Pages

Thursday, September 10, 2026

माननीय कुलगुरू प्रा. (डॉ.) इन्द्र मणि यांच्या नेतृत्वात वनामकृविच्या करडई वाणांचा राष्ट्रीय ब्रीडर बियाणे वाटपात दबदबा

राष्ट्रीय स्तरावरील १६१.३३ क्विंटलपैकी ८४.५ क्विंटल बियाणे वनामकृविच्या वाणांचे; ५२.३८ टक्के वाटा


भारत सरकारच्या कृषि व शेतकरी कल्याण मंत्रालयाच्या तेलबिया विभागामार्फत रब्बी २०२६–२७ हंगामासाठी करडईसह विविध तेलबिया पिकांच्या ब्रीडर बियाणे वाटपाचे नियोजन करण्यात आले आहे. बियाण्याची गुणवत्ता, बियाणे वितरणाचा मागोवा घेण्याची व्यवस्था तसेच निर्धारित मुदतीत बियाणे उचलण्याबाबत संबंधित यंत्रणांना निर्देश देण्यात आले आहेत.

या पार्श्वभूमीवर वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठाने (वनामकृवि) करडई पिकाच्या संशोधन आणि ब्रीडर बियाणे उत्पादनाच्या क्षेत्रात पुन्हा एकदा राष्ट्रीय स्तरावर उल्लेखनीय कामगिरी नोंदविली आहे. माननीय कुलगुरू प्रा. (डॉ.) इन्द्र मणि यांच्या दूरदर्शी नेतृत्वाखाली, संशोधनाला दिलेले सातत्यपूर्ण प्रोत्साहन आणि भक्कम प्रशासकीय पाठबळ यामुळे विद्यापीठाच्या करडई संशोधनाला राष्ट्रीय स्तरावर व्यापक मान्यता मिळत असल्याचे या वाटपातून अधोरेखित झाले आहे.

रब्बी २०२६–२७ हंगामासाठी देशभरात करडई पिकासाठी एकूण १६१.३३ क्विंटल ब्रीडर बियाण्याचे वाटप करण्यात आले आहे. यापैकी तब्बल ८४.५ क्विंटल म्हणजेच ५२.३८ टक्के ब्रीडर बियाणे हे वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठाने विकसित केलेल्या करडई वाणांचे आहे. राष्ट्रीय स्तरावरील एकूण ब्रीडर बियाणे वाटपापैकी निम्म्याहून अधिक वाटा वनामकृविच्या वाणांना मिळणे ही विद्यापीठाच्या करडई संशोधनाची राष्ट्रीय स्तरावरील स्वीकारार्हता, गुणवत्ता आणि प्रभाव अधोरेखित करणारी महत्त्वपूर्ण कामगिरी आहे.

वनामकृविच्या करडई वाणांना मिळालेले ब्रीडर बियाणे वाटप

विद्यापीठाने विकसित केलेल्या करडई वाणांमध्येपीबीएनएस १५४(परभणी सुवर्णा) या सन २०२३ मध्ये अधिसूचित वाणासाठी ४८ क्विंटल, पीबीएनएस १८४ या सन २०२२ मध्ये अधिसूचित वाणासाठी २८.५ क्विंटल, तरपीबीएनएस – १२(परभणी कुसुम) या सन २००७ मध्ये अधिसूचित वाणासाठी ८ क्विंटल ब्रीडर बियाण्याचे वाटप करण्यात आले आहे.

यामध्येपरभणी सुवर्णा’ या अलीकडेच अधिसूचित झालेल्या वाणाला मिळालेले ४८ क्विंटलचे सर्वाधिक ब्रीडर बियाणे वाटप विशेष उल्लेखनीय आहे. शेतकऱ्यांच्या गरजा आणि बदलत्या हवामानाच्या परिस्थितीचा विचार करून विकसित करण्यात आलेल्या या वाणाला राष्ट्रीय स्तरावर मिळत असलेली मागणी ही त्याची उपयुक्तता आणि स्वीकारार्हता अधोरेखित करणारी आहे.

माननीय कुलगुरू प्रा. (डॉ.) इन्द्र मणि यांच्या नेतृत्वाखाली आणि संशोधन संचालक डॉ. भगवान आसेवार यांच्या मार्गदर्शनाखाली विद्यापीठाने संशोधन, गुणवत्तापूर्ण बियाणे निर्मिती आणि शेतकरी-केंद्रित तंत्रज्ञान प्रसाराला सातत्याने प्राधान्य दिले आहे. विद्यापीठ प्रशासन, करडई संशोधनाशी संबंधित शास्त्रज्ञ तसेच बियाणे उत्पादन व संबंधित कामकाजातील अधिकारी-कर्मचाऱ्यांच्या समन्वित प्रयत्नांमुळे वनामकृविच्या करडई वाणांना राष्ट्रीय पातळीवर मोठ्या प्रमाणात ब्रीडर बियाणे वाटप मिळणे शक्य झाले आहे.

करडई संशोधनातील या उल्लेखनीय कामगिरीबद्दल माननीय कुलगुरू प्रा. (डॉ.) इन्द्र मणि यांनी करडई संशोधन केंद्रातील सर्व अधिकारी, शास्त्रज्ञ व कर्मचाऱ्यांचे अभिनंदन केले. ते म्हणाले की, वनामकृविच्या करडई वाणांना मिळालेला राष्ट्रीय स्तरावरील हा मोठा वाटा विद्यापीठाच्या ‘शेतकरी देवो भव’ या भावनेतून सुरू असलेल्या शेतकरीहितैषी, गुणवत्तापूर्ण आणि परिणामकारक कृषि संशोधनाची पावती आहे. भविष्यात हवामान बदलाच्या पार्श्वभूमीवर करडईसह विविध तेलबिया पिकांसाठी अधिक उत्पादक, गुणवत्तापूर्ण आणि शाश्वत वाण विकसित करण्याच्या विद्यापीठाच्या प्रयत्नांना या यशामुळे निश्चितच बळ मिळेल.

विद्यापीठाच्या करडई संशोधनाची ही उल्लेखनीय कामगिरी माननीय कुलगुरू प्रा. (डॉ.) इन्द्र मणि यांच्या नेतृत्वाखाली संशोधनाला मिळणारे सातत्यपूर्ण प्रोत्साहन आणि संस्थात्मक पाठबळ यांचे फलित असल्याचे करडई पैदासकार डॉ. आर. आर. धुतमल आणि माजी करडई पैदासकार डॉ. एस. बी. घुगे यांनी नमूद केले.

या वाणांच्या विकासामध्ये माजी संशोधन संचालक डॉ. खिजर बेग, माजी संशोधन संचालक डॉ. दत्तप्रसाद वासकर, करडई पैदासकार डॉ. आर. आर. धुतमल, माजी करडई पैदासकार डॉ. एस. बी. घुगे तसेच अखिल भारतीय समन्वित करडई प्रकल्पातील वैज्ञानिक व तांत्रिक कर्मचाऱ्यांचे महत्त्वपूर्ण योगदान आहे. त्यांच्या सातत्यपूर्ण संशोधन प्रयत्नांमुळे वनामकृविच्या करडई वाणांनी राष्ट्रीय स्तरावर आपला ठसा उमटविला आहे.


पीबीएनएस १५४(परभणी सुवर्णा) 

पीबीएनएस १८४
पीबीएनएस – १२(परभणी कुसुम)