हवामान अनुकूल तंत्रज्ञान, जलसंधारण, बालविवाहाचे विपरीत परिणाम आणि शिक्षणाचे महत्त्व अधोरेखित
वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठ, परभणीचे माननीय कुलगुरू प्रा. (डॉ.)
इन्द्र मणि यांच्या संकल्पनेतून आणि विस्तार शिक्षण संचालक डॉ. राकेश अहिरे
यांच्या मार्गदर्शनाखाली, सामुदायिक विज्ञान महाविद्यालय व कृषि
अभियांत्रिकी महाविद्यालय यांच्या संयुक्त विद्यमाने “माझा
एक दिवस माझ्या बळीराजासोबत” हा उपक्रम परभणी तालुक्यातील इंदेवाडी येथे दिनांक ८ ऑक्टोबर
२०२५ रोजी राबविण्यात आला.
या उपक्रमांतर्गत शेतकऱ्यांशी थेट संवाद साधण्यात आला. कार्यक्रमाच्या
अध्यक्षस्थानी सहयोगी अधिष्ठाता डॉ. राहुल रामटेके होते, तर प्रमुख पाहुणे
म्हणून इंदेवाडीचे सरपंच श्री. अशोक कच्छवे उपस्थित होते. व्यासपीठावर
विद्यापीठातील शास्त्रज्ञ डॉ. वीणा भालेराव, डॉ. मधुकर मोरे,
डॉ. शंकर पुरी, ग्रामसेवक श्री. हनुमान कच्छवे,
कृषि सहाय्यक श्री. विजय हातोले, माजी सरपंच श्री.
अनंतराव कच्छवे आदी मान्यवरांची उपस्थिती होती.
अध्यक्षीय भाषणात मार्गदर्शन करताना डॉ. राहुल रामटेके यांनी विद्यापीठाने
विकसित केलेल्या आधुनिक तंत्रज्ञानाचा अवलंब करण्याचे आवाहन उपस्थित शेतकऱ्यांना
केले. त्यांनी प्रामुख्याने हवामान अनुकूल तंत्रज्ञान, बोरवेल व विहीर
पुनर्भरण तंत्रज्ञान, तसेच रुंद सरी-वरंबा पद्धती यांचे
महत्त्व विशद केले. याशिवाय त्यांनी महाराष्ट्र शासनाद्वारे विकसित ‘महाविस्तार’
ॲप विषयी सविस्तर माहिती दिली.
डॉ. वीणा भालेराव यांनी आपल्या भाषणात मुलींच्या शिक्षणाचे महत्त्व
अधोरेखित करत, त्यांना सक्षम बनविण्याचे आवाहन ग्रामस्थांना केले. त्यांनी नमूद केले की,
बालविवाहामुळे मुलींच्या शारीरिक, मानसिक व
बौद्धिक विकासावर विपरीत परिणाम होतो आणि त्याचा परिणाम पुढील पिढीवरही जाणवतो.
म्हणूनच गावात एकही बालविवाह होऊ नये यासाठी सर्वांनी पुढाकार घ्यावा, असे त्यांनी आवाहन केले.
डॉ. मधुकर मोरे यांनी जमिनीतील पाण्याचा निचरा करण्यासाठी विविध उपाय
सुचवले. सध्याच्या स्थितीत जमिनीचा वरचा थर खरडून गेलेला असल्याने तिचे पुनर्जीवन
करण्यासाठी हिरवळीची खते, सेंद्रिय खते, तसेच उन्हाळ्यात तळ्यातील गाळ जमिनीवर
टाकणे या उपायांचा अवलंब करावा, असे त्यांनी सांगितले.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक डॉ. शंकर पुरी यांनी केले. त्यांनी
विद्यापीठातील विविध तंत्रज्ञानांचा अवलंब करण्याचे महत्त्व स्पष्ट केले तसेच
शेतकऱ्यांच्या समस्यांचे निराकरण करण्यासाठी विद्यापीठाची हेल्पलाइन आणि
व्हॉट्सअॅप क्रमांक यांची माहिती उपस्थितांना दिली.
या उपक्रमात इंदेवाडी येथील प्रगतशील शेतकरी श्री. शिवाजीराव कच्छवे, श्री. संजय
सिसोदिया श्री. माधवराव कच्छवे, श्री.बन्सीधर लाड, यांच्यासह ३२ शेतकरी, जिल्हा परिषद शाळेचे ४०
विद्यार्थी, तसेच ग्रामीण जागरुकता कार्यानुभव उपक्रमातील २०
ग्रामकन्या व ग्रामदूत अशा एकूण ९२ जणांनी उत्स्फूर्त सहभाग नोंदवला.
कार्यक्रम यशस्वीपणे पार पाडण्यासाठी ग्रामपंचायत कार्यालय, इंदेवाडी यांचे
सरपंच श्री. अशोक कच्छवे, जिल्हा परिषद शाळेचे मुख्याध्यापक श्री.
जाधव, शिक्षक श्री. बाबर, तसेच
ग्रामकन्या व ग्रामदूत यांनी मोलाचे परिश्रम घेतले.