Pages

Monday, October 6, 2025

वनामकृविद्वारा ७८ वी विभागीय रब्बी संशोधन व विस्तार सल्लागार समिती बैठक संपन्न

रब्बी हंगामाचे नियोजन व शेतकऱ्यांना दिलासा देण्यासाठी एकजुटीने कार्य करावे — माननीय कुलगुरू प्रा. (डॉ.) इन्द्र मणि


वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठ, परभणी अंतर्गत राष्ट्रीय कृषि संशोधन प्रकल्प, पैठण रोड, छत्रपती संभाजीनगर येथे दिनांक ६ ऑक्टोबर रोजी ७८ वी विभागीय रब्बी संशोधन व विस्तार सल्लागार समिती बैठक यशस्वीपणे पार पडली. या बैठकीच्या अध्यक्षस्थानी विद्यापीठाचे माननीय कुलगुरू प्रा. (डॉ.) इन्द्र मणि होते.

अध्यक्षीय भाषणात माननीय कुलगुरू प्रा. (डॉ.) इन्द्र मणि यांनी सांगितले की, मराठवाड्यातील अतिवृष्टीमुळे झालेल्या पिकांच्या नुकसानीच्या पार्श्वभूमीवर, या परिस्थितीत तग धरून उभ्या असलेल्या पिकांचे संवर्धन आणि आगामी रब्बी हंगामाचे नियोजन यावर विशेष भर देणे आवश्यक आहे. उपलब्ध ओलाव्याचा योग्य वापर करून रब्बी हंगामात अधिक क्षेत्र लागवडीखाली आणावे, ज्यायोगे खरीप हंगामातील नुकसानाची भरपाई होऊ शकेल. पुढे त्यांनी नमूद केले की, संशोधन संस्था आणि विस्तार विभाग यांनी एकत्रितपणे कार्य करणे अत्यंत गरजेचे आहे. शेतकऱ्यांपर्यंत तंत्रज्ञान प्रभावीपणे पोहोचविणे हे आपले प्रमुख ध्येय असले पाहिजे. कृषि क्षेत्रातील शाश्वत विकासासाठी शास्त्रज्ञांचे संशोधन आणि शेतकऱ्यांचा अनुभव यांचा समन्वय अत्यावश्यक आहे. तसेच त्यांनी पुढे सांगितले की, अतिवृष्टी व पूरस्थितीमुळे शेतकरी बांधवांचे मोठे नुकसान झाले आहे. अशा परिस्थितीत विद्यापीठ आणि कृषि विभागातील अधिकारी यांनी एकजुटीने कार्य करून शेतकऱ्यांना मार्गदर्शन व दिलासा द्यावा. नुकसान कमी करण्यासाठी आवश्यक उपाययोजना तातडीने शेतकऱ्यांपर्यंत पोहोचविणे गरजेचे आहे.

शेतकरी देवो भव: ही संकल्पना लक्षात घेऊन, विद्यापीठात विकसित तंत्रज्ञान कृषि विभागामार्फत शेतकऱ्यांपर्यंत पोहोचविणे, उत्पादन खर्च कमी करणे आणि हवामान बदलाशी सुसंगत तंत्रज्ञानाचा अवलंब करून शेतकऱ्यांचे नुकसान कमीत कमी करण्याच्या दिशेने प्रयत्न करावेत, असे त्यांनी आवाहन केले.

या बैठकीस संशोधन संचालक डॉ. खिजर बेग, विस्तार शिक्षण संचालक डॉ. राकेश अहिरे, विभागीय कृषि सहसंचालक श्री. सुनील वानखेडे (छत्रपती संभाजीनगर)श्री. लाडके (लातूरचे प्रतिनिधी), छत्रपती संभाजीनगरचे जिल्हा अधीक्षक कृषि अधिकारी श्री. प्रकाश देशमुख आदींची प्रमुख उपस्थिती होती. या बैठकीचे प्रास्ताविक सहयोगी संचालक (संशोधन) डॉ. सूर्यकांत पवार यांनी केले.

बैठकीत अतिवृष्टी, पूरस्थिती आणि बदलत्या हवामानामुळे रब्बी हंगामातील पीक नियोजन, बियाण्यांची उपलब्धता, नवीन तंत्रज्ञान हस्तांतरण तसेच शेतकऱ्यांपर्यंत तंत्रज्ञान पोहोचविण्याच्या उपाययोजनांवर सविस्तर चर्चा झाली.

याप्रसंगी विद्यापीठातील कृषि महाविद्यालयांचे प्राचार्य, विभागप्रमुख, कृषि संशोधन केंद्रांचे प्रमुख, जिल्हा अधीक्षक कृषि अधिकारी, कृषि विज्ञान केंद्रांचे कार्यक्रम समन्वयक, विस्तार अधिकारी आणि कृषि विद्यावेत्ता मोठ्या संख्येने उपस्थित होते. बैठकीच्या उद्घाटन समारंभाचे सूत्रसंचालन व आभार प्रदर्शन डॉ. सुरेखा कदम यांनी केले.