Pages

Friday, July 22, 2016

वनामकृवि तज्ञांची कापुस पीक पाहणी

पाहणीत कापुस पीकात मुळकुज रोगाचा प्रादुर्भाव आढळला
परभणी तालुक्‍यातील मौजे ब्राम्‍हणगांव, सोन्‍ना व परिसरातील कापुस पीकाची पाहणी दिनांक १९ जुलै रोजी वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठाचे वनस्‍पती विकृतीशास्‍त्रज्ञ डॉ. डी. एन. धुतराज व विस्‍तार कृषिविदयावेत्‍ता डॉ. यु. एन. आळसे यांनी केली असता कापुस पीकाची वाढ खुंटल्‍याचे दिसुन आले. पीक साधारणत: २८ दिवसाचे झाले तरीही नवीन पान येतांना दिसत नाहीत. खालची पानं लाल पडत आहेत व नंतर पिवळी पडुन धक्‍का लागला की, गळुन पडत आहेत, खोड लाल पडत आहे. कुठल्‍याही प्रकारची किड कापसावर आढळुन आलेली नाही. सोन्‍ना शिवारात काही ठिकाणी तुडतुडयांचा थोडया प्रमाणात प्रादुर्भाव दिसुन आला. कापुस उपटुन बधितल्‍यानंतर मुळांची वाढ खुंटलेली दिसुन आली व मुळे जमिनीत खाली वाढयाऐवजी परत जमिनीच्‍या पृष्‍टभागाकडे वळतांना दिसली व तंतुमय मुळांची होत नसल्‍याचे आढळले. काही ठिकाणी मुळं काळी पडतांना आढळली.

प्रयोगशाळेत कापसाच्‍या नमुन्‍याची पाहणी केली असता मुळकुज रोग आढळुन आला. हा रोग बुरशीमुळे झाला असल्‍याचे निदर्शनास आले. याच्‍या नियंत्रणासाठी कार्बेन्‍डेन्‍झीम (६७%) अधिक मॅन्‍कोझेब (३३%) या संयुक्‍त बुरशीनाशकाची २५ ग्रॅम प्रति १० लिटर पाण्‍यात मिसळुन आळवणी करावी. तसेच कापुस पीकावर मुळकुजव्‍या रोग आल्‍यामुळे जमिनीतुन अन्‍न घेण्‍याची प्रक्रिया मंदावली आहे. त्‍यामुळे रोप पिवळी पडत आहेत व नंतर लाल पडत आहेत. ब-याच शेतक-यांनी पेरणीसोबत खते न दिल्‍यामुळे असे लक्षणं दिसतात. म्‍हणुन खताचा पहिला हप्‍ता पेरणी सोबतच दयावा. ज्‍या शेतक-यांनी पेरणी जुनच्‍या १५ तारखेला केली असेल अशा शेतक-यांनी लागवडीनंतर एक महिना पुर्ण झाल्‍यास कापसाला युरियाचा दुसरा हप्‍ता हेक्‍टरी ६५ किलो युरिया जमिनीतुन दयावा जमिनीत ओल कमी असल्‍यास नत्र देऊ नये. पिकाची जोमदार वाढ होण्‍याच्‍या दृष्‍टीने १.५० ते २.० टक्‍के १९:१९:१९ किंवा १३:००:४५ खत व सोबत २० ग्रॅम मॅग्‍नेशियम सल्‍फेट फवारणीतुन दयावे, असे कृषि तंत्रज्ञान माहिती केंद्र व वनस्‍पती विकृतीशास्‍त्र विभाग यांच्‍या तर्फे कळविण्‍यात आले आहे.