Pages

Thursday, August 10, 2023

माजी कुलगुरू कै. डॉ.‌ विनायकराव पवार यांना भावपुर्ण श्रध्‍दांजली

वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठाचे (तत्कालीन मराठवाडा कृषी विद्यापीठ) माजी कुलगुरू डॉ.‌ विनायकराव मोतीराम पवार (वय ७६) यांचे दिनांक ८ रोजी रात्री निधन झाले. त्यांच्या पश्‍चात पत्नी, दोन मुली, मुलगा असा परिवार आहे. त्यांचे मूळ गाव पिंपळगाव (ता. मालेगाव, जि. नाशिक) आहे. 

डॉ. विनायकराव पवार यांनी पुणे कृषी महाविद्यालय व नवी दिल्ली येथील भारतीय कृषी संशोधन संस्था (आयएआरआय) येथे कृषी शिक्षण पूर्ण केले. त्यांनी १९७४ मध्ये आचार्य (पीएचडी) पदवी संपादन केली.१९७९-८० मध्ये त्यांनी इंग्लंडमधील ऑक्सफर्डमधील विषाणू विज्ञान संस्थेतून पोस्ट डॉक्टरल अभ्यास पूर्ण केला. डॉ. पवार यांनी त्यांच्या सेवेची सुरुवात राहुरीच्या महात्मा फुले कृषी विद्यापीठामध्ये कृषी कीटकशास्त्र विषयाचे सहायक प्राध्यापक म्हणून सुरू केली. त्यानंतर ते परभणीच्या मराठावाडा कृषी विद्यापीठातील कीटकनाशके संशोधन प्रकल्पांतर्गत कीटकशास्त्र विषयाचे प्राध्यापक म्हणून कार्यरत होते. त्यानंतर ते राहुरी कृषी विद्यापीठात कृषी कीटकशास्त्रज्ञ विभाग प्रमुख, पदव्युत्तर पदवी संस्थेच सहयोगी अधिष्ठाता, विस्तार शिक्षण संचालक, शिक्षण संचालक राहिले. २ ऑगस्ट २००० ते २ ऑगस्ट २००५ या कालावधीत परभणी कृषी विद्यापीठाचे कुलगुरू होते. कुलगुरू पदाचा कार्यकाळ पूर्ण झाल्यानंतर ते पुणे (सांगवी) येथे स्थायिक झाले होते. दिनांक ९ ऑगस्‍ट रोजी विद्यापीठाच्‍या वतीने कै. डॉ. विनायकराव पवार यांना श्रध्‍दाजंली वाहण्‍यात आली. यावेळी कुलगुरू मा डॉ इन्‍द्र मणि म्‍हणाले की, माजी कुलगुरू डॉ विनायकराव पवार यांच्‍या कुलगुरू पदाच्‍या काळात विद्यापीठाच्‍या शिक्षण, संशोधन व विस्‍तार कार्यास एक नवी दिशा मिळाली. त्‍यांच्‍या जाण्‍याने विद्यापीठाने एक हाडाचा शिक्षक आणि संशोधक गमावला, अशी भावना त्‍यांनी व्‍यक्‍त केली. शोकसभेस विद्यापीठातील वरीष्‍ठ अधिकारी, प्राध्‍यापक, कर्मचारी उपस्थित होते.