविलेल्या योजना, संशोधन प्रकल्प आदी विविध बाबींचा आढावा त्यांनी घेतला.

बैठकीत डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठाचे कुलगुरू मा डॉ. शरद गडाख, वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठाचे कुलगुरू मा डॉ. इन्‍द्र मणी, राष्ट्रसंत तुकडोजी महाराज विद्यापीठाचे कुलगुरू मा डॉ. सुभाष चौधरी, कविकुलगुरु कालिदास संस्कृत विद्यापीठाचे कुलगुरू मा डॉ मधुसूदन पेन्ना, पशु व मत्स्य विज्ञान विद्यापीठाचे कुलगुरु मा डॉ. एस. आर. गडाख, गोंडवना विद्यापीठाचे कुलगुरू मा डॉ. प्रशांत सोकारे, संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठाचे कुलगुरू मा डॉ. प्रमोद येवले, स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठाचे कुलगुरू मा डॉ. उदय भोसले, कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठाचे कुलगुरू मा डॉ विजय माहेश्वरी, जिल्हाधिकारी श्रीमती निमा अरोरा आदी उपस्थित होते.