Pages

Monday, August 5, 2024

कुटुंबातील सदस्याच्या सामंजस्यामुळे होतो शेतीचा विकास...कुलगुरु मा. डॉ. इन्द्र मणि

 

वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठाचे कुलगुरु मा. डॉ.  इन्द्र मणि यांनी आसोला ता. जि. परभणी येथील गंगानारायण अॅग्रो फॉर्मयेथे दिनांक ०४ ऑगस्ट  रोजी सदिच्छा भेट दिली. त्यांनी या अॅग्रो फॉर्मच्या प्रक्षेञावरिल २६ एकर क्षेञावर उभारण्यात आलेल्या खजुर बागेस भेट देवून पाहणी केली. या बागेत खजुराची पिवळा रंग असलेली बरहीया वाणाची लागवड करण्यात आलेली आहे. भेटी दरम्यान त्यांनी विद्यापीठाशी सामंजस्य करार करुन कृषि विद्यापीठातील विद्यार्थ्यानी  गंगानारायण अॅग्रेा फॉर्मयेथील खजुर, ड्रॅगन फ्रुट या दोन नवीन पिकांवर संशोधन करुन नविन तंञज्ञान प्रसारित करावे अशा सूचना दिल्या. असोला येथील श्री. दत्तराव नारायणराव जावळे, श्री प्रभार नारायणराव जावळे, श्री. अनंत नारायणराव जावळे, श्री ज्ञानोबा नारायणराव जावळे, श्री लक्ष्मण नारायणराव जावळे व श्री. किशन नारायणराव जावळे या सहा भावांच्या अथक प्रयत्नातुन व आपआपसातील सहाकार्याच्या माध्यमातुन उभारण्यात आलेल्या खजुर शेतीचे व ड्रगन फ्रुट शेतीचे मा. कुलगुरु यांनी कौतुक केले आणि कुटुंबातील अशा  सर्व सदस्याच्या सामंजस्यामुळे शेतीचा विकास होतो असे नमूद करून जावळे कुटुंबाला भविष्यातील वाटचालीस शुभेच्छा दिल्या.