वसंतराव नाईक
मराठवाडा कृषि विद्यापीठांतर्गत कृषि महाविद्यालय,
परभणी येथील कृषि पदवीच्या सातव्या सत्रातील विद्यार्थ्यांसाठी कृषि
औद्योगिक कार्यानुभव कार्यक्रमांतर्गत चार आठवड्यांच्या औद्योगिक प्रशिक्षणास दिनांक
८ सप्टेंबर २०२६ रोजी प्रारंभ झाला. हे प्रशिक्षण दिनांक ८ सप्टेंबर ते ७ ऑक्टोबर
२०२६ या कालावधीत नामांकित ठिबक सिंचन कंपनी नेटाफिम इंडिया प्रायव्हेट लिमिटेड यांच्या
मार्गदर्शनाखाली आयोजित करण्यात आले आहे.
कार्यक्रमाच्या
अध्यक्षस्थानी कृषि महाविद्यालयाचे अधिष्ठाता डॉ. प्रवीण वैद्य होते. प्रमुख
मार्गदर्शक म्हणून नेटाफिम इंडिया प्रायव्हेट लिमिटेडचे क्षेत्रीय व्यवस्थापक श्री.
शिवाजी सांगळे उपस्थित होते. कृषि अभियांत्रिकी विभागाचे विभागप्रमुख डॉ. हरीश
आवारी यांच्या मार्गदर्शनाखाली या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले.
या
प्रशिक्षणात कृषि महाविद्यालयातील अंतिम सत्राचे एकूण ८० विद्यार्थी सहभागी झाले
आहेत. कृषिशी संबंधित उद्योग, प्रक्रिया उद्योग, कृषि सेवा संस्था तसेच विविध
व्यावसायिक क्षेत्रांचा प्रत्यक्ष अनुभव विद्यार्थ्यांना मिळावा आणि त्यांच्या
व्यावसायिक कौशल्यांचा विकास व्हावा, हा या कार्यक्रमाचा
प्रमुख उद्देश असल्याचे प्लेसमेंट अधिकारी डॉ. संजय पवार यांनी प्रास्ताविकात
सांगितले. कौशल्य विकासाच्या माध्यमातून विद्यार्थ्यांनी स्व-उन्नती साधून रोजगार
व उद्योजकतेच्या संधींचा लाभ घ्यावा, असेही त्यांनी नमूद
केले.
अध्यक्षीय भाषणात
अधिष्ठाता डॉ. प्रवीण वैद्य यांनी विद्यार्थ्यांच्या कौशल्य विकासाची आजच्या
स्पर्धात्मक युगातील गरज स्पष्ट केली. विद्यार्थ्यांनी औद्योगिक प्रशिक्षणाचा
गांभीर्याने व पूर्ण क्षमतेने लाभ घेऊन भविष्यातील करिअरसाठी स्वतःला सक्षम करावे, असे आवाहन त्यांनी केले. अंतिम सत्रातील
विद्यार्थ्यांनी स्पर्धात्मक परीक्षांच्या तयारीलाही प्राधान्य द्यावे, असे सांगून महाविद्यालयात विद्यार्थ्यांच्या स्पर्धात्मक परीक्षेच्या
तयारीसाठी यावर्षी विशेष डिजिटल ॲपची सुविधा उपलब्ध करून देण्यात आल्याची माहिती
त्यांनी दिली. विद्यार्थ्यांनी मेहनत व सातत्याने प्रयत्न केल्यास त्यांच्या
सर्वांगीण प्रगतीसाठी महाविद्यालय पूर्णपणे सहकार्य करेल, असेही
त्यांनी नमूद केले.
कार्यक्रमाचे
मुख्य आयोजक डॉ. हरीश आवारी यांनी कृषि अभियांत्रिकी तंत्रज्ञानाची कृषि व कृषि
उद्योगातील वाढती भूमिका स्पष्ट करून विद्यार्थ्यांनी स्वयंप्रेरणेने विविध
कौशल्ये आत्मसात करण्याची गरज अधोरेखित केली. बदलत्या काळात तांत्रिक ज्ञानासोबत
व्यावहारिक कौशल्ये आत्मसात करणे विद्यार्थ्यांच्या भविष्यासाठी महत्त्वाचे
असल्याचे त्यांनी सांगितले.
नेटाफिम
इंडिया प्रायव्हेट लिमिटेडचे क्षेत्रीय व्यवस्थापक श्री. शिवाजी सांगळे यांनी चार
आठवड्यांच्या प्रशिक्षणादरम्यान विद्यार्थ्यांना देण्यात येणाऱ्या प्रशिक्षणाची
रूपरेषा स्पष्ट केली. पाण्याचे काटेकोर व शास्त्रीय पद्धतीने व्यवस्थापन
करण्यासाठी आधुनिक सिंचन पद्धतींचे महत्त्व त्यांनी विशद केले. तसेच ठिबक सिंचन
प्रणाली, त्यातील विविध
साहित्य, तंत्रज्ञान आणि नेटाफिम कंपनीच्या कार्यपद्धतीची
विद्यार्थ्यांना माहिती करून दिली.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक प्लेसमेंट अधिकारी डॉ. संजय पवार यांनी केले. सूत्रसंचालन व आभार प्रदर्शन डॉ. मिर्झा बेग यांनी केले. कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी कार्यक्रमाधिकारी डॉ. मिर्झा बेग, डॉ. जाधव, डॉ. बरकुळे, डॉ. अमोल जाधव तसेच संबंधित शिक्षक व कर्मचाऱ्यांनी परिश्रम घेतले.

.jpeg)
.jpeg)

.jpeg)