Public Relations Officer, Directorate of Extension Education, Vasantrao Naik Marathwada Krishi Vidyapeeth, Parbhani - 431 402 (M.S.) (Maharashtra) INDIA
Pages
Monday, April 22, 2024
वनामकृविचा अयोध्या (उत्तरप्रदेश) येथील आचार्य नरेंद्र देव कृषि आणि तंत्रज्ञान विद्यापीठासोबत सामंजस्य करार
Sunday, April 14, 2024
वनामकृवित भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती उत्साहात साजरी
वसंतराव नाईक
मराठवाडा कृषि विद्यापीठाच्या विद्यार्थी कल्याण अधिकारी कार्यालयाच्या वतीने
भारतरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर यांची १३३ वी जयंती दिनांक १४ एप्रिल रोजी साजरी
करण्यात आली. यावेळी भारतरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेचे माननीय कुलगुरू
डॉ. इन्द्र मणि यांच्या हस्ते पुजन करून विनम्र अभिवादन करण्यात आले आणि भन्ते
संघरत्न यांच्याद्वारे वंदना घेण्यात आली. व्यासपीठावर शिक्षण संचालक डॉ उदय
खोडके, विस्तार
शिक्षण संचालक डॉ. धर्मराज गोखले, संशोधन
संचालक डॉ खिजर बेग, संशोधन
संचालक (बियाणे) डॉ. देवराव देवसरकर, कुलसचिव श्री. पुरभा काळे, सहयोगी अधिष्ठाता डॉ. सय्यद
इस्माईल, डॉ. जया
बंगाळे, डॉ. राजेश
क्षीरसागर, डॉ. गजेंद्र
लोंढे, डॉ. विश्वनाथ
खंदारे, विद्यार्थी कल्याण अधिकारी डॉ. पी. आर. झंवर आदींची प्रमुख उपस्थिती
होती.
यावेळी माननीय कुलगुरू डॉ. इन्द्र मणि यांनी अध्यक्षीय भाषणात भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती निमित्त शुभेच्छा दिल्या आणि पुढे म्हणाले की, महाराष्ट्र ही राष्ट्रपुरुषांची भूमी असून भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर हे महाराष्ट्रातून देशाला मिळालेले महान राष्ट्रपुरुष आहेत. भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर हे जागतिक दर्जेचे उच्चविद्याविभूषित होते. त्यांनी शंभर वर्षापूर्वी द प्रोब्लेम ऑफ रुपी या विषयावर आपला प्रबंध सादर केला आणि त्यातील शिफारशी तत्कालीन सरकारने विचारात घेवून रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाची स्थापना केली. त्यांनी अपार संघर्ष आणि कठोर परिश्रम आपल्या जीवनामध्ये घेतले आणि हीच समानता सर्व महापुरुषांमध्ये होती. त्यांचे व्यक्तिमत्व उच्चविचारी, प्रतिभावंत, प्रभावशाली, कल्याणकारी, अन्याय दूर करणारे अश्या व्यापक विचारधारेचे होते. त्यांचे विचार आजही जीवंत आहेत. त्यांचा आदर्श आणि त्यांनी दाखविलेल्या मार्गाचा आपण सर्वांनी अवलंब केल्यास भविष्यातील विकसित भारत २०४७ ची संकल्पना उत्कृष्ठरीतीने साध्य होईल असे नमूद केले आणि विद्यापीठ मुख्यालय तसेच मुख्यालयाबाहेरील महाविद्यालयात जयंती निमित्त विद्यार्थ्यांनी राबविलेल्या सलग अठरा तास अभ्यास उपक्रम तसेच इतर विविध उपक्रमाचे कौतुक केले.
Saturday, April 13, 2024
सामुदायिक विज्ञान महाविद्यालयातील वर्षा मुलींच्या वसतिगृहात सलग अठरा तास अभ्यासिकेचे आयोजन
ज्ञानार्जनासाठी डॉ. आंबेडकर यांच्या कठोर परिश्रमांचे अनुकरण करणे आवश्यक!... डॉ. उदय खोडके
परभणी : वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठातील सामुदायिक विज्ञान
महाविद्यालयाच्या वतीने भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर आणि महात्मा ज्योतिबा फुले
यांच्या संयुक्त जयंती निमित्ताने वर्षा मुलींच्या वसतिगृहामध्ये सलग अठरा तास
अभ्यासिकेचे आयोजन दिनांक १३ एप्रिल रोजी सकाळी ६.०० ते रात्री १२.०० दरम्यान
करण्यात आले. या अभ्यासिकेचे उद्घाटन संचालक शिक्षण डॉ. उदय खोडके यांच्या हस्ते
भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर व महात्मा ज्योतिबा फुले यांच्या प्रतिमेचे पूजन
आणि त्यांना विनम्र अभिवादन करून करण्यात आले. यावेळी डॉ. उदय खोडके यांनी
विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी कठोर
परिश्रमातून जागतिक दर्जाचे शिक्षण
प्राप्त केले होते. त्यांनी विकासाच्या सर्व क्षेत्रात अतुलनिय कार्य केले.
त्यांच्या कठोर परिश्रमाचे अनुकरण आणि पालन
करत विद्यार्थी आज ज्या अठरा तास अभ्यास उपक्रमात सहभागी झाले यामध्ये
त्यांनी सातत्य ठेवावे असे आवाहन केले.अशा कठोर परिश्रमातून सर्वांना निश्चितच
यश मिळेल असे विचार त्यांनी याप्रसंगी मांडले.याबरोबरच महात्मा ज्योतिबा
फुले यांच्या थोर कार्यास उजाळा दिला.
तद्नंतर महाविद्यालयाच्या सहयोगी अधिष्ठाता डॉ. जया बंगाळे यांनी
प्रास्ताविकात सलग अठरा तास अभ्यासिकेच्या आयोजनाचे या महाविद्यालयाचे हे १४ वे
वर्ष असल्याचे त्यांनी नमुद केले. आज
विद्यार्थ्यांचे पुस्तक वाचन कमी झालेले असून त्यांनी मोबाईल फोनवर अथवा सामाजिक
माध्यमावर अधिक वेळ व्यतीत न करता आपल्या ज्ञानाच्या कक्षा रुंदावण्यावर भर द्यावा
. आपल्याला विकसित भारत घडवण्यासाठी भारतरत्न डॉ, बाबासाहेब आंबेडकर यांचे विचार
अंगिकारणे आवश्यक असल्याचे त्यांनी विशद केले.
या उपक्रमाचे नियोजन
सहयोगी अधिष्ठाता डॉ. जया बंगाळे यांच्या मार्गदर्शनाखाली सहयोगी प्राध्यापक तथा
वसतिगृह प्रमुख डॉ.नीता गायकवाड यांनी केले. उद्घाटन समारंभाचे सूत्रसंचालन
विद्यार्थिनी अनुश्री आर के. यांनी केले तर आभार डॉ. नीता गायकवाड यांनी मानले. या
उपक्रमात विद्यार्थीनीनी उत्स्फूर्त सहभाग नोंदविला. उद्घाटन कार्यक्रमास डॉ. शंकर
पुरी, डॉ. विद्यानंद मनवर आणि
श्रीमती रेखा लाड यांची उपस्थिती होती.
Friday, April 12, 2024
वनामकृवित सलग अठरा तास अभ्यास उपक्रम संपन्न
सलग कार्य करून यश प्राप्ती मिळते.....कुलगुरू डॉ. इन्द्र मणि
भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या आदर्शातील महत्वाचा गुण म्हणजे सलग अभ्यास, हा गुण विद्यार्थ्यामध्ये वृधिंगत होणे आवश्यक आहे. तसेच प्रत्येकाने जीवनामध्ये यशस्वी होण्यासाठी हाती घेतलेले कोणतेही कार्य सलग करावे असे प्रतिपादन वनामकृविचे माननीय कुलगुरू डॉ. इन्द्र मणि यांनी केले. वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठ परभणी येथे भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर आणि महात्मा ज्योतिबा फुले यांच्या संयुक्त जयंती निमित्ताने कृषि महाविद्यालय परभणीच्या वतीने विद्यापीठ ग्रंथालयात सलग अठरा तास अभ्यास उपक्रमाचे आयोजन दिनांक १२ एप्रिल रोजी सकाळी ६.०० ते रात्री १२.०० दरम्यान करण्यात आले. या उपक्रमाच्या उदघाटन समारंभात ते अभासी माध्यमाद्वारे बोलत होते. यावेळी संचालक शिक्षण डॉ. उदय खोडके, सहयोगी अधिष्ठाता डॉ. सय्यद इस्माईल, विविध विभागाचे विभाग प्रमुख आदींची उपस्थिती होती. संचालक शिक्षण डॉ. उदय खोडके यांच्या हस्ते भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेचे पूजन करून विनम्र अभिवादन करण्यात आले.
कार्यक्रमात माननीय कुलगुरू डॉ. इन्द्र मणि पुढे म्हणाले की, विद्यापीठाने महात्मा ज्योतिबा फुले यांची जयंती नुकतीच साजरी केली आणि भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंती निमित्त विद्यापीठ विविध उपक्रम राबवत आहे. या दोन्हीही महापुरुषांनी शिक्षणासाठी मोलाचे योगदान दिलेले आहे. त्यांच्या कार्याचा उल्लेख करून विद्यार्थ्यांनी उच्च विद्याविभूषित व्हावे आणि जीवनमुल्यांची जपणूक करून अंगी उत्तम गुण निर्माण करावेत असे आवाहन केले.
यावेळी संचालक शिक्षण डॉ. उदय खोडके यांनी आपल्या मनोगतात विद्यार्थ्यांनी आपल्या ज्ञानाचा समाजकल्याणासाठी करावा असे नमूद केले. सदरील कार्यक्रम सहयोगी अधिष्ठाता डॉ. सय्यद इस्माईल यांच्या मार्गदर्शनाखाली विभाग प्रमुख डॉ. पुरुषोत्तम नेहरकर, उपाध्यक्ष्य जिमखाना डॉ. पुरुषोत्तम झवंर आणि विद्यापीठ ग्रंथपाल डॉ. संतोष कदम यांनी पार पाडला. कार्याक्रमामध्ये वंदना आणि सूत्रसंचालन डॉ. रामप्रसाद खंदारे यांनी केले तर आभार डॉ. संतोष कदम यांनी केले. या उपक्रमात विद्यापीठातील विविध महाविद्यालयाचे ५१० विद्यार्थी व विद्यार्थीनीनी सहभाग नोंदविला. या कार्यक्रमास विद्यापीठातील प्राध्यापक, व कर्मचारी यांनी उत्स्फूर्त प्रतिसाद नोंदविला.
Thursday, April 11, 2024
ग्रामीण युवकांना कौशल्य आधारित कृषि शिक्षण ही काळाची गरज.....मा. कुलगुरू डॉ. इन्द्र मणि
अध्यक्षीय भाषणात माननीय कुलगुरू डॉ. इन्द्र मणि यांनी ग्रामीण युवकांना शेती शिक्षणाचे आधुनिक धडे
देणे आवश्यक असून पुढील काळ हा कौशल्य आधारित शिक्षणाबरोबरच युवकांमध्ये तंत्रज्ञानाविषयी जागृती निर्माण करणे आवश्यक असल्याचे असे नमूद करून त्या दृष्टीने आयराइज प्रकल्पाची उपयुक्तता स्पष्ट केली.
यावेळी बोलताना सहयोगी अधिष्ठाता (शिक्षण) कृषि तंत्र
अभ्यास डॉ. गजेंद्र लोंढे यांनी सर्व कृषी तंत्र विद्यालयांमध्ये नांदेडच्या धरतीवर आयराइज प्रकल्प राबवला
जाणार असून लवकरच या संबंधीचा सामंजस्य करार हा सिजेंटा फाउंडेशन इंडिया सोबत
करणार असल्याचे स्पष्ट केले. तद्नंतर सिंजेंटा
फाउंडेशन इंडियाचे श्री विक्रम बोराडे यांनी सिंजेंटा फाउंडेशन हे भारतात सर्वप्रथम
वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठ परभणीच्या कृषी तंत्र शिक्षण शाखा
सोबत आयराइज प्रकल्प राबवत असल्याचे सांगून या अंतर्गत २०२३ -२४ वर्षामध्ये नांदेड कृषि तंत्र विद्यालयात
झालेल्या ३१ दिवसीय प्रशिक्षणामध्ये विद्यार्थ्यांना कृषि क्षेत्रातील
उद्योजकांसाठी आवश्यक असणाऱ्या अभ्यासक्रमाचे धडे देवून त्याची परीक्षा देखील घेण्यात आली. २५ विद्यार्थ्यांनी यामध्ये यश मिळवले असून लवकरच दुसरा भाग म्हणजे
विद्यार्थ्यांना त्यांच्या निवासस्थानापासून १५ किलोमीटरच्या आत व्यावसायिक
शिक्षणासाठी आवश्यक कार्यानुभव घेण्यात येणार असल्याचे नमूद केले.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक प्राचार्य डॉ. नरेशकुमार जायेवार यांनी करून शेवटी आभार मानले तर सूत्रसंचालन श्री विजेश जाधव यांनी केले. कार्यक्रमादरम्यान उत्कृष्ट कार्य केल्याबद्दल कनिष्ठ संशोधन सहाय्यक श्री प्रकाश सिंगरवाड व श्रीमती वर्षा ताटेकुंडलवार यांना प्रमाणपत्र देऊन गौरविण्यात आले. तसेच सिजेंटा फाउंडेशन इंडियामार्फत घेण्यात आलेल्या परीक्षेत प्रथम द्वितीय व तृतीय क्रमांकाने उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांना व या प्रशिक्षणात भाग घेतलेल्या सर्वच विद्यार्थ्यांना प्रमाणपत्र देऊन गौरविण्यात आले. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी श्री भगवान कांबळे, श्री श्रीकृष्ण वारकड, श्रीमती स्वाती ताटपल्लेवार व श्रीमती महानंदा उत्तरवाड यांनी विशेष प्रयत्न केले.
Tuesday, April 9, 2024
नांदेड येथील कापूस संशोधन केंद्रास राष्ट्रीय पुरस्कार
शास्त्रज्ञ, कर्मचारी व मजूर यांच्या संघटित कष्टाचे यश..... कुलगुरू प्रा. (डॉ.) इन्द्र मणि
या बाबत मा. कुलगुरू प्रा. (डॉ.) इन्द्र मणि यांनी
दिनांक ०८ एप्रिल रोजी कापूस संशोधन केंद्रास अवर्जून भेट दिली. यावेळी मा. कुलगुरू
म्हणाले की, उत्कृष्ट संशोधन केंद्राचा राष्ट्रीय स्तरावरील पुरस्कार मिळणे ही
आनंदाची बाब तर आहेच, शिवाय कापूस संशोधनामध्ये उत्कृष्ट संशोधन केंद्रासाठी
यावर्षापासून दिला गेलेला पहिलाच पुरस्कार वसंतराव नाईक कृषि विद्यापीठास मिळाला
ही एक विद्यापीठाच्या कार्यासाठी गौवरशाली आणि स्फूर्तीदायक बाब आहे. हा पुरस्कार संशोधन
केंद्राचे शास्त्रज्ञ, कर्मचारी व मजूर
यांचे संघटित व दीर्घकालीन कष्टाचे यश असल्याबद्दल त्यांनी संशोधन केंद्राचे
प्रमुख डॉ. खिजर वेग, शास्त्रज्ञ, कर्मचारी व मजूर यांचे अभिनंदन केले तसेच विद्यमान
पातळीपेक्षा अधिक काम करण्याची आवश्यकता असून भविष्यामध्ये शेतकरीभिमुख संशोधन
करावे, आणि केंद्रामध्ये विविध प्रकल्पांतर्गत प्रयोगशाळा उभारणी करून
जैवतंत्रज्ञानयुक्त वाणांची निर्मिती, जैविक बुरशीनाशके व मित्रकिडींचे उत्पादन करून शेतकर्यांना
उपलब्ध करावे ज्यामुळे कपाशीसारख्या नगदी पीकामध्ये किफायतशीर उत्पन्न मिळणे शक्य
होईल असे त्यांनी नमूद केले.
नांदेड येथील कापूस संशोधन केंद्र कपाशीचे राज्यातील
प्रमुख संशोधन केंद्र असून मागील ८३ वर्षांपासून कापूस संशोधांनामध्ये कार्यरत
आहे. या संशोधन केंद्रातर्फे आजवर देशी व अमेरिकन कपाशीचे
एकूण २९ सरळ तथा संकरीत वाण प्रसारित केले असून एनएचएच ४४ (नांदेड ४४) हा त्यापैकी
एक प्रमुख वाण आहे. याचबरोबर पीक लागवड व संरक्षण विषयी शेतकर्यांच्या गरजेनुसार
अनेक शिफारशी वेळोवेळी दिल्या आहेत. शेतकर्यांनी बीटी कापूस लागवड सुरुवात
केल्यापासून त्याचे अधिक उत्पादन मिळण्यासाठी आवश्यक लागवड तंत्रज्ञान राज्यातील
शेतकर्यांना सर्वप्रथम या संशोधन केंद्राद्वारे शिफारस करण्यात आले होते.
सदरील पुरस्कार निवडतांना देशातील कपाशीच्या सर्व
संशोधन केंद्रांचे मागील दोन वर्षांतील कार्य पाहून पुरस्कारासाठी निवड करण्यात
आली. यामध्ये सन २०२२-२३ व २०२३-२४ हंगामामध्ये या संशोधन केंद्राद्वारे बीटी
कपाशीचे तीन सरळ वाण (एनएच १९०१ बीटी, एनएच १९०२ बीटी व
एनएच १९०४ बीटी), एक अमेरिकन वाण (एनएच ६७७) व दोन देशी (गावराण) सरळ
वाण (पीए ८३७ व पीए ८३३) असे एकूण सात वाण प्रसारीत केले आहेत. त्याचबरोबर पीक
लागवडीसंदर्भात कोरडवाहूसाठी ओलावा संचयन, हवामान बदलामध्ये
लागवडीचे अंतर, सेंद्रीय शेतीमध्ये अन्नद्रव्य व्यवस्थापन इत्यादीबाबतीत चार शिफारशी दिल्या आहेत. याशिवाय
राष्ट्रीय प्रयोगांमध्ये प्राधिकृत वाणांची संख्या, शोध निबंध, कृषिविस्तार, प्रात्यक्षिके व
प्रशिक्षणांचे आयोजन इत्यादी बाबतीत सरस काम आढळून आल्यामुळे कपाशीचे ‘उत्कृष्ट संशोधन केंद्र’ हा पुरस्कार
नांदेड येथील संशोधन केंद्रास देण्यात आला आहे.
संशोधन केंद्राच्या कामाकाजासाठी मा. कुलगुरू प्रा. (डॉ.)
इन्द्र मणि यांच्या निरंतर मार्गदर्शनामुळे व माजी संशोधन संचालक संशोधन डॉ.
दत्तप्रसाद वासकर व डॉ. जगदीश जहागीरदार, विद्यापीठ प्रशासन आणि
विद्यापीठातील अन्य केंद्राच्या प्रभारी अधिकारी व कर्मचार्याकडून सहयोगामुळेच
प्राप्त झाला असून त्याबद्दल संशोधन केंद्राचे प्रमुख डॉ. खिजर बेग यांनी आभार
व्यक्त केले. तसेच हा पुरस्कार मिळण्यासाठी संशोधन केंद्रातील सर्व शास्त्रज्ञ, कर्मचारी व मजूर या सर्वांचे परिश्रमामुळेच हा पुरस्कार
मिळाला असल्याचे मत त्यांनी प्रगट केले.
Monday, April 8, 2024
प्रगतशील शेतकरी डॉ. धनराज केंद्रे यांच्या फळबागेस कुलगुरू मा डॉ. इंद्र मणि यांची भेट
याप्रसंगी विद्यापीठ शास्त्रज्ञ प्राचार्य डॉ. व्ही.एस. खंडारे, डॉ. संतोष बारकुले, डॉ. प्रविण कापसे, डॉ. बी.एस. कलालबंडी, डॉ. धीरज पाथ्रीकर आदीसह पदव्युत्तर विद्यार्थ्यी उपस्थित होते. डॉ धनराज केंद्रे हे परभणी कृषी विद्यापीठातुन आचार्य पदवीधारक आहेत, यांचे शंभर सदस्यांचे मोठे संयुक्त कुंटुब असुन कुंटुबातील सदस्यच शेतीची कामे करतात. शंभर एकर मध्ये त्यांनी सोयाबीन, कापुस पिकासह खरबुज व मोंसबी बागेचे योग्य असे व्यवस्थापन केले असुन यावर्षी यातुन चांगले उत्पादन काढले आहे.
Friday, April 5, 2024
कृषि तंत्र पदविका अभ्यासक्रमाच्या गुणवत्ता वाढीसाठी विद्यापीठ कटिबद्ध
कृषि तंत्र पदविका अभ्यासक्रमाच्या परीक्षाकेंद्रास माननीय कुलगुरू डॉ. इन्द्र मणि यांची भेट
वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठ परभणी अंतर्गत मराठवाड्यातील आठही जिल्ह्यामध्ये दोन वर्षाच्या कृषि तंत्र पदविका अभ्यासक्रमासाठी ६ घटक आणि ५१ खाजगी कृषि तंत्र विद्यालयाचा विस्तार आहे. हा अभ्यासक्रम यशस्वी पूर्ण केलेल्या विद्यार्थ्याना शासकीय सेवेत तसेच खाजगी क्षेत्रामध्ये चांगली संधी उपलब्ध असते. या अभ्यासक्रमाच्या विद्यार्थ्यांची गुणवत्ता वाढीसाठी सर्व घटक आणि खाजगी कृषि तंत्र विद्यालयाच्या व्दितीय वर्षाची वार्षिक परीक्षा केंद्रीय पद्धतीने मराठवाड्यामध्ये ६ घटक कृषि तंत्र विद्यालयाच्या ठिकाणी घेण्यात येत आहे. यानिमित्त परभणी येथील परीक्षा केंद्रास विद्यापीठाचे माननीय कुलगुरू डॉ. इन्द्र मणि यांनी भेट दिली. यावेळी त्यांच्या सोबत संचालक शिक्षण डॉ. उदय खोडके, सहयोगी अधिष्ठाता (शिक्षण) कृषि तंत्र शिक्षण शाखा डॉ. गजेंद्र लोंढे, विभाग प्रमुख डॉ. राजेश कदम, प्राचार्य डॉ. एस. आर. पिल्लेवाड आणि परीक्षा प्रमुख श्री.अशोक खिल्लारे यांची उपस्थिती होती.
यावेळी माननीय कुलगुरू डॉ. इन्द्र मणि यांनी संपूर्ण परीक्षा पद्धतीचे सखोल निरीक्षण केले. कृषि तंत्र पदविका अभ्यासक्रमाची गुणवत्ता वाढीसाठी केंद्रीय परीक्षेचे अनन्य साधारण असे महत्व असल्याचे मत व्यक्त करून अभ्यासक्रमाची गुणवत्ता वाढीसाठी विद्यापीठ कटिबद्ध असल्याचे त्यांनी नमूद केले. मराठवाड्यातील आठही जिल्ह्यामधून एकूण २७५० विद्यार्थी या परीक्षेसाठी बसलेले आहेत. यापैकी घटक कृषि तंत्र विद्यालय, परभणी अंतर्गत परभणी आणि हिंगोली जिल्ह्यातील १ घटक आणि ९ खाजगी विद्यालयातील एकूण ५१० विद्यार्थ्यांची परीक्षा कृषि महाविद्यालय, परभणी येथे घेण्यात येत आहे.