Pages

Saturday, March 30, 2024

आहार आणि आरोग चिकित्सेत अन्नदाते शेतकरी यांची भूमिका या विषयावर परिसंवाद संपन्न

विषमुक्त शेतीसाठी जैविक उत्पादने उत्तम पर्याय .....कुलगुरू डॉ. इन्द्र मणि 

वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठात पतंजली योगपीठ, हरिद्वार यांच्या संयुक्त विद्यमाने विद्यार्थी कल्याण अधिकारीद्वारा विद्यापीठातील अधिकारी, कर्मचारी आणि विद्यर्थ्यासाठी विशेष योग, प्राणायाम, ध्यान, आयुर्वेद पध्दती, आहार आणि आरोग चिकित्सेत अन्नदाते शेतकरी यांची भूमिका या विषयावर परिसंवादाचे आयोजन दिनांक २९ मार्च रोजी करण्यात आले. अध्यक्ष्यस्थानी माननीय कुलगुरू डॉ. इन्द्र मणि हे होते तर प्रमुख मार्गदर्शक म्हणून पतंजली योगपीठाचे मुख्य केंद्रीय प्रभारी डॉ. स्वामी परमार्थदेवजी हे होते. व्यासपीठावर विद्यापीठाचे विस्तार शिक्षण संचालक डॉ. धर्मराज गोखले, संचालक शिक्षण डॉ. उदय खोडके, संचालक संशोधन डॉ. जगदीश जहागीरदार, पतंजली भारत स्वाभिमान न्यासचे राज्य प्रभारी श्री. भालचंद्रबापू पाडाळकर, पतंजली किसान सेवा समिती राज्य प्रभारी श्री, उदय वाणी यांची उपस्थिती होती.

याप्रसंगी बोलताना माननीय कुलगुरू डॉ. इन्द्र मणि म्हणाले की, शेतकरी बांधवानी विषमुक्त शेतीकडे वळावे. शेतीमध्ये कमीत कमी आणि शिफारस केलेलेच रासायनिक औषधीचा आणि खतांचा वापर करावा आणि स्वतःसाठी तसेच विक्रीसाठी विषमुक्त अन्नधान्ने, भाजीपाला यांचे उत्पादन घेवून सकस आहार निर्माण करावा. विषमुक्त शेतीसाठी जैविक उत्पादने हा एक उत्तम पर्याय आहे. ही जैविक उत्पादने शेतकऱ्यांना शासकीय दरात मराठवाड्यामध्ये वेगवेगळ्या ठिकाणी सहज उपलब्ध होण्याच्या दृष्टीने विद्यापीठांतर्गत असलेले कृषि विज्ञान केंद्रे व संशोधन योजनेद्वारे उत्पादित करण्याच्या दृष्टीने राष्ट्रीय कृषि विकास योजनेअंतर्गत “मराठवाड्यातील शेतकऱ्यांच्या फायद्यासाठी जैविक कीटकनाशकेजैविक बुरशीनाशकेजैविक खते आणि जैविक घटक यांचे उत्पादन योजना” प्रकल्प सुरु करत आहोत. याबरोबरच परभणी येथे सेंद्रिय शेती प्रकल्पाद्वारे सेंद्रिय शेतीस चालना देण्यासाठी संशोधनात्मक कार्य सुरु आहे. भविष्यात शेती क्षेत्रात मोठे बदल होणार आहेत. अशावेळी सर्वांनी एकत्र येवून काम करण्याची गरज आहे. जैविक शेती, पर्यावरण पूरक शेतीही काळाची गरज आहे. भविष्यात विषमुक्त शेती, औषधी वनस्पतींची लागवड आणि त्यावरील प्रक्रीया यावर संशोधन करून मराठवाड्यातील शेतीस उत्कृष्ठ शिफारसी देण्यासाठी पतंजली योगपीठ, हरिद्वार यांचे सोबत विद्यापीठ सामंजस्य करार करण्याकरिता पुढाकार घेईल असे नमूद केले.

पतंजली योगपीठाचे मुख्य केंद्रीय प्रभारी डॉ. स्वामी परमार्थदेवजी यांनी विशेष योग, प्राणायाम, ध्यान, आयुर्वेद पध्दती, आहार आणि आरोग चिकित्सा यावर सविस्तर मार्गदर्शन केले. तसेच शुद्ध आणि सात्विक आहार असणे गरजेचे आहे, जसा आहार तसा विचार बनतो. शेतातील रासायनिक औषधाच्या अतिरिक वापरामुळे बहुतांश वेळेस अन्नामधून पोटामध्ये विष जाते, यामुळे अनेक विकार जडतात तसेच पर्यावरणास हानी देखील पोहचते, आज विषमुक्त अन्न मिळणे गरजेचे आहे. जगाचा  अन्नदाता म्हणून शेतकरी महत्वाची भूमिका बजावतात. तेव्हा शेतकऱ्यांनी नेसर्गिक आणि सेंद्रिय शेतीकडे वळावे आणि विषमुक्त अन्नधान्याची निर्मिती करावी सोबतच प्रत्येकाने एकतरी देशी गाय पाळावी असे आवाहन केले.

विद्यापीठांतर्गत महाविद्यालयात विद्यार्थ्यासाठी विविध उपक्रम राबविण्यात येत आहेत. यापुढे नवीन शैक्षणिक धोरणानुसार योग आणि संभाधित विषयचा समावेश करण्यात येईल असे प्रतिपादन संचालक शिक्षण डॉ. उदय खोडके यांनी केले. तद्नंतर बोलताना विस्तार शिक्षण संचालक डॉ. धर्मराज गोखले विद्यापीठाद्वारे तंत्रज्ञान प्रसाराचे उपक्रमाबद्दल माहिती दिली.   

कार्यक्रमाचे प्रास्ताविक पतंजली भारत स्वाभिमान न्यासचे जिल्हा प्रभारी श्री. धोंडीराम शेप यांनी केले तर सूत्रसंचालन सेंद्रिय शेती प्रकल्पाचे मुख्य शास्त्रज्ञ डॉ. अनिल गोरे यांनी केले आणि आभार विद्यार्थी कल्याण अधिकारी डॉ. पी. आर. झंवर यांनी मानले.  कार्यक्रमामध्ये विद्यापीठाचे कुलसचिव श्री. पुरभा काळे, नियंत्रक श्री. प्रवीण निर्मळ, विविध महाविद्यालयाचे सहयोगी अधिष्ठाता, विभाग प्रमुख, प्राध्यापक, अधिकारी, कर्मचारी, विद्यार्थी, इतर जिल्ह्यातील पतंजली भारत स्वाभिमान न्यासचे पदाधिकारी आणि प्रगतशील शेतकरी यांची उपस्थिती होती.