Pages

Wednesday, February 7, 2024

ड्रोन पायलट प्रशिक्षण संस्थेच्‍या उभारणीकरिता वनामकृविचा सामजंस्‍य करार

कृषी क्षेत्रात काटेकोर आणि अचूक पद्धतीने विविध कामे करण्याकरिता ड्रोनचा वापर वाढणार असुन विविध पिकात किड-रोग व्‍यवस्‍थापन, अन्‍नद्रव्‍य व्‍यवस्‍थापन, पाणी व्यवस्थापनासाठी, शेतातील माहिती संकलन यासाठी ड्रोनचा वापर करण्याचे प्रयत्न केले जात आहेत. ड्रोनचा वापर करण्यासाठी नागरी विमान वाहतूक संचालनालयाने ड्रोन वापराबाबत नियम आखुन दिलेले आहेत. त्यानुसार ड्रोन चालवण्यासाठी ड्रोन पायलट परवाना आवश्‍यक आहे. हा परवाना नागरी विमान वाहतूक संचालनालयाने अधिकृत केलेल्‍या ड्रोन पायलट प्रशिक्षण संस्थेकडून घ्यावा लागतो.  

अधिकृत ड्रोन पायलट प्रशिक्षण संस्‍था वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठात स्‍थापन करण्‍या‍च्‍या दृष्‍टीने वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठ आणि मुंबई येथील मे. ग्राऊंडजिरो एरोस्‍पेस लिमिटेड यांच्‍यात दिनांक ५ फेब्रुवारी रोजी सामजंस्‍य करार करण्‍यात आला. सामजंस्‍य करारावर कुलगुरू मा. डॉ. इन्‍द्र मणि आणि मे. ग्राऊंडजिरो एरोस्‍पेस लिमिटेडचे श्री. राहुल अंम्‍बेगांवकर तसेच विद्यापीठामार्फत डॉ स्मिता सालुंकी आणि डॉ विशाल इंगळे यांनी स्वाक्षऱ्या केल्या. याप्रसंगी डॉ राहुल रामटेके, श्री प्रफुल्‍ल बेद्रे, डॉ प्रविण कापसे, डॉ दत्‍ता पाटील, डॉ रवि शिंदे, डॉ अनिकेत वाईकर आदी उपस्थित होते.

सदर करारामुळे पिकनिहाय ड्रोन वापराच्‍या संशोधनास चालना मिळणार असुन ड्रोन आधारित शास्‍त्रशुध्‍द पध्‍दतीने फवारणी करणे, फवारणी करिता विविध प्रकाराचे नोझल तयार करणेकृत्रिम बुध्‍दीमत्‍ता आणि मशीन लर्निंग तंत्रज्ञानाचा वापर करून योग्‍य गतीने आणि काटेकोरपणे फवारणी करणे याबाबत प्रशिक्षण व संशोधन कार्यास चालना मिळणार आहे. कुलगुरू मा डॉ इन्‍द्र मणि यांच्‍या अध्‍यक्षतेखाली असलेल्‍या राष्‍ट्रीय पातळीवरील समितीने नऊ पिकांतील ड्रोन वापराच्‍या सुरक्षित कार्यक्षम वापराबाबतचे प्रमाणित कार्य पध्‍दती तयार केली, सदर कार्य पध्‍दतीचे देशाच्‍या कृषि आणि शेतकरी कल्‍याण मंत्रालयाच्‍या कृषि, सहकार आणि शेतकरी कल्‍याण विभागा व्‍दारे नुकतेच प्रकाशित केली असुन मृदा आणि पिक अन्‍नद्रव्‍य व्‍यवस्‍थापनाबाबत मार्गदर्शक तत्‍वे तयार करण्‍याकरिता मा डॉ इन्‍द्र मणि यांच्‍या अध्‍यक्षतेखालील समितीचे कार्य चालु आहे.