वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठाच्या विस्तार शिक्षण संचलनालया अंतर्गत
कृषि तंत्रज्ञान माहिती केंद्राच्या वतीने “माझा एक दिवस माझ्या बळीराजासोबत” या उपक्रमांतर्गत
आर्वी (ता. परभणी) येथे अतिवृष्टीग्रस्त भागातील शेतकऱ्यांसोबत दिनांक ८ ऑक्टोबर २०२५
रोजी प्रक्षेत्र भेट आणि गटचर्चा आयोजित करण्यात आली.
या कार्यक्रमास विद्यापीठाचे माननीय कुलगुरू प्रा. (डॉ.) इन्द्र मणि यांनी प्रत्यक्ष
उपस्थित राहून शेतकऱ्यांशी थेट संवाद साधला. त्यांच्या सोबत संचालक विस्तार शिक्षण
डॉ. राकेश अहिरे, मुख्य विस्तार शिक्षण अधिकारी डॉ. प्रशांत देशमुख, उद्यानविद्या
तज्ज्ञ डॉ. बसलिंगप्पा कलालबंडी, कीटकशास्त्रज्ञ डॉ. दिगंबर पटाईत
आदींची प्रमुख उपस्थिती होती.
माननीय कुलगुरू प्रा. (डॉ.) इन्द्र मणि यांनी अतिवृष्टीमुळे नुकसानीचा सामना
करत असलेल्या शेतकऱ्यांशी थेट संवाद साधत त्यांच्या शेतांची पाहणी करून नुकसानीचा प्रत्यक्ष
आढावा घेतला. त्यांनी शेतकऱ्यांना धीर देत सांगितले की, सध्याच्या अतिवृष्टीमुळे
झालेली हानी मोठी असली तरी शेतकऱ्यांनी खचून न जाता धैर्याने परिस्थितीचा सामना करावा.
शेतकऱ्यांचे मनोबल हेच खरी ताकद असून, संकटाच्या काळातही नवी
संधी निर्माण करता येते. ते पुढे म्हणाले की, जमिनीत सध्या मुबलक
ओलावा उपलब्ध आहे. या नैसर्गिक संसाधनाचा योग्य वापर करून येणाऱ्या रब्बी हंगामात
गहू, हरभरा, ज्वारी, करडई, जवस, आदी पिकांची नियोजनबद्ध लागवड करावी. यामुळे खरीपातील नुकसानीची
भरपाई होऊन शेतकऱ्यांच्या उत्पन्नात वाढ होऊ शकते. माननीय कुलगुरूंनी पुढे हवामान बदलाचा
उल्लेख करत सांगितले की, या वर्षीची परिस्थिती ही बदलत्या हवामानाचे
स्पष्ट उदाहरण आहे. भविष्यात अशा घटना वारंवार घडू शकतात, म्हणूनच
शेतकऱ्यांनी हवामान सुसंगत पीक पद्धती, जलसंधारण तंत्रज्ञान,
मृदसंवर्धन आणि ताण सहनशील वाणांचा अवलंब करणे गरजेचे आहे. ते म्हणाले,
विद्यापीठ शेतकऱ्यांच्या पाठीशी सदैव उभे असून, त्यांना हवामान बदलाशी जुळवून घेण्यासाठी आवश्यक तांत्रिक मार्गदर्शन,
प्रशिक्षण आणि प्रात्यक्षिके देण्यास तत्पर आहे. कृषि हा आपला संस्कार
आहे आणि संशोधन, तंत्रज्ञान व परिश्रम यांच्या एकत्रित शक्तीने
आपण कोणतेही संकट पार करू शकतो.
विस्तार शिक्षण संचालक डॉ. राकेश अहिरे यांनी यावेळी सांगितले की, अतिवृष्टीमुळे निर्माण
झालेल्या या परिस्थितीत विद्यापीठ शेतकऱ्यांच्या पाठीशी ठामपणे उभे आहे. मराठवाड्यातील
प्रत्येक जिल्ह्यात विद्यापीठाचे शास्त्रज्ञ प्रत्यक्ष शेतांवर भेट देऊन तांत्रिक मार्गदर्शन
करत आहेत. या संकट काळात शेतकऱ्यांना योग्य उपाययोजना सुचवणे आणि आत्मविश्वास देणे
हेच विद्यापीठाचे प्रमुख ध्येय आहे.
या वेळी विद्यापीठाचे श्री. मधुकर मांडगे, श्री. आशिष अंभोरे उपस्थित होते. तर आर्वी (ता. परभणी)पंचक्रोशीतील एकूण ६५ शेतकरी सहभागी झाले होते. शेतकऱ्यांनी विद्यापीठाच्या या उपक्रमाचे स्वागत करत आपल्या अडचणी मांडल्या आणि येणाऱ्या रब्बी हंगामाकरिता तांत्रिक मार्गदर्शन मिळावे, अशी अपेक्षा व्यक्त केली.