Pages

Thursday, October 9, 2025

वनामकृविच्या ‘माझा एक दिवस माझ्या बळीराजासोबत’ उपक्रमांतर्गत शास्त्रज्ञांचा शेतकऱ्यांशी थेट संवाद

 विद्यापीठाचे माननीय कुलगुरू प्रा. (डॉ.) इन्द्र मणि यांच्यासह २८ शास्त्रज्ञ शेतकऱ्यांच्या बांधावर


मराठवाड्यातील अनेक भागात अलीकडे झालेल्या अतिवृष्टीमुळे मोठ्या प्रमाणावर शेतीचे नुकसान झाले आहे. या पार्श्वभूमीवर सध्याच्या पीकस्थितीत शेतकऱ्यांनी अवलंबावयाच्या व्यवस्थापन उपाययोजना तसेच येणाऱ्या रब्बी हंगामाचे नियोजन याबाबत मार्गदर्शन करण्यासाठी, वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठाचे माननीय कुलगुरू प्रा. (डॉ.) इन्द्र मणि यांच्या प्रेरणेतून आणि विस्तार शिक्षण संचालक डॉ. राकेश अहिरे यांच्या मार्गदर्शनाखाली राबविण्यात येणारामाझा एक दिवस माझ्या बळीराजासोबत’ हा उपक्रम मराठवाड्यातील आठही जिल्ह्यांत दिनांक ८ ऑक्टोबर २०२५ रोजी विविध गावांमध्ये यशस्वीरीत्या राबविण्यात आला. हा उपक्रम विद्यापीठाच्या वतीने दर महिन्याच्या दुसऱ्या बुधवारी नियमितपणे पार पडतो.

या उपक्रमात विद्यापीठातील १३ चमूमधील २८ शास्त्रज्ञांनी प्रक्षेत्रभेटी, चर्चासत्रे, कृती प्रात्यक्षिके आणि शेतकरी मेळावे आयोजित करून थेट शेतकऱ्यांशी संवाद साधला. जवळपास ५०० शेतकऱ्यांना पिकांच्या सद्य व्यवस्थापनाविषयी मार्गदर्शन करताना शास्त्रज्ञांनी कीडनियंत्रण, सतत पडणाऱ्या पावसामुळे पिकांचे संरक्षण, मृदा आरोग्य संवर्धन, सुधारित वाणांचा वापर तसेच पीक उत्पादन वाढीसाठी लागवड तंत्रज्ञान या विषयांवर सविस्तर माहिती दिली.

या उपक्रमांतर्गत माननीय कुलगुरू प्रा. (डॉ.) इन्द्र मणि आणि संचालक, विस्तार शिक्षण डॉ. राकेश अहिरे यांनी आर्वी (ता. परभणी) येथे प्रत्यक्ष उपस्थित राहून शेतकऱ्यांशी थेट संवाद साधला. विद्यापीठाच्या शास्त्रज्ञांनी शेतकऱ्यांच्या प्रश्नांना त्वरित आणि समर्पक उत्तरे देत त्यांच्या शंकांचे निरसन केले. यामुळे शेतकऱ्यांचा आत्मविश्वास वाढला असून, शास्त्रज्ञ थेट शेतकऱ्यांच्या शिवारात जाऊन मार्गदर्शन करत असल्याने शेतीत नवचैतन्य निर्माण झाले आहे, असे शेतकऱ्यांनी सांगितले.

शास्त्रज्ञांनी नुकसानग्रस्त पिकांची प्रत्यक्ष पाहणी करून योग्य उपाययोजना सुचवल्या. जमिनीचा पोत सुधारणा, सोयाबीन, तूर आणि कपाशी पिकांच्या व्यवस्थापनाबाबत मार्गदर्शन केले. फळबाग आणि भाजीपाला पिकांसाठी तात्काळ निचरा व्यवस्थापन, रोगप्रतिबंधक फवारणी तसेच मृदसंवर्धनाच्या उपायांची माहिती दिली. कीड व रोग व्यवस्थापनाच्या दृष्टीनेही शेतकऱ्यांना महत्त्वाचे मार्गदर्शन करण्यात आले.
रब्बी हंगामासाठी योग्य नियोजन, पीक निवड, आंतरपीक पद्धती, तसेच जमिनीची सुपीकता टिकवण्यासाठी आवश्यक उपाय यावर भर देण्यात आला. याशिवाय शासनाच्या विविध योजनांचा लाभ घेण्यासाठी आवश्यक कागदोपत्री प्रक्रियेचीही माहिती देण्यात आली.

या उपक्रमात परभणी येथील विद्यापीठाचे विस्तार शिक्षण संचालनालय, लातूर येथील कृषि महाविद्यालय, परभणी येथील सामुदायिक विज्ञान महाविद्यालय आणि कृषि अभियांत्रिकी महाविद्यालय, कृषि तंत्रज्ञान माहिती केंद्र, राष्ट्रीय कृषि संशोधन केंद्र (छत्रपती संभाजीनगर), नांदेड येथील केळी संशोधन केंद्र, विभागीय कृषि विस्तार शिक्षण केंद्रे (छ. संभाजीनगर, अंबाजोगाई, लातूर, परभणी) तसेच कृषि विज्ञान केंद्रे (छ. संभाजीनगर, खामगाव, बदनापूर, परभणी) आदी संलग्न कार्यालयांचा उत्स्फूर्त सहभाग लाभला.

कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनात सहयोगी अधिष्ठाता डॉ. राहुल रामटेके, मुख्य विस्तार शिक्षण अधिकारी डॉ. प्रशांत देशमुख, डॉ. सूर्यकांत पवार, प्रा. अरुण गुट्टे, डॉ. शिवाजी शिंदे, डॉ. वसंत सुर्यवंशी, डॉ. वीणा भालेराव, डॉ. मधुकर मोरे, डॉ. व्यंकट जगताप, डॉ. विजय भामरे, डॉ. बसलिंगप्पा कलालबंडी, डॉ. शंकर पुरी, डॉ. डी. डी. पटाईत, डॉ. एस. डी. सोमवंशी, डॉ. एस. आर. धांडगे, डॉ. दीप्ती पाटगावकर, डॉ. आशिष बागडे, डॉ. संजूला भवर, प्रा. किशोर जगताप, डॉ. भैय्यासाहेब गायकवाड, श्री. मधुकर मांडगे, सवाईसिंह निथरवाल, डॉ उषा सातपुते  श्री. एस. आर. रोडे आणि अभियंता कैलास जोंधळे यांनी सक्रिय सहभाग नोंदविला व मार्गदर्शन केले.

या उपक्रमामुळे शेतीतील संशोधन प्रत्यक्ष शेतकऱ्यांच्या शेतात पोहोचविण्याचे कार्य अधिक गतीमान झाले असून, आधुनिक तंत्रज्ञान अंगीकारून शाश्वत शेतीकडे वाटचाल करण्यासाठीमाझा एक दिवस माझ्या बळीराजासोबत’ हा उपक्रम एक प्रभावी दुवा ठरत आहे, असे समाधान शेतकऱ्यांनी व्यक्त केले.