Pages

Thursday, May 16, 2024

खरीप हंगामासाठी वनामकृवि विकसीत बियाणे विक्रीस १८ मे पासून प्रारंभ

सोयाबीन, तुर, ज्वार, मुग पिकांचे बियाणे उपलब्ध
वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठाच्या ५२ व्या वर्धापन दिनानिमित्त विस्तार शिक्षण संचालनालय आणि कृषि विभाग महाराष्ट्र शासन यांच्या संयुक्त विद्यमाने खरीप पीक परिसंवाद व कृषि प्रदर्शनीचे आयोजन शनिवार दिनांक १८ मे रोजी सकाळी ११.०० वाजता कृषि महाविद्यालय परभणी येथील सभागृहात करण्यात आले आहे. कार्यक्रमाची सुरवात विद्यापीठ विकसित आणि शेतकऱ्यांसाठी उपलब्ध केलेल्या सत्यतादर्शक बियाणे विक्रीने होणार आहे. सदरील बियाणांची विक्री १८ मे पासून विद्यापीठातील बीज प्रक्रिया केंद्रावरून करण्यात येणार असुन विद्यापीठातील इतर विक्री केंद्रावर दिनांक २५ मे पासून विक्रीसाठी ठेवण्यात येणार आहे, अशी माहिती विद्यापीठाच्‍या बीज प्रक्रिया केंद्राव्‍दारे देण्‍यात आली आहे. यावर्षी प्रथमच ११७८ क्विंटल खरीप पिकांचे सत्‍यतादर्शक बियाणे (७९५७ बॅग) उपलब्ध करून देण्यात आलेले आहे. विद्यापीठाची परभणी येथील मध्यवर्ती प्रक्षेत्राची जमीन पेरणी योग्य केल्यामुळे बीजोत्‍पादनात वाढ झाली.
विक्रीसाठी उपलब्ध बियाणे व दर पुढील प्रमाणे
तुरीचे वाण - बीडीएन-७१६ (लाल), बीडीएन-७११ (पांढरी), ६ किलोच्या बॅगमध्ये तर बीडीएन-१३-४१ गोदावरी (पांढरी) हे वाण ६ आणि २ किलोच्या बॅगमध्ये उपलब्ध असून प्रती किलो दर रु २५०/- आहे या बियाणाच्या उपलब्धता बीडीएन-७१६ – (८०० बॅग), बीडीएन-७११ – (३६६ बॅग), बीडीएन-१३-४१ गोदावरी ६ किलोच्या ७०० बॅग व २ किलोच्या ३०० बॅग अशी आहे.
सोयाबीनचे वाण - एमएयुएस-१६२, एमएयुएस-१५८, एमएयुएस-७१, एमएयुएस-६१२ हे वाण २६ किलोच्या बॅगमध्ये तर एमएयुएस- ७२५ हा वाण ५ किलोच्या बॅगमध्ये उपलब्ध असुन सर्व वाणाचा प्रती किलो दर हा रु १००/- असुन याची उपलब्धता एमएयुएस-१६२ (१००० बॅग), एमएयुएस-१५८(१५०० बॅग), एमएयुएस-७१ (१७५ बॅग), एमएयुएस-६१२ (१००० बॅग) आणि एमएयुएस- ७२५ (१६०० बॅग) अशी आहे.
ज्वारीचा वाण - परभणी शक्ती हा वाण ४ किलोच्या बॅगमध्ये उपलब्ध असून या वाणाचा प्रती किलो दर रु १२५/- आहे व या वाणाच्या ३०० बॅगची उपलब्धता आहे.
मुगाचा वाण - बीएम -२००३-२ हा वाण ६ किलोच्या बॅगमध्ये उपलब्ध असून या वाणाचा प्रती किलो दर रु २२०/- आहे व या वाणाच्या २१६ बॅगची उपलब्धता आहे.
वरील बियाणामधील सोयाबीन वाण एमएयुएस- ७२५ हा नुकताच प्रसारीत झालेला वाण आहे. या वाणाचे उपलब्ध बियाणाची जास्तीत जास्त शेतकऱ्यांपर्यंत प्रसार करण्याच्या उद्देशाने ५ किलोच्या बॅगची पॅकिंग करण्यात आली आहे. आणि तुर वाण बीडीएन-१३-४१ (गोदावरी) या वाणाची शेतकऱ्यांद्वारे अंतर पीक पद्धतीने लागवडीसाठी बियाणे मागणी असल्यामुळे २ किलोच्या बॅगची पॅकिंग करण्यात आली आहे. उर्वरित बॅगची पॅकिंग या एक एकर प्रक्षेत्रासाठी आहे. बियाणे खरेदीसाठी रोख रक्कम स्विकारण्यात येईल तसेच एका व्यक्तीस एक बियाणे बॅग याप्रमाणे विक्री करण्यात येईल.