Pages

Wednesday, April 1, 2026

कोरडवाहू शेतीत कृत्रिम बुद्धिमत्तेच्या वापरावर वनामकृवित मानव संसाधन विकास (HRD) प्रशिक्षण कार्यक्रम संपन्न

कोरडवाहू शेतीसाठी एआय व हवामान-सुसंगत तंत्रज्ञानाचा अवलंब आवश्यक : माननीय कुलगुरू प्रा. (डॉ.) इन्द्र मणि

वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठ, परभणी येथे “कोरडवाहू शेती संशोधन व अनुप्रयोग क्षेत्रात कृत्रिम बुद्धिमत्तेची भूमिका” या विषयावर मानव संसाधन विकास (HRD) प्रशिक्षण कार्यक्रम दिनांक ३१ मार्च २०२६ रोजी उत्साहात पार पडला. हा कार्यक्रम अखिल भारतीय समन्वित कोरडवाहू शेती संशोधन प्रकल्प (AICRPDA) अंतर्गत आयोजित करण्यात आला.

कार्यक्रमाचे उद्घाटन विद्यापीठाचे माननीय कुलगुरू प्रा. (डॉ.) इन्द्र मणि यांच्या अध्यक्षतेखाली झाले. यावेळी संशोधन आणि शिक्षण संचालक डॉ. भगवान आसेवार व विस्तार शिक्षण संचालक डॉ. राकेश आहिरे प्रमुख अतिथी म्हणून उपस्थित होते.

मार्गदर्शन करताना माननीय कुलगुरू प्रा. (डॉ.) इन्द्र मणि यांनी शाश्वत शेतीसाठी हवामान-सुसंगत तंत्रज्ञानाचा वापर आवश्यक असल्याचे सांगितले. कोरडवाहू शेतीत कृत्रिम बुद्धिमत्तेचा वापर करून उत्पादनक्षमता वाढविता येते, असे त्यांनी नमूद केले. तसेच वेळेचे नियोजन, यंत्रीकरण आणि संसाधनांचा कार्यक्षम वापर हे घटक अत्यंत महत्त्वाचे असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. हवामान बदलाच्या पार्श्वभूमीवर हवामान-तटस्थ तंत्रज्ञानांचा विकास करून ते शेवटच्या शेतकऱ्यापर्यंत पोहोचविण्याची गरजही त्यांनी अधोरेखित केली. मर्यादित संसाधनांमध्ये योग्य व्यवस्थापन व पूर्वतयारीचे महत्त्व त्यांनी सांगितले. कोरडवाहू शेतीतील छोटा पेरणी कालावधी, कमी आर्द्रता व अल्प सुपीक माती या अडचणी लक्षात घेता, एआय-आधारित साधने निर्णय प्रक्रियेसाठी व निविष्ठाचा अचूक आणि कमी खर्चात वापर करण्यासाठी उपयुक्त ठरतात, असे त्यांनी स्पष्ट केले.

डॉ. भगवान आसेवार यांनी कृषि क्षेत्रातील मानव संसाधन विकासाचे महत्त्व अधोरेखित करत, शास्त्रज्ञ, प्राध्यापक, विद्यार्थी व प्रगतशील शेतकऱ्यांना नवीन तंत्रज्ञानाचे प्रशिक्षण देणे आवश्यक असल्याचे सांगितले. डॉ. राकेश आहिरे यांनी हवामान-आधारित शेती तंत्रज्ञानाचे मूल्यांकन व सुधारणा यावर प्रकाश टाकला.

प्रास्ताविकात प्रमुख शास्त्रज्ञ डॉ. आनंद गोरे यांनी कार्यक्रमाची उद्दिष्टे स्पष्ट केली. तांत्रिक सत्रात विविध तज्ज्ञांनी मार्गदर्शन केले. डॉ. कैलास डाखोरे यांनी विद्यमान हवामान स्थिती व अंदाज याविषयी माहिती दिली. डॉ. गोपाळ शिंदे यांनी कृषि संशोधनातील कृत्रिम बुद्धिमत्तेची भूमिका स्पष्ट केली, तर डॉ. प्रविण कापसे यांनी अध्यापन व संशोधनात एआय साधनांचा वापर कसा करावा यावर मार्गदर्शन केले. डॉ. धीरज पाथ्रीकर यांनी आर्थिक नियोजन व जोखीम कमी करण्याच्या उपाययोजनांवर माहिती दिली.

या प्रसंगी कोरडवाहू शेती मध्ये तंत्रज्ञाना प्रसार करणाऱ्या शेतकरी बंधू भगिनी यांचा माननीय कुलगुरू यांनी विशेष सत्कार केला.

या कार्यक्रमास सहयोगी अधिष्ठाता डॉ. प्रविण वैद्य, डॉ. राजेश क्षीरसागर, डॉ. राहुल रामटेके, डॉ. विश्वनाथ खंदारे, सहयोगी संचालक (संशोधन) डॉ. हिराकांत काळपांडे, विभागप्रमुख डॉ. विलास खर्गखराटे, डॉ. हरिहर कौसडीकर, डॉ. पुरुषोत्तम नेहरकर, डॉ. सुमंत जाधव, उपसंचालक डॉ. जी. पी. जगताप, वरिष्ठ शास्त्रज्ञ डॉ. मधुकर मोरे, डॉ. गणेश गायकवाड तसेच इतर अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.

कार्यक्रमात शेतकऱ्यांचे अनुभव कथन व गटचर्चा आयोजित करण्यात आली, ज्यामध्ये NICRA व इतर शेतकऱ्यांचा सहभाग होता.

सूत्रसंचालन डॉ. पपीता गौरखेड़े यांनी केले, तर आभार प्रदर्शन डॉ. जी. के. गायकवाड यांनी केले.

प्रगतशील शेतकरी श्री. ज्ञानोबा पारधे, श्री. घाटुळ, श्री. आवडाजी गमे व श्री. कृष्णा गव्हाणे यांनी सहभाग घेतला. या प्रशिक्षण कार्यक्रमास मोठ्या संख्येने शास्त्रज्ञ, प्राध्यापक, विद्यार्थी व शेतकरी उपस्थित होते. कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी डॉ. तेजस्विनी कच्छवे, रिठे, मंगेश राऊत, आघम, भगवत वाघ, सादेक शेख, सुरेश खटिंग, प्रतीक्षा पाटील,  अर्जुन जाधव व अशोक खिल्लारे यांनी विशेष परिश्रम घेतले.