Pages

Friday, July 14, 2023

रासायनिक किटकनाशकांचा अतिरिक्‍त वापर टाळावा ..... कुलगुरू मा डॉ इन्‍द्र मणि

क्रॉपसॅप अंतर्गत मराठवाडा विभागातील कृषि अधिकारी व कृषि विस्‍तारक यांची एक दिवसीय कार्यशाळा संपन्न

शेतकरी बांधवांनी रासायनिक किटकनाशकांचा अतिरिक्‍त वापर टाळावा, किडींची आर्थिक नुकसान पातळी ओलांडण्‍या आधी प्रतिबंधात्‍मक उपाययोजना अवलंबन करून रासायनिक किटकनाशकांचा वापर टाळू शकतो. गेल्‍या वर्षी काही भागात गोगलगायीच्‍या प्रादुर्भावामुळे शेतक-यांचे मोठे नुकसान झाले. क्रॉपसॅप प्रकल्‍पाच्‍या माध्‍यमातुन किडींच्‍या प्रादुर्भावाचे अचुक सर्वेक्षण करून व्‍यवस्‍थापनाबाबत त्‍वरीत योग्‍य सल्‍ला शेतकरी बांधवापर्यंत पोहचला पाहिजे, असे प्रतिपादन कुलगुरू मा डॉ इन्‍द्र मणि यांनी केले.

वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठातील कृषि कीटकशास्त्र विभाग व कृषि विभाग (महाराष्ट्र शासन) यांच्या संयुक्त विद्यमाने पिकावरील कीड-रोग सर्वेक्षण व सल्ला प्रकल्प (क्रॉपसॅप) २०२३-२४ अंतर्गत लातुर व औरंगाबाद विभागातील कृषि विभागातील अधिका-यांसाठी एक दिवसीय कार्यशाळा दिनांक १२ जुलै संपन्‍न झाली, कार्यक्रमाच्‍या अध्‍यक्षस्‍थानावरून ते बोलत होते. व्‍यासपीठावर शिक्षण संचालक डॉ. धर्मराज गोखले, संशोधन संचालक डॉ. दत्तप्रसाद वासकर, विस्‍तार शिक्षण संचालक डॉ. देवराव देवसरकर, विभागीय कृषि सहसंचालक (लातुर विभाग) श्री. साहेबराव दिवेकर, विभागीय कृषि सहसंचालक (औरंगाबाद विभाग) श्री. रमेश जाधव, प्राचार्य डॉ. सय्यद ईस्माईल, प्राचार्य डॉ. संजीव बंटेवाड, विभाग प्रमुख डॉ. पुरुषोत्तम नेहरकर, डॉ कल्याण अपेट, समन्वय अधिकारी डॉ. अनंत लाड आदींची उपस्थिती होती.

कार्यशाळेत श्री. साहेबराव दिवेकर म्‍हणाले की, यंदा पावसा अभावी काही भागात पेरणी खोळंबली आहे. आपत्‍कालीन पीक नियोजनाची गरज निर्माण झाली आहे, त्‍यादृष्‍टीने शेतक-यांना योग्‍य पिकांचे पर्याय सुचविण्‍यासाठी महसूल मंडलनिहाय आराखडे तयार करावेत. तसेच श्री. रमेश जाधव यांनी मराठवाडयात कापुस, सोयाबिन, तुर, मोसंबी, टोमाटो ही महत्वाची पिक असुन यावर येणा-या किडींचे व्यवस्थापनाचा सल्ला प्रसारमाध्यमातून वेळोवेळी देण्यात यावा जेणे करुन शेतक-यांचे होणारे नुकसान टळेल.

डॉ. सय्यद ईस्माईल यांनी क्रॉपसॅपच्या माध्यमातून किड-रोग सर्वेक्षण योग्य वेळी होणे गरजेचे आहे असे सांगितले. प्रास्ताविकात डॉ. पुरुषोत्तम नेहरकर यांनी क्रॉपसॅप प्रकल्पाच्या माध्यमातून वेळोवेळी पिकावरील किड-रोग व्यवस्थापनाचे योग्य सल्ले देण्यात येतील असे सांगितले. सुत्रसंचालन डॉ. अनंत लाड यांनी केले.

तांत्रिक सत्रात गोगलगाय व्‍यवस्‍थापन, तुर व टोमॅटोवरील किड व्‍यवस्‍थापन यावर डॉ. पुरुषोत्तम झंवर यांनी मार्गदर्शन केले, सोयाबिन लागवड तंत्रज्ञानावर डॉ. शिवाजी म्हेत्रे, क्रॉपसॅप प्रकल्पाचे प्रभाव, विश्‍लेषणासाठी प्रश्‍नावली यावर डॉ रणजीत चव्हाण, कापूस पिकावरील किड व्यवस्थापनावर डॉ. बस्वराज भेदे, कापुस लागवडीवर डॉ. अरविंद पांडागळे, ऊस, मका व ज्वारी पिकावरील किडिंचे व्यवस्थापनावर डॉ. अनंत लाड, सोयाबिन पिकावरील किड व्यवस्थापनावर डॉ. राजेंद्र जाधव, बदलत्या हवामानातील पिकाचे व्यवस्थापनावर डॉ. कैलास डाखोरे, खरीप पिकावरील रोग व्यवस्थापनावर डॉ. विक्रम घोळवे यांनी मागदर्शन केले.

कार्यशाळेत मराठवाड्यातील लातुर व औरंगाबाद विभागातील जिल्हा अधिक्षक कृषि अधिकारी, उपविभागीय कृषि अधिकारी, तालुका कृषि अधिकारी, जिल्हा समन्वयक शास्त्रज्ञ, कृषि विज्ञान केंद्रातील विषय विशेषज्ञ (पिक संरक्षण) आदी मोठया संख्‍येने उपस्थित होते. कार्यक्रम यशस्‍वीतेकरिता डॉ. गोसलवाड, डॉ. चंद्रकांत लटपटे, डॉ. दिगंबर पटाईत, डॉ फरिया खान, डॉ. योगेश मात्रे, श्री बालाजी कोकणे, श्री अनुराग खंडारे, दिपक लाड, सुरेश शिंदे व सोपान ढगे आदींनी परीश्रम घेतले.