Pages

Friday, August 28, 2026

वनामकृविचे संशोधन संचालक डॉ. भगवान आसेवार यांची राष्ट्रीय कृषि संशोधन प्रकल्पास भेट

 


वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठाचे संशोधन संचालक डॉ. भगवान आसेवर यांनी विद्यापीठाच्या छत्रपती संभाजीनगर येथील राष्ट्रीय कृषि संशोधन प्रकल्पास दिनांक २७ ऑगस्ट २०२६ रोजी भेट देऊन प्रक्षेत्राची पाहणी केली. यावेळी कृषिविद्या विभागाचे विभागप्रमुख डॉ. विलास खर्गखराटे, राष्ट्रीय कृषि संशोधन प्रकल्पाचे सहयोगी संचालक संशोधन डॉ. सूर्यकांत पवार यांची उपस्थित होती.

या भेटीदरम्यान डॉ. भगवान आसेवार यांनी प्रक्षेत्रावर सुरू असलेल्या विविध प्रयोगांची पाहणी केली. सोयाबीन बियाणे उत्पादन, मका तसेच इतर खरीप पिकांवरील प्रयोगांची त्यांनी माहिती घेतली. प्रकल्पातील संबंधित शास्त्रज्ञांशी संवाद साधून विविध प्रयोगांची सद्यस्थिती, प्रगती आणि त्यातून अपेक्षित निष्कर्ष याबाबत जाणून घेतले.

प्रक्षेत्राची पाहणी केल्यानंतर खरीप पिकांच्या एकूण स्थितीबाबत डॉ. भगवान आसेवार यांनी समाधान व्यक्त केले. ते म्हणाले, यंदाचे वर्ष पावसाच्या दृष्टीने चिंता निर्माण करणारे आहे. मात्र, प्रक्षेत्रावरील पिकांची सद्यस्थिती पाहता आतापर्यंत झालेला पाऊस समाधानकारक आहे. येथून पुढेही पावसाची कृपा राहून सर्वांची चिंता दूर होईल, अशी अपेक्षा आहे.

यानंतर झालेल्या संवादात सहयोगी संचालक संशोधन डॉ. सूर्यकांत पवार यांनी राष्ट्रीय कृषि संशोधन प्रकल्पाच्या विविध उपक्रमांचा व कामकाजाचा आढावा सादर केला. विद्यापीठामार्फत बायोमिक्स, ट्रायकोकार्ड, जैविक खते आदींच्या माध्यमातून विकसित कृषि तंत्रज्ञान व जैविक निविष्ठा शेतकऱ्यांपर्यंत पोहोचविण्यात येत असल्याची माहिती त्यांनी दिली. जिल्ह्यातील तसेच आसपासच्या जिल्ह्यांतील शेतकरी या जैविक निविष्ठांच्या खरेदीसाठी मोठ्या प्रमाणात प्रक्षेत्रास भेट देत असल्याचेही त्यांनी सांगितले.

यावेळी राष्ट्रीय कृषि संशोधन प्रकल्पातील विविध विषयांचे शास्त्रज्ञ उपस्थित होते. यामध्ये वनस्पती रोगशास्त्रज्ञ डॉ. दिलीप हिंगोले, कृषिविद्या शास्त्रज्ञ डॉ. सी. बी. पाटील, डॉ. सुरेखा कदम, कीटकशास्त्रज्ञ डॉ. ज्ञानदेव मुटकुळे तसेच प्रक्षेत्रावर कार्यरत निरीक्षण व मदतनीस सोपान माने, बाबासाहेब लघाने आदींचा समावेश होता.