Pages

Wednesday, July 12, 2023

वनामकृविस आंतरराष्‍ट्रीय हरित विद्यापीठ पुरस्‍कार २०२३ जाहीर

वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठास ग्रीन मेंटर्स संस्‍थेचा प्रतिष्ठित आंतरराष्‍ट्रीय हरित विद्यापीठ पुरस्‍कार २०२३ जाहीर झाला असुन सदर पुरस्‍कार दिनांक १५ सप्‍टेंबर २०२३ रोजी न्‍युयॉर्क ये‍थे आयोजित ७ व्‍या एनवायसी ग्रीन स्कुल कॉन्‍फरन्‍समध्‍ये ७८ व्या संयुक्त राष्ट्रांच्या आमसभेच्या अधिवेशना प्रसंगी प्रदान केला जाणार आहे, अशी माहिती ग्रीन मेंटर्सचे डॉ विरेद्र रावत यांनी कळविले आहे. 

ग्रीन मेंटर्स ही संस्‍था युनेस्कोच्या ग्रीनिंग एज्युकेशन पार्टनरशिपचे भागीदार असुन पर्यावरण रक्षण जागरूकतेकरिता जागतिक पातळीवर कार्य करते. मागील काही वर्षापासुन विद्यापीठांर्गत संपुर्ण मराठवाडयातील महाविद्यालये, विद्यालये, कृषि विज्ञान केंद्रे, संशोधन केंद्र इत्‍यादी व्‍दारे राबविण्‍यात येत असलेल्‍या पर्यावरण जागरूक उपक्रम यात वृक्ष लागवड, सौर ऊर्जाचा शेतीत व वीज निर्मिती करून वापर, स्‍वच्‍छ परिसर, सुंदर परिसर, प्‍लॉस्टिक मुक्‍ती करिता प्रयत्‍न, शेतकरी बांधवामध्‍ये सेंद्रीय शेती, जैविक खते, जैविक निविष्‍ठाचा प्रसार व प्रचार आणि विद्यार्थ्‍यांमध्‍ये शैक्षणिक अभ्‍यासक्रमाच्‍या माध्‍यमातुन शाश्‍वत पर्यावरणाबाबत जागरूकता आदी कार्यातील योगदानाच्‍या आधारे विद्यापीठाची आंतरराष्‍ट्रीय हरित विद्यापीठ पुरस्‍कार २०२३ करिता निवड करण्‍यात आली आहे. 

पुरस्‍काराबाबत कुलगुरू मा डॉ इन्‍द्र मणि म्हणाले की, विद्यापीठातील अधिकारीप्राध्‍यापक, शास्त्रज्ञ, कर्मचारीव विद्यार्थ्यी यांनी  हरित विद्यापीठाकरिता उपक्रमात केलेल्या कार्याचा गौरव आहे. पर्यावरण रक्षण हे प्रत्‍येकांचे आद्य कर्तव्‍य असुन हरित वसुंधरा उपक्रमात प्रत्येकानी योगदान देण्‍याची गरज आहे. विद्यापीठ परिसरात २५ एकर प्रक्षेत्रावर घनवन व फळबाग लागवडीचे कार्य हाती घेतले असुन जीआयझेड प्रकल्‍पात अॅग्रीपीव्‍ही तंत्रज्ञानाच्‍या माध्‍यमातुन सौर उर्जेतुन वीज निर्मिती सोबत पिक लागवडीचे संशोधन हाती घेतले आहे.