— वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठात थेट वेबकास्टिंगद्वारे कार्यक्रमाचे आयोजन
माननीय पंतप्रधान श्री नरेंद्रजी मोदी यांच्या शुभहस्ते, दिल्लीतील पुसा येथे कृषि आणि शेतकरी कल्याण मंत्रालय, भारत सरकारच्या ‘प्रधानमंत्री धनधान्य कृषि योजना’, ‘राष्ट्रीय नैसर्गिक शेती मिशन’ आणि ‘कडधान्य विकास कार्यक्रम’ या महत्वाकांक्षी योजनांचा शुभारंभ दिनांक ११ ऑक्टोबर २०२५ रोजी संपन्न झाला. या उपक्रमाचा मुख्य उद्देश कृषि विकासाला गती देणे आणि शेतकऱ्यांचे उत्पन्न वाढवणे हा आहे. या कार्यक्रमाचे महत्त्व लक्षात घेऊन वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठ, परभणी येथे माननीय पंतप्रधानांचे भाषण थेट वेबकास्टिंगद्वारे विद्यापीठाच्या सिम्पोझियम हॉलमध्ये प्रक्षेपित करण्यात आले. या कार्यक्रमाचे आयोजन माननीय कुलगुरू प्रा. (डॉ.) इन्द्र मणि यांच्या मार्गदर्शनाखाली वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठाच्या विस्तार शिक्षण संचालनालय आणि महाराष्ट्र शासनाच्या कृषि विभागाच्या संयुक्त विद्यमाने करण्यात आले.
थेट वेबकास्टिंग कार्यक्रमाच्या व्यासपीठावर प्रगतशील शेतकरी कृषिभूषण श्री
कांतराव देशमुख, विस्तार शिक्षण संचालक डॉ. राकेश अहिरे, संशोधन संचालक
डॉ. खिजर बेग, शिक्षण संचालक डॉ. भगवान आसेवार, कुलसचिव श्री संतोष वेणीकर आणि मुख्य विस्तार शिक्षण अधिकारी डॉ. प्रशांत देशमुख
आदी मान्यवरांची उपस्थिती होती.
यावेळी बोलताना कुलसचिव श्री. संतोष वेणीकर यांनी सांगितले की, विद्यापीठ हे संशोधन,
शिक्षण आणि विस्तार या तिन्ही क्षेत्रांमध्ये महत्त्वपूर्ण कार्य करीत
आहे. विद्यापीठाचे संशोधन व विस्तार कार्य प्रभावीपणे शेतकऱ्यांपर्यंत पोहोचत आहे.
या विद्यापीठाद्वारे उत्पादित बियाण्यांवर शेतकऱ्यांचा विश्वास असून, त्यांची मराठवाड्यासह संपूर्ण महाराष्ट्रातून या बियाण्यांची मोठ्या प्रमाणावर
मागणी होत असते. बियाणे उत्पादनात आणखी वाढ व्हावी आणि ते शेतकऱ्यांना सहज उपलब्ध व्हावे,
यासाठी राज्य शासनाचा कृषि विभाग, बियाणे महामंडळ
तसेच शेतकरी उत्पादक कंपन्यांचे सहकार्य घ्यावे, असे त्यांनी
सांगितले. तसेच, बियाण्यांसोबतच नैसर्गिक शेतीसाठी उपयुक्त उत्पादनेही
शेतकऱ्यांच्या पसंतीस उतरली असून, त्यांचे उत्पादन वाढवण्यासाठी
सर्वांनी एकत्रितपणे संघभावनेने कार्य करावे, असे आवाहनही त्यांनी
केले. शेतकरी हे स्वतः उत्कृष्ट संशोधक आहेत; त्यांच्या अनुभव
आणि सहकार्याचा उपयोग कृषि विकासासाठी करावा, असेही त्यांनी आपल्या
भाषणात नमूद केले.
प्रगतशील शेतकरी कृषि भूषण श्री कांतराव देशमुख यांनी सांगितले की, सध्या शेतकरी सर्वच
बाबतीत प्रचंड अडचणीत आहे. त्यांनी शेतकऱ्यांना आवाहन केले की शेतीवरील अनावश्यक खर्च
कमी करावा, कारण झालेली बचत हेही उत्पन्नच मानले जाते. यासाठी
रासायनिक खतांवरील आणि औषधांवरील खर्च कमी करणे आवश्यक आहे, कारण
या क्षेत्रात भेसळीमुळे अनेकदा शेतकऱ्यांची फसवणूक होते. त्यामुळे सेंद्रिय घटकांचा
वापर वाढवावा, शेणखत, गांडूळ खत घरच्या
घरी तयार करावे आणि जैविक खतांचा वापर वाढवावा. या दिशेने विद्यापीठाने मोठे कार्य
केले आहे. शेतकऱ्यांनी या उपक्रमांचा आणि शासनाच्या विविध योजनांचा पुरेपूर लाभ घ्यावा,
असे आवाहन त्यांनी केले.
प्रास्ताविकात विस्तार शिक्षण संचालक डॉ. राकेश अहिरे यांनी आपल्या भाषणात सांगितले
की, आजच्या कार्यक्रमात माननीय पंतप्रधान आदरणीय श्री. नरेंद्रजी मोदी यांच्या
हस्ते विविध योजनांचा शुभारंभ होत आहे. या योजनांमध्ये विशेषतः मराठवाड्यासाठी कडधान्य
विकास मिशन आणि नैसर्गिक शेती मिशन या योजनांना विशेष महत्त्व आहे. मराठवाडा कृषि विद्यापीठाने
कडधान्य क्षेत्रात मोठी क्रांती घडवून आणली आहे. विद्यापीठाने विकसित केलेल्या तुरीच्या
बीडीएन -७११ आणि गोदावरी, बीडीएन -७१६ या वाणांना शेतकऱ्यांचा
मोठा प्रतिसाद मिळत आहे. याशिवाय, पूर्वी विकसित केलेले बीडीएन
- २ सारखे वाण आजही शेतकऱ्यांच्या पसंतीस उतरले आहेत आणि विपुल उत्पादन देत आहेत. गोदावरी
या वाणाने तर काही शेतकऱ्यांच्या शेतात प्रति एकरी १९ क्विंटलपर्यंत उत्पादन दिले आहे,
ही अत्यंत अभिमानाची बाब आहे. तसेच विद्यापीठाने सेंद्रिय शेती योजनेअंतर्गत
शेतकऱ्यांसाठी विविध उपक्रम राबवले आहेत. यामुळे राष्ट्रीय पातळीवर सुरू झालेल्या या
योजनांमध्ये विद्यापीठाच्या संशोधनाचे योगदान अधिक महत्त्वपूर्ण ठरणार आहे,
असे डॉ. अहिरे यांनी नमूद केले.
कार्यक्रमात नैसर्गिक आणि सेंद्रिय शेतीस पूरक तंत्रज्ञान या विषयावर विद्यापीठाचे
शास्त्रज्ञ डॉ. अनिल गोरे यांनी मार्गदर्शन केले. कृषि विद्यावेत्ता डॉ. गजानन
गडदे यांनी येणाऱ्या रब्बी हंगामातील पिकांचे नियोजन, जमिनीची मशागत आणि
वाण निवडीबाबत सविस्तर मार्गदर्शन केले. सेंद्रिय शेतीतील अनुभवी प्रगतशील शेतकरी
श्री. सोमेश्वर गिराम यांनी आपल्या सेंद्रिय शेतीतील अनुभवांची मांडणी करून शेतकऱ्यांना
सेंद्रिय शेतीकडे वळण्यासाठी प्रेरित केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन आणि आभार
मुख्य विस्तार शिक्षण अधिकारी डॉक्टर प्रशांत देशमुख यांनी मानले
हा कार्यक्रम पाहण्यासाठी विद्यापीठ आणि कृषि विभागाचे ६८ वरिष्ठ अधिकारी, प्राध्यापक व कर्मचारी
तसेच परभणी जिल्ह्यातील २४२ शेतकरी यांनी उत्स्फूर्त सहभाग नोंदविला. एकूण ३१० जणांनी
या कार्यक्रमात सहभाग घेतला. सदर कार्यक्रमाचे थेट प्रक्षेपण (Live
streaming) भारत सरकारच्या https://pmindiawebcast.nic.in या लिंकद्वारे करण्यात आले.