Pages

Friday, May 17, 2024

जीवन अभियान जनजागृती कार्यक्रम मौजे बाभुळगाव येथे संपन्न

 पर्यावरणपुरक शेती काळाची गरज – डॉ वासुदेव नारखेडे


खरीप हंगामातील पिकांचे अवशेष न जाळता त्याचा उपयोग खत निर्माण करण्याकरीता करावा तसेच आंतरपीक पध्दती तसेच एकात्मिक शेती पध्दती, एकात्मिक अन्नद्रव्ये व्यवस्थापन आणि आपतकालीन पीक नियोजन याचा वापर शाश्वत शेतीसाठी करावा असे प्रतिपादन वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठातील कोरडवाहू संशोधन केंद्राचे मुख्यशास्त्रज्ञ डॉ. वासुदेव नारखेडे यांनी केले. ते जीवन अभियान (पर्यावरणाकरीता जीवन पध्दती) या जनजागृती कार्यक्रमाअंतर्गत मौजे बाभुळगाव ता. जि. परभणी येथे दिनांक १३ मे रोजी घेण्यात आलेल्या कार्यशाळेतील उपस्थित शेतकऱ्यांना बोलत होते. हरित वायुचे उत्सर्जन व खनीज तेलाचे योग्य प्रमाणावर ज्वलन होवून त्याचे कर्ब उत्सर्जन मोठ्या प्रमाणावर होत आहे. त्यामुळे पृथ्वीवरील तापमानात वाढ होत आहे. तसेच पावसमानामध्ये कमी कालावधीमध्ये अतिशय जोरदार वृष्टी आणि पावसाचे असंतुलीत वितरण यामुळे पीक कालावधीमध्ये मध्यम ते जास्त कालावधीचा ताण येतो. आणखी महत्वाचा म्हणजे मुलस्थानी जलसंधारण, कोरडवाहू शेतीमध्ये उपलब्ध असलेल्या मुलस्थानी जल व्यवस्थापनासाठी जसे रुंद वरंबा सरी पध्दतीमध्ये सोयाबीन, कापूस, तुर लागवड तंत्रज्ञान, पावसाचा १२ ते १५ दिवसाचा ताण पडल्यास पहीली पोटॅशियम नायट्रेटची फवारणी १ % ४० ते ४५ दिवसांनी आणि दुसरी फवारणी ७० ते ७५ दिवसांनी, हवामान बदलानुरुप विद्यापीठानी विकसित केलेले सोयाबीन वाण एमएयुएस-१५८, एमएयुएस-७१, एमएयुएस-१६२, एमएयुएस-७२५, तुर बीडीएन-७११, बीडीएन-७१६, बीडीएन-२०१३-४१, रब्बी ज्वार वाण परभणी मोती, परभणी ज्योती, परभणी सुपर मोती, या जातीचा अधिक उत्पादनासाठी अवलंब करावा. शेतीमध्ये शेणखताबरोबर शिफारस केलेली रासायनिक खताची मात्रेचा वापर करुन जमिनीची सुपिकता टिकवावी असेही त्यांनी यावेळी नमूद केले.
याप्रसंगी वरिष्ठ शास्त्रज्ञ (कृषिविद्या) डॉ. आनंद गोरे यांनी जमिनीचा योग्य वापर व दुष्काळ निवारण याबाबत शेतकऱ्यांना मार्गदर्शन केले. वरिष्ठ शास्त्रज्ञ (कृषि अभियांत्रिकी) डॉ. मदन पेंडके यांनी विहीर व कुपनलिका पुनर्भरण, शेततळे याविषयी शेतकऱ्यांना माहीती दिली. सहाय्यक प्राध्यापक (मृदशास्त्र) डॉ. पपिता गौरखेडे यांनी शेतकऱ्यांना माती परिक्षणाचे महत्त्व व माती परिक्षण नुसार खतांचे नियोजन याबद्दल उपस्थित शेतकऱ्यांना मार्गदर्शन केले. कार्यक्रमास श्री. रामदास दळवे, सरपंच बाभुळगाव, श्री माऊली पारधे तसेच गावातील शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते.