वनामकृविच्या नांदेड येथील शासकीय कृषि महाविद्यालयात विद्यार्थ्यांशी सुसंवाद
नांदेड येथील शासकीय कृषि महाविद्यालय हे पवित्र गुरुद्वारा भूमीत तसेच
महाराष्ट्राचे भागीरथ कै. शंकरराव चव्हाण यांच्या कर्मभूमीत स्थित आहे. या महाविद्यालयात
विद्यापीठाच्या संशोधन, विस्तार आणि शिक्षण क्षेत्रातील
अनुभवी व निपुण प्राध्यापकांकडून विद्यार्थ्यांना मार्गदर्शन मिळत असून, विद्यार्थ्यांनी कठोर परिश्रम, वेळेचे भान आणि
शिस्तीला महत्त्व देत आपल्या ज्ञानाचा उपयोग यशस्वी जीवनासाठी करावा, असे प्रतिपादन वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठाचे शिक्षण संचालक डॉ.
बाबासाहेब ठोंबरे यांनी केले.
नांदेड येथील शासकीय कृषि महाविद्यालयात दिनांक २७ ऑगस्ट २०२६ रोजी आयोजित ‘विद्यार्थ्यांशी
सुसंवाद’ कार्यक्रमात ते विद्यार्थ्यांशी संवाद साधताना बोलत होते. यावेळी त्यांनी
विद्यार्थ्यांना अभ्यासाबरोबरच निर्णयक्षमता विकसित करण्याचा सल्ला दिला.
भविष्यातील आव्हानांना सामोरे जाताना विद्यार्थी मोठे अधिकारी, धोरणकर्ते आणि उद्योजक म्हणून पुढे येणार आहेत. त्यामुळे ज्ञानासोबतच
सामाजिक भान आणि भावनिक बुद्धिमत्तेचा विकास करून सर्वांगीण व्यक्तिमत्त्व घडवावे,
असे त्यांनी सांगितले.
कृषि शिक्षणातील बदलत्या प्रवाहाचा उल्लेख करताना डॉ. ठोंबरे म्हणाले की, दर दहा वर्षांनी कृषि
शिक्षणातील विद्यार्थ्यांच्या प्रवेशाचे मुला-मुलींचे प्रमाण बदलत आहे. पूर्वी
नगण्य असलेली मुलींची संख्या आता ५० टक्क्यांहून अधिक झाली आहे, ही अत्यंत आनंदाची बाब आहे. भविष्यात कृषि व संलग्न क्षेत्रे, सेवा आणि कृषि उद्योजकतेमध्ये महिलांचा मोठा सहभाग राहणार असल्याचे त्यांनी
नमूद केले.
आधुनिक तंत्रज्ञानाचा प्रभावी वापर करण्याचे आवाहन
वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठाचे माननीय कुलगुरू प्रा. (डॉ.)
इन्द्र मणि हे ड्रोन तंत्रज्ञानाशी संबंधित विविध समित्यांचे अध्यक्ष असून, आधुनिक
तंत्रज्ञानाचा प्रभावी वापर करून विद्यापीठातील विद्यार्थ्यांनी राष्ट्रीय व
आंतरराष्ट्रीय स्तरावर आपली वेगळी ओळख निर्माण करावी, अशी
माननीय कुलगुरूंची अपेक्षा आहे. विद्यार्थ्यांनी या दिशेने झपाटून अभ्यास करून
तंत्रज्ञान आत्मसात करावे, असे आवाहन डॉ. ठोंबरे यांनी केले.
वेळेचे महत्त्व अधोरेखित करताना त्यांनी विद्यार्थ्यांना प्रत्येक क्षणाचा
योग्य उपयोग करण्याचा सल्ला दिला. महाविद्यालयातील अध्यापन वेळेत पूर्ण करून
अभ्यास, संशोधन व व्यक्तिमत्त्व विकासासाठी वेळेचे नियोजन करावे. शिक्षक आणि
विद्यार्थ्यांमध्ये आदर्श नाते निर्माण होऊन शिस्त व गुणवत्तेच्या जोरावर स्पर्धेत
पुढे जाण्याचे आवाहनही त्यांनी केले. विद्यार्थ्यांनी आपल्या शिक्षकांचे व
पालकांचे स्वप्न पूर्ण करण्यासाठी प्रामाणिक प्रयत्न करावेत, असेही त्यांनी सांगितले.
यावेळी महाविद्यालयाचे अधिष्ठाता डॉ. राजेश कदम यांनी प्रास्ताविक करून
महाविद्यालयाच्या प्रगतीचा आढावा सादर केला.

.jpeg)


