Pages

Tuesday, March 31, 2026

वनामकृवितील सामुदायिक विज्ञान महाविद्यालयात प्रायोगिक पूर्व-प्राथमिक शाळेचा १४ वा दीक्षांत समारंभ संपन्न

संस्कार, शिक्षण आणि सर्वांगीण विकासाचा संदेश : माननीय कुलगुरू प्रा. (डॉ.) इन्द्र मणि यांचे विद्यार्थ्यांना मार्गदर्शन

वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठ, परभणी अंतर्गत सामुदायिक विज्ञान महाविद्यालयातील मानव विकास व कौटुंबिक अभ्यास विभागाच्या वतीने प्रायोगिक पूर्व-प्राथमिक शाळेतील (एलपीपी - Lab Pre-Primary School) विद्यार्थ्यांचा १४ वा दीक्षांत समारंभ दिनांक ३१ मार्च २०२६ रोजी उत्साहात संपन्न झाला.

पूर्व-प्राथमिक शाळेतील ब्रिज सेक्शन (वय ५ ते ६ वर्षे) मधील विद्यार्थ्यांनी आपले शिक्षण यशस्वीरित्या पूर्ण केल्याबद्दल या समारंभाचे आयोजन करण्यात आले होते.

समारंभाच्या अध्यक्षस्थानी विद्यापीठाचे माननीय कुलगुरू प्रा. (डॉ.) इन्द्र मणि हे होते. विशेष अतिथी म्हणून श्रीमती जयश्री मिश्रा तसेच शिक्षण संचालक डॉ. भगवान आसेवार उपस्थित होते. व्यासपीठावर सहयोगी अधिष्ठाता डॉ. नीता गायकवाड आणि एलपीपी शाळेच्या समन्वयक डॉ. वीणा भालेराव यांची प्रमुख उपस्थिती होती.

माननीय कुलगुरू प्रा. (डॉ.) इन्द्र मणि यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना राष्ट्रभावना, आदर, प्रेम, बंधुभाव, शिक्षण, चारित्र्य, संस्कार आणि नैतिक मूल्ये जोपासण्याचे महत्त्व अधोरेखित करत उपदेश दिला. एलपीपी शाळा ही विद्यापीठाच्या अंतर्गत प्रमाणपत्र देणारी शाळा असल्यामुळे केजी ते पीजीपर्यंत शिक्षण देणारे विद्यापीठ म्हणून राष्ट्रीय स्तरावर ओळख निर्माण झाल्याचे त्यांनी नमूद केले. येथे मुलांच्या सर्वांगीण विकासासाठी प्रयोगाधारित आणि नैसर्गिक पद्धतीने शिक्षण दिले जाते, असेही त्यांनी सांगितले.

विद्यार्थ्यांनी आई-वडील, आजी-आजोबा, शिक्षक यांना देवतुल्य मानून अनुकरण करावे, तसेच शिस्तबद्ध वर्तन ठेवावे, असा सल्ला त्यांनी दिला. केवळ प्रमाणपत्रे मिळविण्यापेक्षा चांगले संस्कार मिळविणे अधिक महत्त्वाचे असल्याचे त्यांनी अधोरेखित केले. विद्यार्थ्यांमध्ये कृषि शिक्षणाची आवड निर्माण व्हावी यासाठी विद्यापीठातील विविध संशोधन केंद्रे, प्रयोगशाळा आणि प्रक्षेत्रांना भेटी आयोजित करण्याची सूचना त्यांनी केली. यावेळी त्यांनी सर्व विद्यार्थ्यांचे अभिनंदन करून त्यांच्या उज्ज्वल भविष्यासाठी शुभेच्छा दिल्या.

शिक्षण संचालक डॉ. भगवान आसेवार यांनी लहान विद्यार्थ्यांनी व्यक्त केलेले मनोगत पाहून आपणही लहान व्हावे अशी भावना व्यक्त केली आणि विद्यार्थ्यांचे अभिनंदन केले.

सहयोगी अधिष्ठाता डॉ. नीता गायकवाड यांनी विद्यार्थ्यांनी घेतलेल्या ज्ञानाचा योग्य उपयोग करून आयुष्यात यश मिळवावे, अशा शुभेच्छा दिल्या. तसेच या शाळेतून शिक्षणाच्या मूलभूत संकल्पना प्रभावीपणे शिकवल्या जातात, असेही त्यांनी नमूद केले.

प्रस्तावना एलपीपी शाळेच्या समन्वयक डॉ. वीणा भालेराव यांनी केली. त्यांनी वर्षभर राबविण्यात आलेल्या शैक्षणिक व सहशालेय उपक्रमांची माहिती देत विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी घेतलेल्या प्रयत्नांचा आढावा मांडला.

ऋता भोकरे, अनन्या शिंदे, शुभंकर दैठणकर आणि अवनी कुलकर्णी या विद्यार्थ्यांनी मनोगत व्यक्त करताना शाळेतून केवळ शिक्षणच नव्हे, तर उत्तम नागरिक बनण्यासाठी आवश्यक संस्कार मिळाल्याबद्दल कृतज्ञता व्यक्त केली. योगा, विविध खेळ, कला आणि हसतखेळत शिक्षण यामुळे सर्वांगीण विकास झाल्याचे त्यांनी नमूद केले.

कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व आभार प्रदर्शन एलपीपी शिक्षिका श्रीमती श्रुती औंढेकर यांनी केले. कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी सहयोगी अधिष्ठाता डॉ. नीता गायकवाड व विभाग प्रमुख तथा एलपीपी समन्वयक डॉ. वीणा भालेराव यांच्या मार्गदर्शनाखाली एलपीपी शाळेतील सर्व शिक्षक व कर्मचाऱ्यांनी परिश्रम घेतले.