Pages

Saturday, August 3, 2024

मराठवाड्यातील आठही जिल्ह्यातील शेतकरी ऑनलाइन संवादामध्ये सहभागी

 पिकांचे आरोग्य सांभाळण्यासाठी उत्कृष्ट तंत्रज्ञान सल्ला द्यावा…. कुलगुरू मा. डॉ. इन्द्र मणि

 शेतकऱ्यांनी शेतीमध्ये अनावश्यक तसेच अतिरिक्त निविष्ठा वापरणे टाळले जावून त्यांचा उत्पादन खर्च कमी होण्याकरिता तसेच पिकांचे आरोग्य सांभाळण्यासाठी उत्कृष्ट कृषि तंत्रज्ञान सल्ला देणे आवश्यक आहे, असे प्रतिपादन कुलगुरू मा. डॉ. इन्द्र मणि यांनी केले. ते दिनांक २ जुलै रोजी वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठाच्या विस्तार शिक्षण संचालनालय व कृषि विभाग महाराष्ट्र शासन यांच्या संयुक्त विद्यमाने कीटकशास्त्र विभागातील क्रॉपसॅप प्रकल्प अंतर्गत ऑनलाईन शेतकरी - शास्त्रज्ञ कृषि संवादाच्या पाचव्या भागात अध्यक्षस्थानावरून  बोलत होते. यावेळी  शिक्षण संचालक डॉ. उदय खोडके, संशोधन संचालक डॉ. खिजर बेग, विस्तार शिक्षण संचालक डॉ. भगवान आसेवारकृषि सहसंचालक श्री साहेबराव दिवेकर (लातूर), डॉ. तुकाराम मोटे (छत्रपती संभाजीनगर), विभाग प्रमुख डॉ. पुरुषोत्तम नेहरकर, नांदेडचे जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी श्री. भाऊसाहेब बाऱ्हाटे, मुख्य विस्तार शिक्षण अधिकारी डॉ. प्रशांत देशमुख आदींची ऑनलाईन उपस्थिती होती.

माननीय कुलगुरू पुढे म्हणाले की, या संवादामध्ये शेतकऱ्यांनी, कृषि विभागातील अधिकाऱ्यांनी आणि विद्यापीठातील शास्त्रज्ञांनी शेतीविषयक आपले चांगले अनुभव सांगावेत आणि हा कार्यक्रम शेतकरी – शेतकरी, शेतकरी – अधिकारी, शेतकरी - शास्त्रज्ञ आणि अधिकारी - शास्त्रज्ञ संवाद कार्यक्रम म्हणून पुढे आणावा असे नमूद केले. यावेळी त्यांनी गोगलगायच्या प्रादुर्भावाबाबत शेतकरी, कृषि विभागाचे अधिकारी आणि विद्यापीठाचे शास्त्रज्ञ यांच्याशी संवाद साधला आणि यामुळे पिकांचे कितपत नुकसान झाले हे पाहण्याचे तसेच पिकांच्या कोणत्या अवस्थेनंतर यापासून धोका नसतो याबाबत विचारणा करून त्यादृष्टीने उपाययोजना आखण्यासाठी सूचित केले. 

विस्तार शिक्षण संचालक डॉ. भगवान आसेवार म्हणाले की, शास्त्रज्ञांनी आणि अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीचा शेतकऱ्यांनी अचूक अवलंब करावा असे प्रास्ताविकात नमूद केले. तांत्रिक मार्गदर्शनात कीटक शास्त्रज्ञ डॉ. अनंत लाड यांनी मागील आठवड्यात सततच्या रिमझिम पावसामुळे किडींचा प्रादुर्भाव वाढला आहे व शेतकरी फवारणी ही करू शकले नाहीत, यामुळे कापूस पिकावर तुडतुडे, मावा यांचा प्रादुर्भाव वाढत आहे असे नमूद करून या किडींचे प्रादुर्भाव वाढण्याचे इतर कारणे आणि त्यांचे एकात्मिक पद्धतीने नियंत्रणाची माहिती दिली. याबरोबरच त्यांनी सोयाबीन, संत्रा, मोसंबी या पिकावरील किडी नियंत्रणाबाबत मार्गदर्शन केले आणि कीटकनाशक वापरताना योग्य काळजी घेण्याचे सल्ला दिला. 

तदनंतर आंतर पिकातील तण नियंत्रणाबाबत कृषि विद्या विभागाच्या शास्त्रज्ञा  डॉ. सुनिता पवार यांनी आंतरपीक पद्धती ही हीच एक मुळात तण नियंत्रण पद्धती असल्याचे नमूद करून एकात्मिक तण  नियंत्रण पद्धतीची माहिती दिली. तसेच हवामान शास्त्रज्ञ डॉ. कैलास डाखोरे यांनी पुढील आठवड्याचा हवामानाचा अंदाज सांगून फवारणी, अंतर मशागत, खत व्यवस्थापन करताना घ्यावयाच्या काळजी बाबत मार्गदर्शन केले. 

कार्यक्रमामध्ये जिल्हा अधीक्षक कृषि अधिकारी श्री. भाऊसाहेब बाऱ्हाटे,  विद्यापीठाचे शास्त्रज्ञ डॉ. सुर्यकांत पवार, डॉ. वसंत सूर्यवंशी, डॉ. गजानन गडदे, डॉ. सुनिता पवार यांनी छत्रपती संभाजीनगर, बीड, धाराशिव, लातूर येथील शेतकऱ्यांनी विचारलेल्या प्रश्नांना समाधानकारक उत्तरे दिली.  सूत्रसंचालन डॉ. अनंत लाड यांनी तर आभार विभाग प्रमुख डॉ. पुरुषोत्तम नेहरकर यांनी मानले. कार्यक्रम यशस्वीतेसाठी डॉ. प्रशांत देशमुख, डॉ. संतोष  फुलारी, श्री.   डि. व्ही.  इंगळे, श्री. योगेश मात्रे आणि श्री खंदारे यांनी पुढाकार घेतला. कार्यक्रमामध्ये मराठवाड्यातील आठही जिल्ह्यांतील कृषी विभागाचे अधिकारी, कर्मचारी, विद्यार्थी, विद्यापीठातील शास्त्रज्ञ, कृषि विद्यावेत्त्ता, कृषि विज्ञान केंद्राचे समन्वयक, आणि बहुसंख्येने शेतकरी सहभागी झाले होते.