Pages

Wednesday, January 27, 2016

वनामकृवित प्रजासत्‍ताक दिन उत्‍साहात साजरा

वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठात ६७ वा प्रजासत्‍ताक दिन उत्‍साहात साजरा करण्‍यात आला. विद्यापीठाच्‍या मुख्‍य प्रागंणात कुलगुरू मा डॉ बी व्‍यंकटेश्‍वरलु यांच्‍या हस्‍ते ध्‍वजारोहण करण्‍यात आले. यावेळी शिक्षण संचालक डॉ अशोक ढवण, संशोधन संचालक डॉ दत्‍तप्रसाद वासकर, विस्‍तार शिक्षण संचालक डॉ बी बी भोसले, कुलसचिव श्री दिलीप कच्‍छवे आदीसह विविध महाविद्यालयाचे प्राचार्य, अधिकारी, कर्मचारी व विद्यार्थ्‍यी मोठया संख्‍येने उपस्थित होते. यावेळी राष्‍ट्रीय छात्रसैनिकांनी छात्राधिकारी ले प्रा आशिष बागडे यांच्‍या नेतृत्‍वाखाली माननीय कुलगुरूनां सलामी देण्‍यात आली. कुलगुरू मा डॉ बी व्‍यंकटेश्‍वरलु यांनी प्रजासत्‍ताक दिनाच्‍या सर्वांना शुभेच्‍छा दिल्‍या. माननीय कुलगुरूच्‍या हस्‍ते ५२ महारष्‍ट्र बटालियन एनसीसी, नांदेड अंतर्गत कृषि महाविद्यालयाच्‍या छात्रसैनिकांनी विविध स्‍पर्धेत व राष्‍ट्रीय शिबीरात यशस्‍वी सहभाग नोंदविल्‍याबाबत गौरव करण्‍यात आले. यात सन २०१२-१३ व २०१३-१४ मधील उत्‍कृष्‍ट कॅडेट पुरस्‍कार प्राप्‍त गजानन भोगल, थल सैनिक कॅम्‍प फायरिंग साठी शंकर अभंगे, चंद्रकांत मुदिराज यांचा सत्‍कार करण्‍यात आला. तसेच सन २०१२-१३ व २०१३-१४ यादोन वर्षातील वर्षातील उल्‍लेखनिय कामगिरीबाबत नांदेड ५२ महारष्‍ट्र बटालियन एनसीसी यांच्‍या वतीने कृषि महाविद्यालयाच्‍या युनिटला सर्वसाधारण विजेतेपद देण्‍यात आले. २०१४-१५ साली घेण्‍यात आलेल्‍या बी प्रमाणपत्र परिक्षेत कृषि महाविद्यालयाच्‍या सहा विद्यार्थ्‍यांनी ए ग्रेड प्राप्‍त केल्‍याबाबत प्रतिक पठाडे, सत्‍यजीत लाड, अभिनय काटे, सुमित तुमोड, विजय घाटोळ व चंद्रकांत मुदिराज यांचा माननीय कुलगुरूच्‍या हस्‍ते सत्‍कार करण्‍यात आला.

Tuesday, January 26, 2016

गोळेगाव कृषी महाविद्यालय येथे राष्ट्रीय सेवा योजनेअंतर्गत रक्तदान शिबीर संपन्न

६७ व्‍या प्रजासत्ताक दिनाच्या पूर्वसंध्येला केले ६७ स्‍वयंसेवकांनी रक्तदान
वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापिठातंर्गत असलेल्‍या गोळेगाव (ता. औंढे नागनाथ जि हिगोंली) येथील कृषी महाविद्यालयाच्‍या राष्ट्रीय सेवा योजने अंतर्गत प्रजासत्ताक दिनाच्या पूर्वसंध्येला दिनांक २५ जानेवारी रोजी रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. शिबीराचे उदघाटन शिक्षण संचालक डॉ अशोक ढवण यांच्या हस्ते करण्‍यात आले. यावेळी महाराष्ट्र कृषी शिक्षण व संशोधन परिषद, पुणेचे विस्‍तार शिक्षण संचालक डॉ सुरेश अंबुलगेकर, तालुका कृषी अधिकारी श्री शरद अंभोरे, प्राचार्य डॉ विलास पाटील यांची प्रमुख उपस्थिती होती. या प्रसंगी शिक्षण संचालक डॉ अशोक ढवण यांनी महाविद्यालयाच्या प्रगतीबाबत समाधान व्यक्त केले तर डॉ अंबुलगेकर यांनी खडतर परिस्थितीत महाविद्यालयाच्या विद्यार्थ्यांच्या सर्वांगीन प्रगतीचे कौतुक करून कृषी परिषदेतर्फे महाविद्यालयांच्या प्रगतीसाठी राबवण्यात येणाऱ्या विविध योजनांची माहिती दिली. प्रास्‍ताविकात प्राचार्य डॉ विलास पाटील यांनी महाविद्यालयाच्या जडणघडण विषयी माहिती दिली. ६७ व्‍या प्रजासत्ताक दिनाच्या पूर्वसंध्येला घेण्यात आलेल्या रक्तदान शिबिरात ६७ रक्तदात्यांनी रक्तदान करून येणाऱ्या प्रजासत्ताक दिनाचे अनोखे स्वागत केले. रक्‍तदान शिबिराकरीता जिल्हा रक्त संक्रमण अधिकारी डॉ बी एल चव्हाण व त्यांच्या सर्व सहकाऱ्यांचे सहकार्य लाभले.प्रजाकसत्ताक दिनानिमित्त महाविद्यालयात घेण्यात आलेल्या विविध स्‍पर्धेत विजयी विद्यार्थी व विद्यार्थिनींना मान्यवरांच्या हस्ते बक्षिस वितरण करण्यात आले. कु भक्ती पुजारी हिने आंतरराष्ट्रीय योगा स्पर्धेत मिळवलेल्या यशाबद्दल व डॉ राजेश कदम यांना राज्यस्तरीय ऍग्रोकेयर आयडॉल पुरस्कार मिळाल्याबद्दल मान्यवरांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन डॉ रोहित सोनवणे तर आभार प्रदर्शन राष्ट्रीय सेवा योजनेचे कार्यक्रमधिकारी डॉ गजानन भालेराव यांनी केले. कार्यक्रम यशस्वीतेसाठी डॉ कदम, डॉ चांगुले, डॉ उमाटे, डॉ भालेराव, प्रा शिंदे, प्रा झाटे, डॉ मीनाक्षी पाटील, डॉ सोनवणे, डॉ धुरगुडे, डॉ बडोले, डॉ कोरके, श्रीमती सुरेवाड आदीसह महाविद्यालयाचे कर्मचारी, नवनियुक्त यिन प्रतिनिधी विशाल खेरणार विद्यार्थ्यांनी परिश्रम घेतले.

Tuesday, January 19, 2016

कृषि पदविधरांनी माता व मातीस विसरू नये......... मा. डॉ. राम खर्चे

महाराष्‍ट्र कृषी शिक्षण व संशोधन परिषदपुणे चे उपाध्‍यक्ष माडॉ राम खर्चे यांनी साधला विद्यापीठातील विद्यार्थी व कर्मचा-यांशी संवाद

कृषि विद्यापीठातील शैक्षणिक अभ्‍यासक्रमात विद्यार्थ्‍यांना सर्वकष असे ज्ञान मिळते, त्‍यामुळे स्‍पर्धा परिक्षेत मोठया प्रमाणात ते यश प्राप्‍त करतात. प्रशासकिय क्षेत्रात कार्य करतांना कृषि पदविधरांनी आपल्‍या मातेला व मातीस विसरू नये. कोणत्‍याही क्षेत्रात करियर करतांना कृषि पदविधरांनी शेतक-यांचे मनोबल उंचावण्‍यासाठी कार्य करावे, असे प्रतिपादन पुणे येथील महाराष्‍ट्र कृषि शिक्षण व संशोधन परिषदेचे उपाध्‍यक्ष मा. डॉ. राम खर्चे यांनी केले. वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठातील कृषि महाविद्यालयाच्‍या सभागृहात दिनांक १९ जानेवारी रोजी विद्यापीठातील विद्यार्थ्‍यी, अधिकारी व कर्मचारी यांच्‍याशी एका कार्यक्रमात संवाद साधतांना ते बोलत होते. कार्यक्रमाच्‍या अध्‍यक्षस्‍थानी कुलगुरू मा डॉ बी व्‍यंकटेश्‍वरलु हे होते तर शिक्षण संचालक डॉ अशोक ढवण, संशोधन संचालक डॉ दत्‍तप्रसाद वासकर, विस्‍तार शिक्षण संचालक डॉ बालाजी भोसले, कुलसचिव श्री दिलीप कच्‍छवे, प्राचार्य डॉ डि एन गोखले व प्राचार्य डॉ विलास पाटील यांची प्रमुख उपस्थिती होती.
  मा. डॉ. राम खर्चे पुढे म्‍हणाले की, कृषिच्‍या विद्यार्थ्‍यांनी व्‍यसनापासुन दुर राहावे, स्‍वत:हुन कृषि विस्‍तारात व शासनाच्‍या शेती विषयक विविध योजना गावात राबविण्‍यासाठी योगदान द्यावे. शेती व शेतक-यांच्‍या विकासासाठी दर्जात्‍मक कृषि शिक्षणाच्‍या आधारे गुणवंत मनुष्‍यबळ निर्मीतीसाठी कृषि विद्यापीठाच्‍या बळकटीकरणाची गरज आहे. कृषि परिषदे हे राज्‍यातील चारही कृषि विद्यापीठात समन्‍वयकाचे कार्य करते. कृषि विद्यापीठातील प्राध्‍यापक, शास्‍त्रज्ञ व कर्मचारी रिक्‍त पदांमुळे कृषि शिक्षण, संशोधन व विस्‍तार कार्यावर परिणाम होत आहे. राज्‍यातील चारही कृषि विद्यापीठातील विद्यार्थ्‍यी व कर्मचारी यांचे प्रश्‍न कृषि परिषदेच्‍या स्‍तरावर त्‍वरित सोडविण्‍यात येतील व जे प्रश्‍न शासनस्‍तरावर प्रलंबित आहेत ते शासनासमोर प्रभावीपणे मांडण्‍यात येतील, असे आश्‍वासन त्‍यांनी यावेळी दिले.
  याप्रसंगी कृषि विद्यापीठातील विविध महाविद्यालयातील विद्यार्थ्‍यी, अधिकारी व कर्मचारी यांनी आपले विविध समस्‍या व सुचना उपाध्‍यक्ष मा. डॉ राम खर्चे यांच्‍या समोर मांडल्‍या. त्‍यात मुख्‍यत: कृषि पदविधरांना परिसर मुलाखती आयोजीत करणे, शैक्षणिक शिष्‍यवृत्‍तीचे प्रश्‍न, विद्यापीठ सलंग्‍न महाविद्यालयातील शैक्षणिक दर्जा, आचार्य पदवीसाठी सामायिक प्रवेश परिक्षा, दुष्‍काळ परिस्थित शुल्‍क माफी आदींचा समावेश होता. तर विद्यापीठातील वनामकृवि कर्मचारी संघाचे अध्‍यक्ष प्रा दिलीप मोरे यांनी अधिकारी, कर्मचारी व विद्यार्थ्‍यांचे प्रश्‍न मांडले.
  कार्यक्रमात रासेयोचे कार्यक्रमाधिकारी प्रा अनिस कांबळे यांना शासनाचा उत्‍कृष्‍ट कार्यक्रम अधिकारी म्‍हणुन मिळालेल्‍या सन्‍मानाबद्दल व गुलबर्गा येथे पार पडलेल्‍या राष्‍ट्रीय एकात्‍मता शिबीरात कृषि महाविद्यालयाच्‍या राष्‍ट्रीय सेवा योजनेच्‍या कार्यक्रमाधिकारी प्रा विजय जाधव व स्‍वयंसेवकांनी सक्रीय सहभागाबाबत मान्‍यवरांच्‍या हस्‍ते सत्‍कार करण्‍यात आला.

  कार्यक्रमाचे प्रास्ताविक शिक्षण संचालक डॉ. अशोक ढवण यांनी केले. कार्यक्रमाचे सुत्रसंचालन विभाग प्रमुख डॉ बाबासाहेब ठोंबरे यांनी तर आभार प्रदर्शन कुलसचिव श्री दिलीप कच्‍छवे यांनी केले. कार्यक्रमास विद्यापीठातील अधिकारी, कर्मचारी, प्राध्‍यापक व विद्यार्थ्‍यी मोठया संख्‍येने उपस्थित होते

Saturday, January 16, 2016

शेतक-यांनी खचुन न जाता संकटांना धीराने तोंड द्यावे - कुलगुरू मा. डॉ. बी. व्‍यंकटेश्‍वरलू


वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठातील कृषि तंत्रज्ञान माहिती केंद्र व सेनगांव तालुका कृषि अधिकारी यांच्‍या संयुक्‍त विद्यमाने हिंगोली जिल्‍हयातील सेनगांव तालुक्‍यातील मौजे माझोड येथे राष्‍ट्रीय कृषि विकास योजना एकात्मिक तंत्रज्ञान प्रसार प्रकल्‍पांतर्गत शेतकरी मेळावा व प्रक्षेत्र भेट कार्यक्रमाचे आयोजन दिनांक १५ जानेवारी रोजी करण्‍यात आले होते. कार्यक्रमाचे उद्घाटन कुलगुरु मा. डॉ. बी. व्‍यंकटेश्‍वरलू यांच्‍या हस्‍ते करण्‍यात आले तर कार्यक्रमाच्‍या अध्‍यक्षस्‍थानी गावच्‍या सरपंचा श्रीमती अनुसयाताई भोने होत्‍या व प्रमुख पाहुणे म्‍हणुन विस्‍तार शिक्षण संचालक डॉ. बी. बी. भोसले, हिंगोली आत्‍माचे प्रकल्‍प संचालक श्री. एस. बी. आळसे यांची उपस्थिती होती. मुख्‍य विस्‍तार शिक्षण अधिकारी डॉ. पी. आर. देशमुख, विस्‍तार कृषि विदयावेत्‍ता डॉ. यु. एन. आळसे, आत्‍माचे प्रकल्‍प उपसंचालक श्री. तीर्थकर, कृषि विज्ञान केंद्राचे डॉ. शेळके, तालुका कृषि अधिकारी श्री. आर. बी. हरणे, मंडळ कृषि अधिकारी श्री. जी. जे. बळवंतकर आदींची प्रमुख उपस्थिती होती.
कुलगुरु मा. डॉ. बी. व्‍यंकटेश्‍वरलु उद्घाटनपर भाषणात म्‍हणाले कि, राजस्‍थान सारख्‍या राज्‍यात अत्‍यल्‍प पर्जन्‍यमान आहे तर ओरिसा सारख्‍या राज्‍यात ओला दुष्‍काळ असतो परंतू तेथील शेतकरी संकटाना धीराने तोंड देऊन आत्‍महत्‍याचा विचार करित नाहीत. महाराष्‍ट्र राज्‍यातील शेतक-यांनी खचुन न जाता नव्‍या उमेदीने आलेल्‍या संकटाला सामोरे जावे. महाराष्‍ट्र शासन व कृषि विदयापीठ सदैव आपल्‍या पाठीशी आहेत. शेतक-यांना यापुढे शेतीतील पाणी व्‍यवस्‍थापनावर जास्‍त लक्ष केंद्रीत करावे, विदयापीठाच्‍या विविध कमी खर्चीक तंत्रज्ञानाचा शेतक-यांनी अवलंब करावा, असे अवाहन त्‍यांनी केले.
विस्‍तार शिक्षण संचालक डॉ. बी. बी. भोसले आपल्‍या भाषणात म्‍हणाले की, कुठल्‍याही समस्‍येला आत्‍महत्‍या हा उपाय नाही, आत्‍महत्‍येनी समस्‍या न सुटता उलट प्रश्‍न वाढणार आहेत, तुमच्‍यानंतर तुमच्‍या कुटुंबाच्‍या समस्‍या कोण सोडवणार? त्‍यामुळे शेतक-यांनी आत्‍महत्‍येचा अवलंब करु नये.
हिंगोली आत्‍माचे प्रकल्‍प संचालक श्री. एस. बी. आळसे यांनी शेतक-यांनी गटशेतीचा अवलंब करावा, त्‍याकरिता आत्‍माव्‍दारे शेतक-यांना कंपनी स्‍थापन करण्‍यासाठी व शेतीपुरक उदयोग चालु करण्‍यासाठी प्रशिक्षण देण्‍यात येईल, असे सांगितले. मेळाव्‍यात टंचाई परिस्थितीत दुग्‍धव्‍यवसाय व चाराव्‍यवस्‍थापन या विषयावर डॉ. अे. टी. शिंदे, पिकांवरील रोग व्‍यवस्‍थापनावर डॉ. व्‍ही. एम. घोळवे, किड व्‍यवस्‍थापनावर प्रा. डी. डी. पटाईत यांनी मार्गदर्शन केले.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक विस्‍तार कृषि विदयावेत्‍ता डॉ. यु. एन. आळसे यांनी यांनी केले तर सुत्रसंचालन प्रा. डी. डी. पटाईत यांनी केले. कार्यक्रमास परीसरातील शेतकरी बंधु व महिला मोठया संख्‍येने उपस्थित होते. मान्‍यवरांनी विदयापीठाव्‍दारे राष्‍ट्रीय कृषि विकास योजनेंतर्गत माझोड गावात घेण्‍यात आलेल्‍या ५० पीक प्रात्‍यक्षिकांपैकी शेतकरी श्री. गजानन शेळके, श्री. विष्‍णू घोगरे, श्री. बबनराव लांडगे यांच्‍या प्रात्‍यक्षिकास भेट देउुन रबी ज्‍वारी पीकाची पाहणी केली. कार्यक्रम यशस्‍वीतेसाठी श्री.एस.बी. जाधव, श्री हनुमान बनसोडे, कृ‍षि पर्यवेक्षक श्री. बी. एल. बोरकर, श्री. -हाडे, श्री. अनिल खिलारे तसेच रेणुका माता प्रतिष्‍ठाणाच्‍या पदाधिकारी व गावक-यांनी परिश्रम घेतल.



टिप-सदरिल बातमी कृषि तंत्रज्ञान माहिती केंद्राचे केंद्र व्‍यवस्‍थापक यांच्‍या ईमेल व्‍दारे प्राप्‍त

Friday, January 15, 2016

मौजे बेलवाडी येथील श्री रामेश्‍वर मांडगे यांच्‍या दुध डेअरी फार्मला वनामकृविचे कुलगुरू मा डॉ बी व्‍यंकटेश्‍वरलु यांची भेट

हिंगोली जिल्‍हातील सेनगांव तालुक्‍यातील मौजे बेलवाडी येथील दुग्धव्यवसाय करणारे प्रगतशील शेतकरी श्री रामेश्‍वर मांडगे यांचे दुध डेअरी फार्मवर दि. १४ जानेवारी रोजी कुलगुरु मा. डॉ. बी वेंकटेश्वरलु, विस्तार शिक्षण संचालक डॉ. बी. बी. भोसले, पशुसंवर्धन व दुग्धशास्त्र विभागाचे डॉ. अे. टी. शिंदे, ज्वार संशोधन केंद्राचे डॉ. विक्रम घोळवे, मुख्य विस्तार शिक्षण अधिकारी डॉ. पी. आर. देशमुख यांनी भेट दिली.
श्री मांडगे यांनी जिदद् व मेहनतीच्या बळावर दुग्धव्यवसाय केवळ एक म्हैस व तीन एक्कर जमीनीवर सुरु करुन आज घडीला त्यांचेकडे ७० म्हैसी व १०० एकर जमीन केवळ एकत्रित कुटूंबाच्या प्रयत्नातुन शक्य झाल्याचे सांगितले, त्यांच्या शेतावर दुग्ध उत्पादन तंत्रज्ञानाचे अवलंबन करुन दररोज जवळपास ४०० लिटर दुध उत्पादन करुन हिंगोली शहरात विक्री करुन संपूर्ण कुटूंब आत्मनिर्भर झाल्याचे सांगितले. दुधाची प्रत अत्यंत चांगली असल्यामुळे त्यांना प्रति लिटर ६० /- रुपये दर मिळत आहे.

  कुलगुरु मा. डॉ.  बी.  वेंकटेश्वरलू यांनी त्यांच्या मेहनतीचे व व्यवसायप्रती निष्ठा याबाबत गौरव उदगार काढुन त्यांच्या वडीलांसह विद्यापीठास भेट देण्याचे आमंत्रण दिले तसेच विद्यापीठातील विद्यार्थ्यांना त्यांच्या दुग्धव्यवसायास भेट आयोजित करण्याचे सुचविले. विस्‍तार शिक्षण संचालक डॉ. बी बी भोसले यांनी त्यांच्या व्यवसाय यशस्वीतेची महती त्यांच्या वडीलांची पुण्याई म्हणुन एकत्रित तीन पिढयामुळे यशस्वी दुग्ध व्यवसाय टिकवण्याचे शक्य झाले व विद्यापीठाच्‍या वतीने दुग्धव्यवसावर प्रक्रियासंबधी प्रशिक्षण व मदत करण्याचे आश्वासन दिले.

Thursday, January 14, 2016

गुलबर्गा ये‍थे आयोजित रासेयोच्‍या राष्‍ट्रीय एकता शिबिरात परभणी कृषि महाविद्यालयातील स्‍वयंसेवकांचा सहभाग

कर्नाटक राज्‍यातील गुलबर्गा येथे गुलबर्गा विद्यापीठात भारत सरकारच्‍या युवक कल्‍याण व क्रीडा मंत्रालयाच्‍या वतीने राष्‍ट्रीय सेवा योजनेच्‍या राष्‍ट्रीय एकता शिबिराचे आयोजन दिनांक ६ ते १२ जानेवारी दरम्‍यान करण्‍यात आले होते. सदरिल शिबिरात दक्षिण-मध्‍य भारतातील विविध विद्यापीठाच्‍या राष्‍ट्रीय सेवा योजनाच्‍या स्‍वयंसेवक व स्‍वयंसेविकांनी सहभाग नोंदविला होता. वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठातील परभणी कृषि महाविद्यालयातील राष्‍ट्रीय सेवा योजनेच्‍ो कार्यक्रमाधिकारी प्रा विजयकुमार जाधव यांच्‍या नेतृत्‍वाखाली दहा स्‍वयंसेवकांनी सहभाग नोंदवुन महाराष्‍ट्र राज्‍याचे प्रतिनिधीत्‍व केले. विद्यार्थ्‍यांचे व्‍यक्‍तीमत्‍व विकास व राष्‍ट्र निर्माण या उदेद्शाने सदरिल शिबिराचे आयोजन करण्‍यात येते. शिबिरात रासेयोचे ध्‍वजारोहण, योगासन, श्रमदान, स्‍वच्‍छता अभियान, विशेष व्‍याख्‍याने, सांस्‍कृतिक कार्यक्रम आदीमध्‍ये महाविद्यालयाच्‍या स्‍वयंसेवकांनी सक्रीय सहभाग घेतला. महाविद्यालयाच्‍या संघात स्‍वयंसेवक संजय चिंचाणे, नितिन ठोकर, मारूती चाटुरे, विशालकुमार राठोड, भारत खेलबाडे तर स्‍वयंसेविका संध्‍या थोरात, सय्यद रिजवाना, स्‍वाती कागणे, स्‍वाती गुहाडे, अंजली वाघमारे यांचा समावेश होता. सदरिल शिबिराच्‍या समारोप कार्यक्रमात गुलबर्गा विद्यापीठाचे कुलगुरू मा डॉ निरंजन यांच्‍या हस्‍ते सन्‍मान चिन्‍ह व प्रशस्‍तीपत्र कार्यक्रमाधिकारी व संघास देण्‍यात आले. शिबिरातील यशस्‍वी सहभागाबद्दल शिक्षण संचालक डॉ अशोक ढवण, प्राचार्य डॉ डि एन गोखले, रासेयोचे समन्‍वयक डॉ महेश देशमुख व विद्यापीठातील अधिकारी-कर्मचारी यांनी अभिनंदन केले.

Wednesday, January 13, 2016

कृषि महाविद्यालयात स्‍वामी विवेकानंद व राजमाता जिजाऊ जयंती साजरी


वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठांतर्गत असलेल्‍या कृषि महाविद्यालयाच्‍या वैद्यनाथ पदव्‍युत्‍तर वसतीगृहात स्‍पर्धामंचाच्‍या वतीने स्‍वामी विवेकानंद व राजमाता जिजाऊ जयंती साजरी करण्‍यात आली. कार्यक्रमाच्‍या अध्‍यक्षस्‍थानी कृषि महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ डि एन गोखले होते तर प्राचार्य डॉ व्हि डि पाटील, विभाग प्रमुख डॉ बी बी ठोंबरे, जनसंपर्क अधिकारी डॉ पी एस कापसे यांची प्रमुख उपस्थिती होती. यावेळी मान्‍यवरांच्‍या हस्‍ते स्‍वामी विवेकानंद व राजमाता जिजाऊ यांच्‍या प्रतिमेचे पुजन करून अभिवादन करण्‍यात आले.
अध्‍यक्षीय भाषणात प्राचार्य डॉ डि एन गोखले यांनी स्‍वामी विवेकानंद यांचे विचार युवकांना मार्गदर्शक असुन सध्‍याच्‍या स्‍पर्धेात्‍मक वातावरणात प्रेरणादायी आहेत, असे सांगितले तर प्राचार्य डॉ व्हि डि पाटील यांनी जिजाऊ मातेच्‍या संस्‍कारातुन शिवाजी महाराज घडले असुन संस्‍कारच व्‍यक्‍तीचे जीवन घडवीत असतात, असे प्रतिपादन केले. कार्यक्रमाचे सुत्रसंचालन गोपाळ भिसे यांनी केले तर आभार प्रदर्शन प्रकाश ठाकरे यांनी केले. कार्यक्रम यशस्‍वीतेसाठी मन्‍मथ बेरकिळे, मधुकर मांडगे आदीसह स्‍पर्धामंचाच्‍या सद्स्‍यांनी परिश्रम घेतले. कार्यक्रमास पदव्‍युत्‍तर विद्यार्थी मोठया संख्‍येने उपस्थित होते

Tuesday, January 12, 2016

माती परीक्षणावरील पाच दिवसीय प्रशिक्षणास प्रारंभ

टिप - सदरिल बातमी मृदविज्ञान व कृषि रसायनशास्‍त्र विभागाचे विभाग प्रमुख यांच्‍या कडुन प्राप्‍त

संत्री व मोसंबी फळबागांवर किड व रोगांचा प्रादुर्भाव

वनामकृविच्‍या निदान चमुची फळबागांना भेट देऊन केले उपाय योजनेबाबत मार्गदर्शन

सेलू तालुक्‍यातील ढेंगळी पिंपळगांव व परिसरात मोठया प्रमाणावर संत्रा व मोसंबीच्‍या बागा आहेत, सलग दोन वर्ष कमी पाऊस झाल्‍यामुळे विहीर, बोअरचे पाणी संपले असुन फळबागांना पाण्‍याची कमतरता भासत आहेत. अशा परिस्थितीत किड व रोगांचाही प्रादुर्भाव मोठया प्रमाणात होत आहे. वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठाच्‍या कृषि तंत्रज्ञान माहिती केंद्राच्‍या शास्‍त्रज्ञांच्‍या चमुने या भागातील फळबागांना प्रत्‍यक्ष भेट देऊन रोग व किडीचे निदान करुन शेतक-यांना मार्गदर्शन केले. या चमुत विस्‍तार कृषिविदयावेत्‍ता डॉ.यु.एन.आळसे, वनस्‍पती विकृतीशास्‍त्र विभाग प्रमुख डॅा.के.टी. आपेट, उदयानविदया शास्‍त्रज्ञ डॉ.एस.जे.शिंदे, किटकशास्‍त्रज्ञ प्रा.डी.डी.पटाईत आदींचा समावेश होता. या चमुने जिजाभाऊ सोळंके, बापु सोळंके, अमृता सोळंके, दादाराव सोळंके, गोविंदराव जोशी यांच्‍या संत्रा व मोसंबी बागेस भेट दिली असता त्‍या ठिकाणी बरचशे झाडे पिवळी पडलेली दिसुन आली, त्‍या ठिकणी शास्‍त्रज्ञांनी निरीक्षण केले असता सदर झाडावर जमिनीलगत साल पोखरणारी अळीचा प्रादुर्भाव दिसुन आला तसेच त्‍या ठिकाणी बुरशीची वाढ आढळुन आली व ब-याचशा झाडावर डिंक्‍या रोगाचा प्रादुर्भाव ही मोठया प्रमाणावर दिसुन आला. श्री गोविंदराव जोशी यांच्‍या शेतातील संत्रा बागेस भेट दिली असता त्‍या ठिकाणी झाडाच्‍या जुन्‍या फांदयावर खुप मोठया प्रमाणावर साल पोखरणा-या किडींचा प्रादुर्भाव दिसुन आला, त्‍यामुळे झाडांच्‍या फांदया मोठया प्रमाणात वाळतांना दिसत आहेत तसेच या बागेत डायबॅक रोगही दिसुन आला. यावेळी शास्‍त्रज्ञांनी शेतक-यांना मार्गदर्शन करतांना किडींने प्रादुर्भावग्रस्‍त झाडाच्‍या जुन्‍या फांदया काढुन टाकण्‍यास सांगुन ज्‍या ठिकाणी मुख्‍य खोंडाला किडीचा प्रादुर्भाव असेल त्‍या ठिकाणी डायक्‍लोरोव्‍हास 10 मिली 10 लिटर पाण्‍यात टाकुन किटकनाशक झाडाला झालेल्‍या छिद्रामध्‍ये भरुन छिद्र मातीने अथवा शेणाने लिपुन घ्‍यावे तसेच डिंक्‍या झालेल्‍या ठि‍काणी बोर्डोपेस्‍ट लावावी व झाडाला कॉपर ऑक्‍झोक्‍लोराइडची आळवणी करावी जेणे करुन रोगांचे व्‍यवस्‍थापन करावे तसेच झाडांना पाणी देतांना पाणी खोडाला लागु देउु नये ही काळजी घ्‍यावी. 

सध्‍या पाण्‍याच्‍या कमतरतेमुळेही बरीचशी झाडे मरु लागली आहेत अशा ठिकाणी झाडांना लागलेली 50% फळे व पाने व फांदयाची 25 ते 30 % विरळणी करावी. जमिनीलगत गवताचे, भुश्‍याचे अथवा प्‍लास्‍टीकचे आच्‍छादन करावे. केओलीन (8%) बाष्‍परोधक किंवा पोटॅशियम नायट्रेटची (1%) फवारणी करावी. सदरिल फवारणी मार्च ते मे महिन्‍यात 15 दिवसाचे अंतराने करावी, बागेच्‍या दक्षिण-पश्चिम बाजुस वारारोधकाची लागवड करावी. चुनखडीयुक्‍त जमिनीत लागवड करु नये. लागवड केलेली असल्‍यास प्रति झाड 100 ग्रॅम ट्रायकोडर्मा + 15 मि.ली अझॅटोबॅक्‍टर + 15 मि.ली स्‍फुरद विद्राव्‍य जिवाणू बहाराच्‍या वेळी दयावे. तसेच 0.5 % लोह 0.5 टक्‍के जस्‍त व 0.2 टक्‍के बोरॉनची एक ते दिड महिन्‍याच्‍या अंतराने मार्च ते मे दरम्‍यान फवारण्‍या कराव्‍यात. पाणी कमी असल्‍यास अंबिया बहार धरु नये. झाडाच्‍या बुंध्‍याला 10 % बोर्डोपेस्‍ट फेब्रुवारी महिन्‍यात लावावे. अशा उपाय योजना बाग जगवण्‍यासाठी कराव्‍यात असा सल्‍ला विद्यापीठाच्‍या शास्‍त्रज्ञांनी दिला.


टिप - सदरिल बातमी कृषि तंत्रज्ञान माहिती केंद्र, परभणीचे केंद्र व्‍यवस्‍थापक यांच्‍या कडुन ईमेल व्‍दारे प्राप्‍त