Pages

Saturday, May 18, 2024

वनामकृविच्या‍ ५२ व्या वर्धापन दिनानिमित्त खरीप पीक परिसंवाद आणि कृषि प्रदर्शन संपन्न

 


अध्‍यक्षीय भाषण करतांना माननीय कुलगुरू डॉ. इन्द्र मणि

मार्गदर्शन करतांना सचिव माननीय श्री सुनील चव्हाण (भाप्रसे) 


मार्गदर्शन करतांना जिल्हाधिकारी मा. श्री. रघुनाथ गावडे (भाप्रसे),
सर्वांची सेवानिवृत्ती होते परंतु शेतकऱ्यांची सेवानिवृत्ती होत नाही आणि जगाच्या पोशिंदा म्हणून तो सतत कार्यरत राहतो व पावसाची अनियमितता असली तरी शेती उत्पादन विपुल प्रमाणात देतो असे शेतकऱ्यांप्रती गौरवोद्गार महाराष्ट्र राज्याचे मृद व जलसंधारण विभागाचे सचिव माननीय श्री सुनील चव्हाण (भाप्रसे) यांनी काढले. वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठाच्‍या ५२ व्या वर्धापन दिनानिमित्त विस्‍तार शिक्षण संचालनालय व कृषि विभाग, महाराष्‍ट्र शासन यांच्‍या संयुक्‍त विद्यमाने दिनांक १८ मे रोजी आयोजित खरीप पीक परिसंवाद आणि कृषि प्रदर्शनाच्या उदघाटनाप्रसंगी ते प्रमुख अतिथी म्हणून बोलत होते. कार्यक्रमाच्‍या अध्‍यक्षस्‍थानी माननीय कुलगुरू डॉ. इन्द्र मणि हे होते आणि अकोला येथील डॉ. पंजाबराव देशमुख कृषि विद्यापीठचे माननीय कुलगुरू डॉ. शरद गडाख, महाराष्ट्र कृषि शिक्षण व संशोधन परिषदेचे महासंचालक माननीय श्री. रावसाहेब भागडे (भाप्रसे), परभणीचे जिल्हाधिकारी मा. श्री. रघुनाथ गावडे (भाप्रसे), वनामकृविचे विस्तार शिक्षण संचालक डॉ धर्मराज गोखले, शिक्षण संचालक डॉ. उदय खोडके, संशोधन संचालक डॉ. खिजर बेग, बिजोत्पादन संचालक डॉ. देवराव देवसरकर, कुलसचिव श्री पुरभा काळे, नियंत्रक प्रवीण निर्मळ, पुणे येथील कृषि आयुक्तालयातील आत्माचे संचालक श्री. दशरथ तांभाळे, विभागीय कृषि सहसंचालक डॉ. तुकाराम मोटे, कृषि परिषदेचे संशोधन संचालक डॉ. हरिहर कौसडीकर, जिल्हा अधीक्षक कृषि अधिकारी श्री. अनिल गवळी, प्रकल्प संचालक आत्मा श्री दौलत चव्हाण, फरीदाबाद (हरियाणा) येथील वॉव गो.ग्रीन.एलएलपीचे व्यवस्थापकीय संचालक डॉ. शंकर गोयंका, शास्वत योगीक शेतीचे श्री बाळासाहेब रूगे भाईजी, मुख्‍य शिक्षण विस्‍तार अधिकारी डॉ प्रशांत देशमुख, आणि डॉ पी. आर. झंवर आदींची प्रमुख उपस्थिती होती.
माननीय सचिव श्री सुनील चव्हाण (भाप्रसे) यांनी आपल्या भाषणात पुढे बोलताना म्‍हणाले की, महारष्ट्रातील बहुतांश शेतकरी हे अल्प भूधारक आहेत, या शेतकऱ्यांकरिता विद्यापीठाने केलेल्या कार्याचे कौतुक केले. मराठवाड्यात ८५ ते ८८ टक्के कोरडवाहू शेती असल्यामुळे भविष्यात पाण्याचा ताण सहन करणारे, खोलवर मुळ्या जाणारे आणि कोरडवाहू शेतीस पूरक वाण विकसित करावेत तसेच शेंद्रीय शेतीस उपयुक्त आणि हवामानास अनुकूल शिफारशी द्याव्यात, जैव समृद्ध पिके ज्वार, बाजरा, खाद्य तेल पिके करडई, जवस, दाळवर्गीय पिके यामध्ये प्रामुख्याने तुर यांचे क्षेत्र वाढविण्यासाठी प्रयत्न करावेत असे नमूद केले. शेतकऱ्यांनी कमीत कमी परंतु गुणात्मक दर्जेची शेती करून आपली उन्नती साधावी यासाठी सूक्ष्म सिंचन, तुषार सिंचन, शेततळे तसेच आधुनिक तंत्रज्ञाचा वापर करावा असे आवाहन केले.
अध्‍यक्षीय भाषणात कुलगुरू मा. डॉ. इन्द्र मणि म्‍हणाले की, या विद्यापीठाने शेतकरी आणि समाजसेवेसाठी अनेक विद्यार्थी, शास्त्रज्ञ, प्रशासकीय अधिकारी यांची निर्मिती केली आणि त्यांचे जन्मदात्या मातेप्रमानेच संगोपन केले. विद्यापीठ शेतकरी देवो भवो या संकल्पनेतून पुढे जात असुन शेतकऱ्यांच्या कल्याणाकरिता विविध योजना राबवीत आहे. शेतकऱ्यांना गुणवत्तापूर्ण विद्यापीठ विकसित बियाणे मिळण्याच्या दृष्टिने यावर्षी प्रथमच ११७८ क्विंटल खरीप पिकांचे सत्‍यतादर्शक बियाणे (७९५७ बॅग) उपलब्ध करून देण्यात आलेले आहे. विद्यापीठाची परभणी येथील मध्यवर्ती प्रक्षेत्राची जमीन पेरणी योग्य केल्यामुळे बीजोत्‍पादनात वाढ झाली. पुढील वर्षात यामध्ये ५ पट वाढ करण्याचे उद्धिष्ठ ठेवून विद्यापीठ कार्य करणार असल्याचे त्यांनी नमूद केले. तसेच विद्यापीठाने ज्वार,बाजरा, सोयाबीन, कापूस, तुर, मुग यामध्ये राष्ट्रीय पातळीवर नावाजलेले वाण विकसित केले आहेत आणि त्याची शेतकऱ्यांमध्येही लोकप्रियता आहे. विद्यापीठाच्या संशोधनासाठी शेतकऱ्यांचे प्रत्याभरणे विचारात घेतली जातील आणि भविष्यात हवामान संबंधित संशोधनावर भर देवून शेतकऱ्यांना हवामानाचा अचूक अंदाज देण्यासाठी सर्वोतोपरीने प्रयत्न केला जाईल. यासाठी राज्य आणि केंद्र शासनाच्या सहकार्याची अपेक्षा व्यक्त केली आणि यापुर्वी मिळालेल्या सहकार्याबद्दल आभार व्यक्त केले. याबरोबरच ड्रोन हाताळणी प्रशिक्षण, नवीन शैक्षणिक धोरण २०२० ची अंमलबजावणी करून कौशल्य विकासावर भर देण्यात येईल असे प्रतिपादन केले.
कार्यक्रमात डॉ. पंजाबराव देशमुख कृषि विद्यापीठचे माननीय कुलगुरू डॉ. शरद गडाख यांनी वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठाने केलेल्या कार्याचा गौरव केला आणि या कार्यात सहभागी सर्वांचे अभिनंदन केले. तसेच शेतकऱ्यांनी एकात्मिक शेती पद्धतीचा अवलंब करावा असे नमूद केले.
परभणीचे जिल्हाधिकारी मा. श्री. रघुनाथ गावडे यांनी विद्यापीठ शेतकऱ्यांच्या हितासाठी सदैव तत्पर असते आणि त्यांच्या सोबत शेतकऱ्यांचेही प्रयत्न चांगले असल्याचे नमूद करून त्यांनी विक्री व्यवस्थापण कौशल्य शिकावे असे आवाहन केले.
महाराष्ट्र कृषि शिक्षण व संशोधन परिषदेचे महासंचालक माननीय श्री. रावसाहेब भागडे (भाप्रसे) हे बोलताना म्हणाले की, विद्यापीठाने राष्ट्रीय पातळीवरील वाण विकसित करून शेतकऱ्यांमध्ये लोकप्रियता मिळविली हे विद्यापीठातील बियाणे विक्री केंद्रावरील गर्दीवरुनच स्पष्ट होत आहे. विद्यापीठाचे कार्य असेच पुढे चालू राहो यासाठी सर्वोतोपारीने सहकार्य करण्यासाठी तत्पर राहू असे सांगितले.
पुणे येथील कृषि आयुक्तालयातील आत्माचे संचालक श्री. दशरथ तांभाळे यांनी व फरीदाबाद (हरियाणा) येथील वॉव गो.ग्रीन.एलएलपीचे व्यवस्थापकीय संचालक डॉ. शंकर गोयंका यांनी शेतकऱ्यांना आणि विद्यापीठास शुभेच्छा दिल्या. शास्वत योगीक शेतीचे श्री बाळासाहेब रूगे भाईजी यांनी आधुनिक आणि आध्यात्मिक शेती यावर मार्गदर्शन केले
कार्यक्रमाच्‍या प्रास्‍ताविकात विस्तार शिक्षण संचालक डॉ धर्मराज गोखले यांनी विद्यापीठाच्या विस्तार कार्याचा आढावा सांगून भविष्यात शेतकऱ्यांच्या हितासाठी प्रभावी विस्तार कार्य आणि माझा एक दिवस माझ्या बळीराजासोबत सारखे अभिनव उपक्रम राबवून विद्यापीठाचे उपयुक्त तंत्रज्ञान शेतकर्यापर्यंत पोहचवले जाईल असे नमूद केले.
यावेळी प्रातिनिधिक स्वरुपात शेतकरी श्री भरत टोनपी यांचा तर विस्तार कार्यासाठी कृषि विद्यावेत्ता डॉ. अरुण गुट्टे, कृषि विज्ञान केंद्राचे कार्यक्रम समन्वयक डॉ. प्रशांत भोसले, डॉ. दीप्ती पाटगावकर, विषय विशेषज्ञ प्रा. वर्षा मारवळीकर आणि आत्माच्या स्वाती घोडके यांचा सत्कार मान्यवरांच्या हस्ते करण्यात आला. 
मेळाव्‍यात आयोजित खरीप पिक परिसंवादात विविध विषयावर विद्यापीठ शास्‍त्रज्ञांनी मार्गदर्शन केले. याप्रसंगी आयोजित कृषि प्रदर्शनास मोठा प्रतिसाद दिला. मान्‍यवरांच्‍या हस्‍ते विद्यापीठ विकसित बियाणे विक्रीचे उदघाटन करण्‍यात आले. कार्यक्रमाचे सुत्रसंचालन डॉ वीणा भालेराव, डॉ. ए. के. गोरे आणि डॉ. सुनिता पवार यांनी केले तर आभार मुख्‍य विस्‍तार शिक्षणाधिकारी डॉ प्रशांत देशमुख यांनी मानले. मेळाव्‍यास शेतकरी बांधव, महिला शेतकरी, कृषी विस्‍तारक, विद्यापीठातील प्राध्‍यापक, शास्‍त्रज्ञ, अधिकारी, कर्मचारी आदी मोठया संख्‍येने उपस्थित होते.

मार्गदर्शन करतांना डॉ. पंदेकृविचे माननीय कुलगुरू डॉ. शरद गडाख



मार्गदर्शन करतांना महासंचालक माननीय श्री. रावसाहेब भागडे (भाप्रसे)


मान्‍यवरांच्‍या हस्‍ते विद्यापीठ विकसित बियाणे विक्री

प्रास्‍ताविक करताना विस्तार शिक्षण संचालक डॉ धर्मराज गोखले
मार्गदर्शन करतांना आत्माचे संचालक श्री. दशरथ तांभाळे



कृषी प्रदर्शनात ड्रोन प्रात्यक्षिक पाहताना मान्‍यवर