Pages

Sunday, March 31, 2024

वनामकृवि अंतर्गत रस्त्याच्या मजबुतीकरण आणि डांबरीकरणाचे काम प्रगतीपथावर

 विद्यापीठाचे मा. कुलगुरू डॉ. इन्द्र मणि आणि गुण नियंत्रण चमूने केले कामाचे प्रत्यक्ष निरीक्षण


वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठ, परभणी अंतर्गत असलेल्या रस्त्यांची अवस्था मागील काही वर्षापासून अतिशय खराब झालेली होती. या रस्त्याच्या दुरुस्तीसाठी माननीय कुलगुरू डॉ. इन्द्र मणि यांनी पदाचा कार्यभार स्विकारल्यानंतर त्वरीत प्रस्ताव दाखल केला, त्यास महाराष्ट्र शासनाने विद्यापीठातील २६ किलोमीटर लांबीचे अंतर्गत रस्ते मजबुतीकरणास आणि डांबरीकरणास मंजुरी दिली. या कामाचा शुभारंभ दिनांक २८ फेब्रुवारी रोजी माननीय कुलगुरू डॉ. इन्द्र मणि यांच्या शुभहस्ते करण्यात आला.

विद्यापीठातील जमिनीची प्रत ओळखुन रस्ते मजबुतीकरणाचे आणि डांबरीकरणाचे काम अद्यावत मानकाप्रमाणे अतिशय उत्कृष्ट दर्जेचे करण्याच्या सूचना संबंधित यंत्रणेस आणि बांधकाम कंत्राट दारास माननीय कुलगुरू यांनी दिल्या होत्या. याकामाचे गुण नियंत्रणासाठी विद्यापीठ पातळीवर गुण नियंत्रण समिती गठीत केलेली आहे, त्यांच्याद्वारे दररोज कामाचे निरीक्षण केले जाते, शिवाय याकामाचा दर्जा महाराष्ट्र राज्य रस्ते संशोधन संस्था, सार्वजनिक बांधकाम विभाग, नाशिक आणि केंद्रीय रस्ते संशोधन यंत्रणेद्वारे करण्याचेही निश्चित केलेले आहे. त्यानुसार याकामाची दिनांक २७ मार्च २०२४ रोजी प्रत्यक्ष कामाच्यास्थळी जावून विद्यापीठाचे माननीय कुलगुरू डॉ. इन्द्र मणि आणि महाराष्ट्र राज्य रस्ते संशोधन संस्था, सार्वजनिक बांधकाम विभाग, नाशिक यांचे गुणनियंत्रण कार्यकारी अभियंता व त्यांचा चमू तसेच विद्यापीठ पातळीवर गठीत केलेल्या गुणनियंत्रण परीक्षण समिती यांनी निरीक्षण केले. यावेळी समितीने चालू असलेल्या रस्त्याचे अंदाजपत्रकात दिलेल्या मानकाप्रमाणे काम होते किंवा कसे हे विविध प्रकारच्या गुण नियंत्रण चाचण्या घेऊन कामाचे निरीक्षण केले, तेव्हा सदरील रस्त्याचे काम मानकाप्रमाणे आणि समाधानकारक होत असल्याची प्रतिक्रिया सर्व सदस्यांनी दिल्या आणि काम योग्य दिशेने प्रगतीपथावर असल्याचे नमूद केले. यासाठी प्रत्यक्ष कामाचे ठिकाणी भेटी देऊन गुण नियंत्रण करण्याच्या सूचना कुलगुरूंनी दिल्या. या वेळी शिक्षण संचालक डॉ. उदय खोडके, विद्यापीठ अभियंता इंजिनियर श्री. दीपक कशाळकर, विद्यापीठ पातळीवर गठीत केलेल्या गुणनियंत्रण समितीचे सदस्य सहयोगी अधिष्ठाता डॉ. सय्यद इस्माईल, डॉ. विश्वनाथ खंदारे, विभाग प्रमुख डॉ. राजेश कदम, उप-विद्यापीठ अभियंता डॉ. दयानंद टेकाळे आणि शाखा अभियंता श्री. शेख अहमद आदींची उपस्थिती होती.